krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rabbi sorghum Water management : रब्बी ज्वारीस द्या संरक्षित पाणी

1 min read
Rabbi sorghum Water management : सध्या बहुतांश शेतकऱ्यांची ज्वारीची पिके (Sorghum crop) पोटरीत तर काहींची फुलोऱ्यात आहे. ज्वारीचे पीक पोटरीत आल्यापासून दाणे भरण्यापर्यंतच्या काळात पिकाला जास्त ओलाव्याची गरज असते. या काळात ओलावा कमी पडल्यास उत्पादनात फारच घट येते. साधारणपणे ज्वारीची पेरणी केल्यानंतर 50 ते 55 दिवसांनी पीक पोटरीत येते. यावेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते. पिकांची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली दिसून येते. अशावेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असेल त्यांनी पाणी द्यावे. पाणी मिळाल्याने ज्वारी निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. अन्नद्रव्य ताटातून कणसात जाण्यासाठी मदत होते आणि कणसांचा आकार मोठा होण्यास मदत होते.

कोरडवाहू ज्वारीची उत्पादनक्षमता ही प्रामुख्याने जमिनीतील साठविलेल्या ओल्याव्यावरच अवलंबून असते. जमिनीवरच्या थरातील पाणी बाष्पीभवनामुळे उडून गेल्यास जमिनीस भेगा पडतात. ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्यास 30 ते 35 दिवसांनी जमिनीस भेगा पडण्यास सुरुवात होते.सद्य परिस्थितीत राज्यात बहुतेक पिके ही पोटरी अवस्थेत तर काही फुलोऱ्यात आहेत आणि बहुतांश जमिनीस मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. पोटरी अवस्थेत असणाऱ्या पिकास शेतकरी बंधूनी दातेरी कोळप्याने कोळपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी टणक झालेल्या जमिनीवरून कोळपे ओढणे अवघड जाते. दातेरी कोळप्याच्या दातऱ्याचा कोन कोळपे ओढण्यास सोपा जाईल, असा असावा. दातेरी कोळप्यामुळे जमिनीवरील भेगा बुजण्यास काही प्रमाणात मदत होते आणि या कोळपणीचा उपयोग ज्वारीच्या फुलोऱ्यास मदत होईल. नंतर पडणाऱ्या थंडीमुळे दाणे भरण्याची अवस्था पूर्ण होते. एकंदरीत ज्वारीच्या पिकास तिसऱ्या, पाचव्या आणि आठव्या आठवड्यातील कोळपणीमुळे ज्वारीचे पीक हाती येण्यास हमखास यश येते.

बागायती ज्वारीस दिलेल्या पाण्यापैकी 70 टक्के पाणी पहिल्या 30 सें.मी. जमिनीच्या थरातून, 16 टक्के पाणी दुसऱ्या थरातून, 9 टक्के पाणी तिसऱ्या थरातून तर उरलेले 5 टक्के पाणी चाैथ्या थरातून पीक घेत असते. पहिल्या 30 सें.मी. थरात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मुळे असल्याने या थरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भागवली जाते. बागायती रब्बी ज्वारीस पीक वाढीच्या महत्त्वाच्या चार अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते. मात्र, भारी व काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थेतच पाणी द्यावे.

🎯 रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
🔆 ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ – पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी.
🔆 पीक पोटरीत असताना – पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी.
🔆 पीक फुलोऱ्यात असताना – पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी.
🔆 कणसात दाणे भरण्याचा काळ – पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी.

⭕ सर्वसाधारणपणे 70 ते 75 दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते आणि कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल, त्यांनी ज्वारीच्या पिकास पाणी द्यावे.

⭕ ज्वारीची पेरणी झाल्यानंतर 90 ते 95 दिवसांत दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी द्यावे. हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते. भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात. भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्किल होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते आणि ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते. भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन, चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.
⭕ कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर दिसून आली आहे. कमी पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचनाने पीक वाचविता येते. मात्र, एक पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी किंवा 50 ते 55 दिवसांनी पाणी दिल्यास ज्वारीची वाढ चांगली होऊन हमखास उत्पादन मिळू शकते.

🔆 दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी 28 ते 30 व दुसरे पाणी 50 ते 55 दिवसांनी द्यावे. याप्रमाणे संरक्षित पाणी देल्यास ज्वारीच्या उत्पादनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होते.
🔆 कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना 50 ते 55 दिवसांनी द्यावे.
🔆 दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
🔆 बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना 90 ते 95 दिवसांनी द्यावे.
🔆 भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!