Management of crops, orchards in drought : अवर्षणात पिकांचे, फळबागांचे नियाेजन कसे कराल?
1 min read🎯 रब्बी हंगामातील सद्यस्थिती
राज्यात रब्बी हांगामातील सरासरी क्षेत्र 53.97 लाख हेक्टर आहे. राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा 46 टक्के कमी पाऊस झाला. राज्यात सरासरी 207.6 मि.मी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात मात्र 111.3 मि.मी पाऊस झाला. जुलैमध्ये 330.9 मि.मी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 39 टक्के जास्त म्हणजे 458.9 मि.मी पाऊस पडला. ऑगस्टमध्ये 62 टक्के कमी पाऊस झाला असून, या महिन्यातील पावसाची सरासरी 286 मि.मी. असली तरी प्रत्यक्षात 107.9 मि.मी. पाऊस झाला. सप्टेंबरमधील पावसाची सरासरी 179.7 मि.मी. असली तरी प्रत्यक्षात 29 टक्के जास्त म्हणजे 231.4 मि.मी पाऊस पडला. पावसाळ्यात राज्यात सरासरी 999.2 मि.मी. पाऊस पडतो. यंदा 965.7 मि.मी. म्हणजेच सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पाऊस पडला आहे. 75 टक्क्यांहून कमी पाऊस पडलेल्या राज्यातील नऊ जिल्ह्यात रब्बी हांगामातील पेरण्यांमध्ये मोठी घट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदाच्या वर्षी मोसमी वारे माघारी परतताना पाऊस पडला नाही. बिगर मोसमी पाऊस अपेक्षित प्रमाणात झाला नाही. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. 21 सप्टेंबरला सूर्य विषवृत्तावर येतो. सुर्याला विषृवृत्त ओलांडून जाण्यासाठी 45 दिवसांचा काळ लागतो. या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात सूर्याची उष्णता जास्त मिळते. निरभ्र आकाश आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याने कमाल तापमान वाढते. यंदा 25 ऑक्टोबरपर्यंत तापमान वाढ कायम हाेती.
🎯 राज्यातील पाण्याची स्थिती
राज्यात पडलेला अपुरा पाऊस, विहिरी,कूपनलिकांची खालावलेली पाणी पातळी आणि सिंचन प्रकल्पातील पाणी शेतीसाठी वापरण्यावर असलेल्या मर्यादा पाहता यंदाच्या रब्बी हंगामावर पाणी टंचाईचे गांभीर संकट निर्माण झाले आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी वापरण्यावर मर्यादा येणार आहे. राज्यातील बहुतांश धरणातील पाणी फारसे शेतीच्या वाट्याला येण्याची शक्यता नाही. कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
🎯 अपुऱ्या पाण्याचा रब्बी हंगामावर होणार परिणाम
यंदाच्या रब्बी हंगामावर पाणी टंचाईचे सावट असल्याने एकूण पेरणीक्षेत्रात घट येण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. कमी पाण्यावर येणारी पिकांच्या पेरणीत वाढ होण्याचा शक्यता निर्माण झाली आहे. करडई, ज्वारी, हरभरा या पिकांची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे. जास्त पाणी लागणाऱ्या गव्हाच्या पेरणीक्षेत्रात घट हाेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कोरडवाहू क्षेत्रात पेरण्याची शक्यता कमी आहे. सिंचनाची सोय असलेल्या क्षेत्रात पेरण्या होतील, असा अंदाज आहे. परंतु, पीक निघेपर्यंत पाण्याची कमतरता भासणार आहे. भारतीय हवामान विभागाने डिसेंबरपर्यंत एल-निनोची (El Nino) स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी, हिवाळा सरासरीपेक्षा उष्ण राहू शकतो. एल निनोचे रुपांतर सुपर एल निनोत (Super El Nino) झाल्यास पुढील मोसमी पावसाच्या हंगामावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर महाराष्ट्रात पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगामातील कांदा लागवड क्षेत्रात अडचणी येणार आहेत तसेच फळबागा कशा वाचवायच्या हा प्रश्न उभा ठाकणार आहे. मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या कमी होतील. पश्चिम महाराष्ट्रात डाळींब या फळ पिकास पाणी कमी पडत आहे. द्राक्ष बागांच्या ऑक्टोबर छाटण्या पाण्याअभावी खोळांबल्या आहेत. विदर्भात कापूस आणि तूर पिकाला जानेवारीपर्यंत पाण्याची गरज आहे. ही पिके निघेपर्यंत पाणी तळ गाठणार आहे. रब्बीत कमी पाण्यावर येणार पिके घ्यावी लागणार आहे. अशा अवर्षणग्रस्त परिस्थितीत पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी काही उपाययोजना निश्चितपणे उपयोगी ठरतील.
🎯 पिकांमध्ये अवर्षणाचा ताण कमी करण्यासाठी करावयाच्या आवश्यक बाबी
🔆 संरक्षित पाणी देणे.
🔆 पिकांची आंतर मशागत व कोळपणी करणे.
🔆 आच्छादनाचा वापर करणे.
🔆 परावर्तकाचा वापर करणे.
🔆 फवारणीद्वारे खतांचा वापर करणे.
🔆 पाण्याची फवारणी करणे.
🔆 हेक्टरी रोपांची संख्या कमी करणे.
🔆 पानांची संख्या कमी करणे.
🎯 सद्यस्थितीत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी उपाययोजना
सध्या उभ्या असलेल्या पिकांच्या महत्त्वाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पिकास एक किंवा दोन पाणी द्यावे. अवर्षणाच्या कालावधीत पीक वाचविण्यासा संरक्षित पाणी देणे. यामध्ये दोन गोष्टी अधोरेखित होतात.
🔆 एक प्रथम म्हणजे पिकांच्या कार्यसाधक मुळांच्या कक्षेतील ओलावा पूर्णपणे संपलेला असतो व पीक सुकण्यास सुरुवात झालेली असते. तसेच मातीतील ओलावा कमी झाल्यामुळे जमिनीस भेगा पडण्यास सुरुवात झालेली असते.
🔆 दुसरे म्हणजे उपलब्ध पाण्याच्या साठ्यात अत्यल्प पाणी असते. अशा परिस्थितीत हलके पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी 10 सें.मी. पेक्षा कमी पाणी बसू शकत नाही. अशा परिस्थिती जेव्हा पीक सुकण्यास सुरुवात झालेली असते.जमिनीला भेगा पडलेल्या असतात व पाणी साठ्यात थोडेच पाणी उपलब्ध असते, तेव्हा हलके पाणी सर्व शेतात समप्रमाणात देवून पीक वाचविण्यासाठी तुषार सिंचन हे एक हुकमी अस्र आहे.
🎯 पिकांमध्ये आंतर मशागत व कोळपणी
सध्या उभ्या पिकांच्या दोन ओळीमध्ये वारंवार कोळपणी करावी, जेणे करून बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारा जमिनीतील ओलावा थाांबविण्यास मदत होईल तसेच काही पिकांमध्ये खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ज्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहू शकेल तसेच काही पिकांना भर लावावी. त्यामुळे पाण्याच्या पाळीमध्ये अंतर ठेवून संरक्षित आणि प्रमाणशीर पाणी बसण्यास मदत होते.
🎯 फवारणीद्वारे खतांचा वापर
सद्यस्थितीत पाणीपुरवठा अपुरा असल्याने जमिनीतील ओलावा कमी होतो. पिके कोमजतात. पानाांचे तापमान वाढते व पानांच्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ जाते व पानातील अन्नाश तयार करण्या क्रिया मंदावते. अशावेळी पाण्याचा ताण सहन करण्यासाठी 2 टक्के युरिया किंवा 1.5 टक्के पोटॅशियम नायट्रेटची पिकांवर फवारणी केल्यास दुष्काळी परिस्थितीत पिकांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते.
🎯 परावर्तकाचा वापर
अवर्षणप्रवण (drought) कालावधीत सूर्याच्या उष्णतेमुळे पिकांच्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. ते कमी करण्यासाठी केओलीन 6 ते 8 टक्के या प्रमाणात (600 ते 800 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यातून) पानांवर फवारणी केल्यास सूर्यप्रकाश पानांवरून परावर्तीत होऊन पिकांद्वारे होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत हो. पर्यायाने पाण्याची बचत होऊन अवर्षण कालावधीत पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
🎯 पिकांमध्ये/फळझाडांमध्ये आच्छादन
पिकांमध्ये आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. त्यासाठी ज्वारीचे धसकटे, गव्हाच भुसा, टाकाऊ कडबा, पालापाचोळा, उसाचे पाचट, प्लास्टिक पेपरचा वापर करता येतो. फळझाडांमध्ये (Orchard) झाडांच्या बुध्यांभोवती किंवा ओळीतील पिकांसाठी 2.5 सें.मी जाडीच्या हेक्टरी 5 टन आच्छादनाचा थर द्यावा. यामुळे दोन पाण्याच्या पाळीमध्ये अंतर वाढण्यास मदत होते.
🎯 अवर्षण कालावधीत रोपांची संख्या/पानांची संख्या कमी करणे
अवर्षण कालावधी वाढल्यास रोपाांची जमिनीतील ओलावा, अन्नाशसाठी अनिष्ट स्पर्धा वाढते आणि ओलावा कमी पडल्यास किंवा सर्व पिकांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी विशेषत: फुलोरा ते दाणे भरण्याच्या वेळी रोपांची संख्या 1/3 प्रमाणात किंवा अवर्षणाच्या तीव्रतेनुसार 25 ते 50 टक्क्यांनी कमी करावी. अवर्षण कालावधीत पिकातील अंतरंगातून मोठ्या प्रमाणात निष्कासन होते. ते थोपविणयासाठी ताटांवरील खालील पाने कमी करावी आणि वरील 4 ते 5 पाने ठेवावी. त्यामुळे अवर्षणाचा ताण कमी होणयास मदत होईल.
🎯 अवर्षणापासून फळबागा वाचविण्यासाठी…
🔆 आच्छादनाचा वापर.
🔆 परावर्तकाचा वापर.
🔆 ठिबक सिंचनाचा वापर.
🔆 मडका सिंचन.
🔆 अर्ध्या आळ्यास पाणी देणे.
🔆 सलाईन बाटल्यांचा वापर.
🔆 शक्य असल्यास बहार बदलणे.
🎯 मडका सिंचन
कमी क्षेत्रातील व जास्त अंतरावरील फळझाडाांना ही पाणी देण्याची पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. या पद्धतीत लहान झाडाांना साधारणत: दोन ते तीन वर्षाकरीता 5 ते 7 लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत. जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरीता 10 ते 15 लिटर पाणी बसेल अशी मडकी वापरावीत. मडकी शक्यतो जादा मछद्राांकित किंवा आढीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे मछद्र पाडावे व त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. प्रत्येक झाडास दोन मडकी जमिनीत खड्डा खोडून बसवावीत. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी. त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे 70 ते 75 टक्के पाण्याची बचत होते.
🎯 फळझाडांमध्ये आच्छादनाचा वापर केल्यास होणारे फायदे
आच्छादनाचा उपयोग केल्यास पावसाचा जमिनीवर पडण्याचा वेग मंदावतो आणि जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरले जाते. आच्छादनाच्या वापरामुळे जमिनीची धूप कमी होते. आच्छादनामुळे जमिनीतील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग मंदावतो आणि ओलावा जमिनीत जास्त काळ टिकतो. तणाांच्या वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. जमिनीत योग्य तापमान राखण्यास मदत होते. जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते अथवा जमिनीस भेगा पडणयाचा कालावधी लाांबतो. आच्छादनाच्या वापराने दिलेल्या खतांचा जास्त कार्यक्षमतेने उपयोग करून घेता येतो. उन्हाळी हंगामात दोन पाण्याच्या पाळ्यातील कालवधी वाढविता येतो.जमिनीत सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. आच्छादनामुळे पिकांची वाढ चाांगली होऊन उत्पादनातही वाढ होते.