Deoni Cattle Research Centre : ‘देवणी’चे पशु पैदास प्रक्षेत्र असलेल्या ‘उदगीर’ला का डावलले?
1 min readउदगीर येथे निजाम काळापासून देवणी जातीच्या पशुंचे पशु पैदास प्रक्षेत्र सुरू आहे. त्यामुळे उदगीर येथे देवणी जातींच्या पशुंचे संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आलेला होता. उदगीरचा प्रस्ताव डावलून साकूड येथे एकही पशु नसताना पशु पैदास प्रक्षेत्र उभारण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. या आदेशामुळे उदगीरकरांचा स्वप्नभंग झाला आहे. देवणी या देशी गोवंशाची पैदास ही मुळातच लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी व जळकोट या तालुक्यात झालेली आहे. या जातीच्या गोवंशांनी अखील भारतीय पशुप्रदर्शनात तब्बल 36 वेळा अव्वल क्रमांक पटकावला आहे.
या भागातील शेतकऱ्यांसाठी देवणी जातीची गाय किंवा वळू म्हणून अस्मिताच म्हटली तर वावगे ठरणार नाही. या गायींचे दूध हे अधिक पौष्टिक असल्याने या दूधास माेठी मागणी असून, चांगला दर मिळतो तसेच शेतीकामासाठी देखील हे गोवंश अधिक फायद्याचे ठरत असतात. राष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा पारितोषिक मिळविलेल्या या देवणी जातीची संख्या मधल्या काळात कमी झाली आहे. अशा परिस्थितीत या देवणी जातीचे संवर्धन व जतन करणे आवश्यक आहे. हे जतन व संवर्धन करण्याचे काम संशोधन केंद्राच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येते.
देवणी पशुंची पैदास मुळात उदगीर परिसरातील असल्याने या जातीचे पशुपैदास प्रक्षेत्र या भागातच होणे आवश्यक होते. मात्र, हे पशुपैदास प्रक्षेत्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने अंबाजोगाईला राज्य शासनाने मंजूर केले व ते सुरू करण्याचे आदेशही 11 ऑक्टोबर 2023 रोजी जारी करण्यात आले आहेत. खरे तर, उदगीरच्या बाबतीत यापूर्वीही राज्य शासनाकडून अनेकदा अन्यायच झाला आहे.
उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या परिसरात 800 एकर जमीन उपलब्ध असल्याने पशुवैद्यक विद्यापीठ येथे स्थापन केले जावे, ही मागणी या भागातील शेतकऱ्यांची होती. प्रस्ताव उदगीरचा शासन दरबारी गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री जिल्ह्याचे सुपूत्र विलासराव देशमुख यांनी हे विद्यापीठ नागपूरला दिले व रडक्याचे डोळे पुसल्याचा प्रकार म्हणून उदगीरला पशुवैद्यक विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर केले. हे उपकेंद्र आजघडीला नावालाच आहे. नंतरच्या काळात दुग्ध तंत्रज्ञान उदगीरला मंजूर करून घेण्यासाठी उदगीरकरांना मोठा संघर्ष करावा लागला.
लातूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रस्थापित नेतृत्वाचे नेहमीच सवतीमत्सराच्या भूमिकेतून पाहिले आहे. असे असताना सध्याच्या मंत्रीमंडळात उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने उदगीरकरांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यांनी अनेक विकासाची कामे करण्याचा सपाटाही लावला आहे. उदगीर येथे निजाम काळापासून देवणी जातींच्या पशूंचे पशुपैदास प्रक्षेत्र सुरू असल्यामुळे या ठिकाणी दुसरे नवीन देवणी जातींचे संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडे उदगीरकरांनी केली आहे.
देवणीचे दीड लाख पशुधन
2019 साली झालेल्या पशुगणनेनुसार देवणी जातींचे पशु आता 1 लाख 49 हजार 159 इतके आहेत. उदगीरच्या पशु प्रक्षेत्रात 300 च्या वर देवणी जातींचे पशुधन आहे.
केवळ 7 कोटी 64 लाख रुपये लागणार!
उदगीर येथे देवणी जातींच्या पशुंचे जतन, त्यावर संशोधन व संवर्धन करण्यासाठी जमीन, इमारती, पाणी, वैरण, तज्ज्ञ प्राध्यापक अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी केवळ 7 कोटी 64 रुपये खर्च अपेक्षित आहे. असा प्रस्तावही उदगीरच्या प्रक्षेत्र अधीक्षकांनी सरकार दरबारी पाठवला आहे. खासदार सुधाकर शृंगारे व मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर येथे दुसरे देवणी जातींच्या पशुंचे संशोधन केंद्र मंजूर करून घेण्याची मागणी उदगीरकरांनी केली आहे.