krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Wheat Sowing Technology : बागायती गहू लागवड तंत्रज्ञान

1 min read
Wheat Sowing Technology : गव्हाच्या (Wheat) अधिक उत्पादनासाठी वेळेवर पेरणी (Sowing), योग्य वाणांची निवड व वापर (Selection and use of varieties), पेरणीची योग्य पद्धत (Proper method of sowing), खतांचा समतोल वापर, योग्य पाणी व्यवस्थापन (Water management) व पीक संरक्षण या बाबींचा अवलंब करताना लागवड खर्चात फारशी वाढ न होता नेटक्या व्यवस्थापन कौशल्याने गव्हाच्या उत्पादनात साधरणपणे 20 टक्के वाढ सहज शक्य आहे.

🎯 जमीन आणि पूर्व मशागत
गव्हाच्या लागवडीकरिता पाण्याचा चांगला निचरा होणारी व भारी जमीन योग्य असते. परंतु, हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर भरखते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येते. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमीन भुसभुशीत असणे जरुरीचे असते. कारण, अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांचे व पाण्याचे व्यवस्थित शोषण होते. खरीपाचे पिक निघाल्यावर लोखंडी नांगराने खोलवर (20-25 सें.मी.) नांगरट करावी. नांगरट झाल्यावर हेक्टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे. जमिनीची दोन वेळा कुळवणी करावी.

🎯 पेरणीचा काळ
🔆 बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर केलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सें.मी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
🔆 पेरणी उभी-आडवी अशा दोन्ही बाजूंनी न करता ती एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.
🔆 जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

🎯 वाणांची निवड आणि बीजप्रक्रिया
🔆 पेरणीसाठी फुले समाधान ( एनआयएडब्लू-1994), तपोवन (एनआयएडब्लू-917), गोदावरी (एनआयएडब्लू-295), त्र्यंबक (एनआयएडब्लू-301), एमएसीएस-6122 हे वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावेत. बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान, एनआयएडब्लू-34 या वाणाची पेरणी करावी.
🔆 महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात बागायती वेळेवर (1 ते 15 नोव्हेंबर) तसेच उशिरा (15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पेरणीसाठी सरबती गव्हाचा फुले समाधान (एनआयएडब्लू-1994) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. वेळेवर पेरणीखाली उत्पादन 46.12 क्विंटल प्रति हेक्टर तर उशिरा पेरणीखाली उत्पादन 44.23 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
🔆 हे वाण तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम आहे. टपोरे व आकर्षक प्रथिनांचे प्रमाण 12.5 ते 13.8 टक्के, चपातीची प्रत उत्कृष्ठ व प्रचलित वाणांपेक्षा सरस प्रचलित वाणांपेक्षा 9 ते 10 दिवस लवकर येतो.
🔆 गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्राम अॅझोटोबॅक्टर व 250 ग्राम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.

🎯 खत व्यवस्थापन
🔆 बागायती गहू वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास, जमीन ओलवून घ्यावी. वापसा आल्यानंतर जमीन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे.
🔆 रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि बियाणे दोन चाद्याच्या पाभरीने 22.5 सें.मी अंतरावर पेरावे. पाभरीने पेरणी एकेरी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ जाते.
🔆 पेरणी करताना प्रति हेक्टरी(120:60:40 किलाे प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश ) 60 किलो नत्र, म्हणजेच 130 किलो युरिया, 60 किलो स्फुरद म्हणजेच 375 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 40 किलो पालाश म्हणजेच 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी 130 किलो युरिया प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.
🔆 बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने 18 सें.मी. अंतरावर पेरावे.
🔆 पेरणी करतेवेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (90:60:40 किलाे प्रति हेक्टर नत्र, स्फुरद व पालाश) म्हणजेच 98 किलो युरिया, 375 किलो सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट व 67 किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता 98 किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.

🎯 आंतरमशागत
🔆 बागायत वेळेवर आणि उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी. पीक कांडी अवस्थेत आले की, मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. त्यामुळे पिकांची नासाडी जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.
🔆 गव्हामधील तण नियंत्रणासाठी, उगवणीपूर्वी ऑक्सिफ्लोफेन हे तणनाशक 425 मिली प्रति हेक्टरी किंवा पेडिमिथॅलीन हे तणनाशक 2.5 किलोग्राम प्रति हेक्टरी 750 लिटर पाण्यात मिसळून पेरणी केलेल्या क्षेत्रावर एकसमानपणे फवारावे. तसेच या तणनाशकाची फवारणी करणे शक्य न झाल्यास विशेषतः द्विदल वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 27 ते 35 दिवसा दरम्यान 2-4 डी (सोडीयम क्षार) हे तणनाशक 1.0 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
🔆 फवारणीच्या वेळी तणे 2-4 पानांच्या अवस्थेत असावीत, याची काळजी घ्यावी. तसेच 2-4 डी फवारणी करताना हे तणनाशक आजूबाजूच्या इतर विशेषतः दिविदल वर्गीय पिकांवर उडणार नाही, याची काळजी घ्यावी.
🔆 तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा. पॉवर स्प्रे वापरू नये.

🎯 पाणी व्यवस्थापन
🔆 बागायती गव्हासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाणी व्यवस्थापन करावे. भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
🔆 मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने 7 पाळ्या द्याव्यात.
🔆 हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 8 ते 10 पाळ्या द्याव्यात. परंतु पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.
🔆 जर एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी गव्हास पाणी द्यावे.
🔆 दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
🔆 तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी 20 ते 22, दुसरे 42 ते 45 व तिसरे 60 ते 65 दिवसांनी द्यावे. अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाचे ऊत्पादन घ्यावे.

©️ डॉ. आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
संपर्क :- 9404032389
मेल :- aditakate@gmail.com

©️ डॉ. अविनाश गोसावी
सहयोगी प्राध्यापक,
मृद शास्रज्ञ कृषी महाविद्यालय, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!