Bor/Ber tree : बोर… आनंददायी वृक्ष!
1 min read🌳 झाडांची कत्तल
सन 1990 नंतरच्या काळात आधुनिक शेतीच्या नावाखाली या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. जमिनी बागायत करताना ही झाडे अडसर ठरल्यामुळे तोडावी लागली. आर्थिक फायदा लक्षात घेता न आल्यामुळे ही झाडे तोडण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल होता व आजही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तोड झाली की, घरी बोरे खाण्यासाठी एकही झाड शेतकऱ्यांनी ठेवले नाही. त्यामुळे निसर्गाची एक परिसंस्था उद्ध्वस्त झालेली आहे. आज आपण या झाडांचे महत्त्व समजावून घेऊ!
🌳 प्राचीन वृक्ष
बोर हा मूळचा भारतीय वृक्ष आहे. अतीशय प्राचीन काळापासून हा भारतात सर्वत्र आढळतो. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी या झाडांचा उल्लेख आलेला आहे. रामायणामध्ये शबरीने रामाला बोरे खाण्यास दिले असा प्रसंग आहे. महाभारतामध्ये राजा परिक्षीत यांचा मृत्यू बोरातून निघालेल्या अळीचा साप झाला व साप त्यांना चावला असा उल्लेख आहे. भागवत लिहीत असताना कर्दम ऋषी बोरांच्या फळांची न्याहरी करत असा उल्लेख आहे. स्कंद पुराणामध्ये विष्णू नारायण हे बद्री येथे तप करत असताना, माता लक्ष्मी त्यांच्या मागून येते व ओळखू येऊ नये, यासाठी बोरीच्या झाडाचे रूप घेऊन त्यांच्यावर सावली धरते असा उल्लेख आहे. यावरून हे झाड प्राचीन काळापासून आपल्याकडे आहे हे दिसून येते.
🌳 साहित्यातील महत्त्व
भारतीय साहित्याला या झाडाने भुरळ घातलेली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये विविध प्रकारच्या साहित्य रचना या झाडावर झालेल्या आहेत. मराठीमध्ये संत साहित्यात यावर विपुल साहित्य आहे. संत तुकाराम महाराज लिहितात..
यज्ञ मुखे खोड्या काढी l कोण गोडी बोरांची ll
आधुनिक साहित्यात देखील यावर अनेक कथा, कविता लिहिल्या आहेत. ना. धो. महानोर लिहितात…
अशी लकाकली बोर, अंगभर चंद्रकोर, ऊस मळ्याच्या गर्दीत, थोडे सांडले केशर.
अशा प्रकारे हे झाड साहित्याचा आधार आहे. आजही यावर विविध प्रकारे लेखन सूरू आहे.
🌳 पर्यावरणीय महत्त्व
बोर या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे झाड अनेक कीटकांचे निवासस्थान आहे. या झाडावर मुंगळे, मुंग्या व इतर अनेक कीटक राहतात. पक्षी व प्राण्यांचे हे आवडते झाड आहे. अनेक पक्षी या झाडावर आपली घरटी करतात, तर अनेक बोरे खाण्यासाठी येतात. शेळी, मेंढी यांचे हे सर्वोत्तम आवडीचे खाद्य आहे. याचा पाला हे आवडीने खातात. या झाडाला प्रचंड फुलोरा येत असतो. या फुलोऱ्यावरती मधमाश्या कायम घोंघावत असतात. या झाडाचा बीजप्रसार पक्षांच्या व प्राण्याच्या विष्ठेतून होत असतो. पाऊस पडला की, आपल्याला सगळीकडे बोरी उगलवलेल्या दिसतात. हे झाड असे आहे की, मुळापासून जरी तोडले आणि याची छोटीसी मुळी जर जमिनीत राहिली तर ते परत वाढण्यास सुरुवात होते. प्राचीन काळात वराहमिहीर हे थोर निसर्ग संशोधक होऊन गेले. त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये बोरीच्या झाडाचे वर्णन केलेले आहे. बोरीचे झाड हे जनिमिमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर मुरऊन साठा करून ठेवते. त्यामुळे जेथे बोरीचे झाड असेल, तेथे पाण्याचा साठा असतो, असे त्यांनी सांगितले आहे. आजही अनेक जलतज्ज्ञ यांनी हे सिद्ध केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव देखील असाच आहे की, बोरीच्या झाडापाशी जमिनीत पाणी असते. यामुळे आपण जर आपल्या शेतात बोरीची झाडेलावली तर जमिनीतील पाणी साठा वाढून आपण पाण्याची समस्या कमी करू शकतो.
🌳 बोरीचे अर्थशास्र
आजच्या काळात जर पहिले तर बोरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देण्यासाठी हे झाड उपयुक्त आहे. बोरीच्या अनेक जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. सध्या ॲपल बोराची लागवड भारतात मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये बोर चांगली येते. बोरीच्या फळबागा आता वाढतं आहेत, याचबरोबर गावरान बोरांनाही प्रचंड मागणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देण्यासाठी हे झाड एक पर्याय आहे. बोरीचे लाकूड हे कठीण, टिकाऊ व मजबूत असते. या लाकडापासून घरासाठी लागणारे साहित्य, फर्निचर बनते. अनेक व्यवसायात लागणारे साधने व साहित्य, लहान मुलांची खेळणी, स्वयंपाकातील साधने, पोळपट, दही करायचा रवी, भाकरी करण्याची काटवट, चाटू अशा वस्तू कारण या खूप दिवस टिकतात. त्ययामुळे या लाकडाला सोन्याचा भाव मिळतो.
🌳 आहारातील महत्त्व.
बोरं मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. या बोरापासून बोरकुट, लोणचे, मद्यनिर्मिती, जाम, ज्यूस कोशिंबीर, चटणी बनविली जाते. मकरसंक्रांत या सणाला खेंगाटमध्ये बोरे टाकली जातात. बोरांमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. हे शरीराला पोषक असते. गर्भवती महिलांना बोरे खूप आवडतात, त्यांना यामधून ऊर्जा मिळत असते.
🌳 आयुर्वेदिक महत्त्व
प्राचीन काळापासून बोराचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जात आहे. तोंडातील जखमा, अल्सर भरून येण्यासाठी फळांचा चांगला उपयोग होतो. वाळलेली बोरांची फळे रेचक म्हणून उपयोगी पडतात. बाळंतपणावेळी वेदनांची तीव्रता कमी व्हावी, मळमळ कमी करण्यासाठी फळे खायला दिली जातात. बोरं रोगप्रतिकारशक्ती वाढवितात. बोरांचे सेवन मानसिक तणाव दूर करते. बोरांचा रस आणि मिरी पावडरपासून सर्दीवरील औषध बनवतात. अतिसार, थकवा, भूक न लागणे, सर्दी, शीतज्वर, त्वचा कोरडी होणे, त्वचा काळवंडणे, त्वचेवरील सुरकुत्या न येऊ देणे, अस्थमा, मधुमेह इत्यादींवर बोरे उपयुक्त ठरतात. पचनशक्ती सुधारण्यासही बोरांचे सेवन उपयुक्त ठरते. बोरांतील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे आणि दातांच्या मजबूतीकरणास मदत करते. याखेरीज वजन कमी करणे, हृदयरोगापासून बचाव, रक्तदाबावर नियंत्रण, निद्रानाशापासून मुक्ती, केसवृद्धी, मेंदूविकारापासून मुक्ततेसाठी बोरांचे सेवन उपयुक्त मानले जाते. यकृताचा त्रास, अस्थमा, ताप या आजारावर बोरीची पाने वापरून उपाय केले जातात. अशा प्रकारें बोरे अनेक औषधी गुणधर्म असलेले झाड आहे.
🌳 धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
बोरीचे झाड प्राचीन काळापासून भारतात माहीत आहे. अनेक कथा या झाडाच्या भोवती निर्माण झालेल्या आहेत. शबरीने रामाला बोरे खायला दिली किंवा इतर अनेक कथा आहेत. मकरसंक्रांतीच्या आधी एक दिवस बोराचा वापर भाजीत केला जातो. मकरसंक्रांतीला महिला बोराचा वापर वानात करतात. या दिवशी सर्व देवांना वऊसा मध्ये बोरे अर्पण केली जातात. लहान मुलांना बोरंस्नान घालण्याची प्रथा आहे. यावेळी मूलांना बोरांनी आंघोळ घातली जाते, यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते, ते त्यांच्यावर निसर्गाचा संस्कार होतो, अशी मान्यता आहे. विविध सण, उत्सव यामध्ये बोरांचा वापर करून गोडधोड पदार्थ बनविले जातात.
🌳 बोरीचे संवर्धन
आधुनिक काळामध्ये गावरान व देशी बोरीचे झाडें नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आधुनिक जातींची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु, आपल्या आरोग्यासाठी, निसर्गासाठी, जमिनीमध्ये भूजल वाढविण्यासाठी, या झाडांचे जतन, संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. ही झाडे लावण्याची व त्यांना पाणी देण्याची, त्यांना रक्षण देण्याची काहीही गरज नाही. कारण ही झाडे सगळीकडे आपोआप उगवत असतात. त्यांना काटे असल्यामुळे त्यांचे रक्षण होते. जमिनीतील खोलवरील पाणी घेण्याची ताकद असल्यामुळे याला पाणी देण्याची गरज नसते. फक्त या झाडाची तोड थांबली पाहिजे. तोड थांबली की, ही झाडे आपोआप वाढणार आहेत. नागर फाउंडेशनने गावामध्ये, डोंगरावर, माळावर अशी अनेक झाडे राखली आहेत, ती आता वेगाने वाढत आहेत. सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या शेतात एक तरी गावरान बोरीचे झाड ठेवा. आपल्या शेतातील अनेक अडचणी हे झाड कमी करेल.