Deoni Cattle breed : देवणी जातींच्या पशुंची उपजत ही उदगीरचीच!
1 min readनिजाम सरकारने (Nizam Government) देवणी जातींच्या पशुंचा शास्त्रीयदृष्ट्या सुधारणा व विकास करण्यासाठी उदगीर येथे 1930 साली एक योजना आखली. यासाठी डॉ. मुन्शी अब्दुल रहेमान यांची नेमणूक केली गेली. त्यांनी या जातींच्या जनावरांचे सर्वेक्षण करून या जातींच्या जनावरांचे शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास सुरू केला. कासराळ, ता. उदगीर, जिल्हा येथील ग्यानोबा एकनाथ शेळके यांनी 1,200 देवणी गायी ठेवून संगोपन करण्याचे कार्य सुरू केले. पशुसंवर्धन खात्यातील तज्ज्ञांपैकी डॉ. कौरा (1945), डॉ. आर्या (1957), डॉ. रणधावा (1958) आणि मुन्शी अब्दुल रहेमान यांनी देवणी जनावरांची जात रक्ताने ‘गीर’ व ‘काँक्रेज’ या जातींच्या अंतर संयोगाने आणि स्थानिक हैदराबादच्या पश्चिम-उत्तर भागातील जनावरांची बनलेली असल्याचे सत्य शोधले.
जुन्या काळी बीदर (कर्नाटक) येथील राजे तोफ, रणगाडे ओढण्यासाठी देवणी जातींच्या बैलांचा वापर करीत असत. हैदराबाद राज्यातील व बीदर परिसरातील देशमुख व जहागीरदार यांना देवणी जातींची जनावरे संगोपन करण्यासाठी शेकडो एकर जमिनी ‘रमना’ म्हणून बहाल केल्या होत्या. जेणेकरून देवणी जातींची जनावरे वृधिंगत व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता. जामखंडी, देवणी व वांजरखेडा येथे ‘रमना’ मिळालेल्या जमिनीमध्ये गोपालकांनी देवणी जनावरांचे संगोपन सुरू केले. सरकारला पाहिजे तेवढी जनावरे या गोपालकांनी उपलब्ध करून दिली.
उदगीर येथे 1930 साली 800 एकर जमिनीवर पशु पैदास प्रक्षेत्र सुरू करण्यात आले. 1952 साली उदगीर येथे आधारभूत ग्राम केंद्र सुरू करण्यात आले. या व्यतिरिक्त देवणी वळू योजना सुरू करून या जातींच्या कार्यात भर घातली गेली. कृत्रिम रेतनाने देवणी जातींचा विकास व प्रसार करण्याचे कार्य चालू करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत हे पशु पैदास प्रक्षेत्र उदगीर येथे सुरू आहे. 1937 सालापासून अखिल भारतीय पशु प्रदर्शन सुरू करण्यात आले. 1938 साली नवी दिल्ली येथे झालेल्या पशु प्रदर्शनात आत्माराम दिगंबर कुलकर्णी, रा. कुणकी यांची देवणी जातीची कालवड सर्वोत्कृष्ट ठरली. त्यानंतर देवणी येथील संग्राम डोंगरे, कासराळ येथील ग्यानोबा शेळके यांच्या देवणी जातींच्या गायी अखिल भारतीय पशु प्रदर्शनात पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यानंतर तब्बल 36 वेळा अखिल भारतीय पशु प्रदर्शनात देवणी जातींच्या वळूंनी व गायींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
देवणी जातींच्या जनावरांची मागणी वाढू लागल्यानंतर लॉर्ड कमाल यार जंग बहादूर यांच्या अखत्यारीत देवणी येथे गुरांचा बाजार सुरू करण्यात आला. त्यानंतर हाळी-हंडरगुळी येथेही बैलबाजार सुरू करण्यात आला. शिवाय 1937 सालापासून माळेगाव, जिल्हा नांदेड व उदगीर, जिल्हा लातूर येथे विभागीय स्तरावरचे पशु प्रदर्शन सुरू करण्यात आले. 1982 साली उदगीर येथे अखिल भारतीय पशु प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. देवणी व हंडरगुळी या दोन्ही ठिकाणच्या बाजारातून परप्रांतात या पशुंची मागणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या बाजाराला मोठे महत्त्व आले होते. यांत्रिकीकरणाचा युगात देवणी जातींच्या पशुंची संख्या आता केवळ दाेन लाख इतकी शिल्लक राहिली आहे.
पशु विद्यापीठ उपकेंद्रांतर्गत चार केंद्र सुरू
उदगीर येथील पशु विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर उदगीर येथील निजाम काळापासून सुरू असलेल्या पशु पैदास प्रक्षेत्रात देवणी गोवंश संवर्धन व जतन, 2008 सालापासून मराठवाडी म्हैस संशोधन, उस्मानाबादी शेळी संशोधन, कुक्कुटपालन संशोधन केंद्र व विस्तार प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत. आता देवणी जातीच्या पशुंच्या संशोधनासाठी केवळ 7 कोटी 64 लाख रुपयांच्या निधींची गरज आहे.