krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Wood-apple : महाकाय झाडाचे चवदार ‘कवठ’

1 min read
Wood-apple : कवठ (Wood-apple) हा शब्द कानावर पडला तरी आपल्या शरीरात हार्मोन श्रवू लागतात व नकळत जिभेला पाणी सुटते. माझ्या लहानपणी कवठ खाण्यासाठी आमची नेहमी भटकंती सुरू असे. कारण त्याकाळात कवठाची झाडे ही खूप दुर्मिळ होती. कोठेतरी एखादे झाड असे. आमच्या संपूर्ण गावात 4-5 झाडे होती. त्यामुळे सगळ्या गावातील मुले, माणसे याच झाडाखाली फळे खाण्यासाठी गर्दी करत असत. या फळाला कठीण कवच असते. त्यामुळे याचे देठही चिवट असल्याने फळ सहजासहजी झाडावरून खाली पडत नसे. आम्ही दगड मारून मारून कंटाळून जात असत. त्यावेळी कोठेतरी एखादे कवठ हाती लागे. अनेक वेळा कच्चे कवठ खाली पडे, आम्ही तेच खात असू. आजच्या काळात हे झाड पाहायलाही कोठे राहिलेले नाही. त्यामुळे आजच्या मुलांना हे झाड माहितीही नाही. आज आपण या झाडाचे महत्त्व जाणून घेऊ!

झाडाची रचना
या झाडाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. या झाडाचा आकार महाकाय असा वाढतो. लहानपणी हे झाड खूप कमी वेगाने वाढत असते. दहा वर्षांचे होईपर्यंत जमिनीच्या वरती खूप कमी वाढते. कारण, या काळात हे झाड स्वतःची वाढ जमिनीच्या खाली खोलवर करून घेते. त्यानंतर खूप कमी काळात हे झाड महाकाय आकार धारण करते. या झाडाला काटे असतात. याची पाने छोटी व जाड असल्याने या झाडाला खूप कमी पाणी लागते. शक्यतो उगवल्यानंतर या झाडाला कधीच पाणी द्यावे लागत नाही. याच्या खोडावर खपले असतात. या खपल्यावरून या झाडाचे वय किती असेल याचा अंदाज काढता येतो. ही झाडे उंचच उंच वाढतात. याचे खोड सरळ वरती जाऊन मग त्याला फांद्या फुटतात. या फांद्यांना छोटी छोटी पाने येतात. या झाडाला प्रचंड फुलोरा लागतो. यातील काही फुलोरा गळून जातो, तर काहीला फळे लागतात. या झाडांना प्रचंड फळे येतात. ही फळे खाण्यासाठी चविष्ट असतात.

पर्यावरणीय महत्त्व
पर्यावरणामध्ये या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हे झाड जमिनीपेक्षा जमिनीखाली जास्त वाढत असल्याने पावसाचे पाणी जमिनीत खोलवर घेऊन जाण्याचे कार्य ते करते. जमिनीच्या पोटात खोलवर लपलेले जीवनसत्व हे झाड वरती घेऊन येते. त्यामुळे याच्या प्रत्येक भागात अनेक जीवनसत्व व गुणधर्म असतात. या झाडावर पक्षी मोठ्या प्रमाणात घरटी करतात. कारण खपल्याची साल असल्यामुळे अनेक शत्रूंना झाडावर चढता येत नाही तसेच काटे अडल्यामुळे कोणालाही या झाडावर सहज झडप घालता येत नाही. त्यामुळे त्यांचे रक्षण होते. हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असल्याने याला फुलोरा प्रचंड येत असल्यामुळे मधमाश्या खूप जास्त या झाडावर पहायला मिळतात. जाड पाने, खोडावर खपल्या, फळांना कठीण कवच असल्यामुळे याच्या कोणत्याही भागातून पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे हे झाड जमिनीत पाण्याचा साठाही करून ठेवते. वातावरणांत हवा शुद्ध ठेवण्याचे कार्य हे झाड करते.

आयुर्वेदातील महत्त्व
या झाडाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदात उपयोग केला जात आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता यामध्ये या झाडाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. पोटाचे विविध आजार, मूत्रविकार, क्षयरोग यावर हे गुणकारी आहे. डोळ्याचे आजार, प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी उपयोगी आहे. पित्त विकारांवर प्रभावी आहे. श्वासाचे आजार, उचकी, दातांचे विकार, केसांचे आजार यावर हे गुणकारी आहे. त्वचेचे आजार, सर्पदंशावर उपयोगी आहे. याचे तेल संधीवातावर चालते. कावीळ झाल्यासही हे वापरता येते. महिलांच्या गुप्तरोगावर हे उपयोगी आहे. जनावरांच्या विविध आजारांवर हे झाड गुणकारी आहे. या झाडाचा पाला वाटून त्याचा रस गुरांना पाजतात. अशा प्रकारे हे झाड औषधी गुणांनी युक्त आहे.

धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
वेदांमध्ये सांगितले आहे की, मानवाने रोज या झाडाचे दर्शन घ्यावे. जो मनुष्य याचे रोज दर्शन घेईल, त्याचे आयुष्य सफल होते, धन्य होते. हे झाड समृद्धी व मांगल्याचे प्रतीक आहे. भगवान महादेव यांचे हे प्रिय झाड आहे. महाशिवरात्रीला या झाडाचे फळ महादेवाला अर्पण केले जाते. भारतातील अनेक भागांमध्ये हे फळ उपवासाला देखील चालते. कारण यामध्ये अनेक सात्विक गुणधर्म आहेत. पूर्वी अनेक मंदिरांचा परिसरात कवठाची अनेक झाडे पहायला मिळतं असत.

आहारातील महत्त्व
या झाडाच्या सर्वच भागामध्ये जीवनसत्व क आणि ड मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. याची फळे खाण्यास आंबट गोड असले तरी खूप चविष्ट असतात. या फळाच्या गरामध्ये गूळ घालून खाल्ल्यास याची चव खूपच छान लागते. तसेच या गरामध्ये मध घालून देखील खाल्ले जाते. कवठाची जेली, कवठाची चटणी, कवठ जॅम व कच्च्या कवठाची भाजी देखील केली जाते. कवठापासून लोणचे बनविले जाते. कवठ हे रोजच्या आहारात असेल तर शरीराची शक्ती वाढते, प्रतिकारशक्ती वाढते. अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते. त्यामुळे कवठ हे आपल्या रोजच्या आहारात असलेच पाहिजे.

आर्थिक महत्त्व
कवठ हे औषधांसाठी व आहारात खाण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे याची मागणी प्रचंड आहे. परंतु ही झाडे दुर्मिळ असल्यामुळे याची पूर्तता होत नाही. दिवसेंदिवस याची मागणी वाढतं असल्याने कवठ शेतीला आता चांगले दिवस आलेले आहेत. या शेतीमधून खूप कमी खर्चात भरपूर पैसा शेतकऱ्यांना मिळू शकतो. माराठवाड्यासारख्या दुष्काळी परिसरात कवठ शेतीला भरपूर वाव आहे. खूप कमी पाण्यात, कमी खर्चात हे झाड उत्पन्न देते. या झाडाचे लाकूड कठीण, टिकाऊ व मजबूत असल्यामुळे घर बांधण्यासाठी, शेतीची अवजारे बनविण्यासाठी याला खूप मागणी आहे. या लाकडाला किंमतही भरपूर आहे. या प्रकारे दुष्काळी भागात हे झाड शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे.

कवठाचे संगोपन
आजच्या काळामध्ये कवठ हे झाड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आज कोठेही हे झाड पहायला मिळत नाही. आपण कवठ खाल्लेले कित्येक वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे आता या झाडाचे संगोपन करणे ही आजच्या काळाची गरच बनली आहे. या झाडाचे फक्त बी लावले तरी हे झाड आपोआप वाढते. याला कधीही पाणी द्यावे लागत नाही किंवा याचे रक्षण करण्याची गरच नाही. पक्षांच्या विष्ठामधून या झाडाच्या बिया सर्वत्र टाकत असतात. त्यामुळे पाऊस पडला की असंख्य झाडे उगतात. फक्त ही झाडे जपणे गरजेचे आहे. रवळगावमध्ये नागर उद्यान प्रकल्पात आम्ही 20 झाडे लावली आहेत. आज ती मोठी झाली आहेत तसेच मी माझ्या शेतातसुद्धा एक झाड कवठाचे लावले आहे. आज तेही वेगाने वाढत आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पडीक जागेवर, बांधावर हे झाड लावले पाहिजे. नागर फाउंडेशन, रवळगावच्यावतीने आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की, सर्वांनी एक एक कवठाचे झाड लावावे व त्याचे संगोपन करावे. हे झाडं तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला निरोगी, आनंदी, समाधानी जीवन प्रदान करेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!