Varieties of Gram : यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त हरभऱ्याचे वाण
1 min readमहाराष्ट्र राज्य हरभरा पिकाचे पेरणी क्षेत्र व उत्पादनामध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, सन 2020-21 मध्ये राज्यात 25.94 लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी करण्यात आली हाेती. त्यापासून हरभऱ्याचे 28.66 लाख टन इतके उच्चांकी उत्पादन झाले हाेते. राज्यातील हरभऱ्याची उत्पादकता 11.05 क्विंटल प्रती हेक्टर आहे. सन 2010-11 च्या तुलनेत आज हरभऱ्याचे 86 टक्के क्षेत्र 118 टक्के उत्पादन आणि 18 टक्यांनी उत्पादकतेत वाढ झालेली आहे. 2021-22 मध्ये हरभऱ्याची सर्वसाधारणपणे 26.50 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.
‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीस अनुसरून हरभरा पिकाचे अधिकाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी सुधारित वाणांची पेरणी करणे आवश्यक आहे. आजपर्यंत हरभरा पिकाचे विवध वाण विद्यापीठाने प्रसारित केले असून, राज्यात विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणाची शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करत आहे. दिवसेंदिवस शेती उद्योगात मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करता येईल, असे उंच वाढणारे देशी हरभऱ्याचे वाण ‘फुले विक्रम’ आणि ‘पीडीकेव्ही कनक’ विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहे.
🌐 लागवड तंत्रज्ञान
🔆 मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन निवडावी. हलकी, चोपण किंवा पाणथळ व क्षारयुक्त जमीन टाळावी.
🔆 खरीप पीक निघाल्याबरोबर खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
🔆 पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्राम ट्रायकोडर्मा पावडरची किंवा 2 ग्राम थायरम अधिक 2 ग्राम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) प्रती किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्राम रायझोबियम व 250 ग्राम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
🔆 जिरायती भागात 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर, बागायती भागात 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर आणि उशिरा पेरणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी.
🔆 लहान आकाराच्या बियाणे असल्यास हेक्टरी 65 ते 70 किलो, मध्यम आकाराचे बियाणे असल्यास 100 किलो व टपोरे दाण्याचे बियाणे असल्यास हेक्टरी 120 किलो बियाणे वापरावे. सर्वसाधारणपणे जातीपरत्वे, बियाणांच्या आकारमानानुसार 70 ते 100 किलो हेक्टरी बियाणे वापरावे.
🔆 देशी वाणांची पेरणी चाड्याच्या पाभरीने 30 x 10 सें.मी. व काबुली वाणांची पेरणी 45 x 10 सें.मी. अंतरावर करावी.
🔆 कम्बाईन हार्वेस्टरद्रवारे काढणी करण्यासाठी ह्या वाणांची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ओलीताखाली 45 x 10 सें.मी. अंतरावर करावी व त्यासाठी 50 किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे.
🔆 खतमात्र प्रति हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.
🔆 पिकास प्रमाणशीर पाणी द्यावे. त्यासाठी सरी वरंबा लागवड पद्धत किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. जास्त पाण्यामुळे पीक उभाळणार नाही, याची दक्षता घ्यावी.
🔆 यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त हरभऱ्याचे सुधारीत वाण
🌐 फुले विक्रम
🔆 महात्मा फुले कृषी विद्यापिठाने कंबाइन हार्वेस्टरने काढणीस येणारे ‘फुले विक्रम’ हे वाण कोरडवाहू, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी विकसित केले आहे. या वाणाची शिफारस संपूर्ण महाराष्ट्रात पेरणीसाठी केली आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात या वाणांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे.
🔆 महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 साली हे वाण प्रसारित केले.
🔆 फुले विक्रम या वाणाची परिपक्वता कालावधी साधारणत: 105 ते 110 दिवस आहे.
🔆 या जातीची उंची 55 ते 60 सेंमी असून, घाटे जमिनीपासून एक फुटावर लागतात. उंच असल्याने यांत्रिक पद्धतीने काढणीस म्हणजेच कम्बाईन हार्वेस्टरने काढणीस हा वाण उपयुक्त आहे. पिकाचे कुठलेही नुकसान न होता व्यवस्थित काढणी करता येते.
🔆 ही जात उंच जिरायती, कोरडवाहू, बागायत आणि उशिरा लागवडीस उपयुक्त असून, सर्वाधिक उत्पादन देणारी आहे.
🔆 दाण्यांचा आकार मध्यम असून, मर रोग प्रतिकारक्षम आहे.
🔆 महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यात या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे.
🔆 उशिरात उशिरा (10 डिसेंबरपर्यंत) पेरणी केली असता, उत्पादनात फरक पडत नाही.
🔆 यांत्रिक पद्धतीने काढता येत असल्याने पीक काढणीवरील खर्चात बचत होते.
🔆 या जातीचे जिरायतीमध्ये प्रति हेक्टरी 16.37 क्विंटल, बागायतीमध्ये 22.25 क्विंटल आणि उशिरा पेरणीमध्ये 21.12 क्विंटल उत्पादन मिळते.
🌐 पी.डी.के.व्ही कनक
🔆 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी हे वाण विकसित केले आहे. महाराष्ट्राबरोबर हे वाण मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आले आहे.
🔆 या वाणाची शिफारस जिरायती व बागायत पेरणीसाठी सुद्धा करण्यात आली असून, दाण्याचा आकार मध्यम आहे. हे वाण कंबाइन हार्वेस्टरने काढणीस उपयुक्त आहे.
🔆 प्रसारण वर्ष 2021.
🔆 हे वाण लवकर व एकाच वेळी परिपक्व होते.
🔆 या वाणाचा परिपक्वता कालावधी साधारणत: 108 ते 110 दिवस आहे.
🔆 जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंच वाढणारे तसेच एक ते दोन फुटावर जमिनीच्या वर घाटे असल्याने हे वाण यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त आहे.
🔆 मध्यम टपोरे दाणे असून, घाटेअळी आणि मर रोगास प्रतिकारक आहे.
🔆 100 दाण्यांचे वजन 21.73 ग्राम असते.
🔆 जिरायत, बागायत पेरणीस योग्य त्याचबरोबर ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस.
🔆 महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, गुजरात राज्यासाठी हे वाण पेरणीसाठी शिफारसीत.
🔆 या वाणाची हेक्टरी 38 क्विंटल, हेक्टरी सरासरी उत्पादन 22 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.
©️ डॉ. आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. जिल्हा अहमदनगर.
संपर्क :- 9404032389
मेल :- aditakate@gmail.com
©️ ऐश्वर्या राठोड,
आचार्य पदवी विद्यार्थिनी, कृषिविद्या विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
संपर्क :- 8411852164
मेल :- aishwaryarathod01@gmail.com