Pumpkin : जिभ नव्हे, मन तृप्त करणारा रानमेवा!
1 min readउन्हाळ्यात थंड, पावसाळ्यात, हिवाळ्यात ऊबदार, अशा या कोट्यावर अनेक रानभाज्याचे वेल सोडलेले असायचे. त्यात सर्वाधिक टिकणारा वेल म्हणजे लाल भोपळ्याचा आणि लाल भोपळा (Red Pumpkin) म्हणजे लै लै गुणकारी, चविष्ट रानभाज्यातलं
फळ! हा सुगरणीच्या हातात पडला की, याच्या भाजीपासून ते खीरपर्यंत याचा प्रवास. आत्म्याला लै सुख देणारा. याची खीर जिभेवर अशी रेंगाळते, त्याचा स्वाद कोणत्याही फ्रेजमध्ये बसत नाही, एवढा शब्दातीत असतो. माझी आई मला आवडते भोपळ्याची खीर म्हणून हा भोपळा सांभाळून ठेवायची. मी गावी आलो की, भोपळ्याच्या खिरेचा एकदम फँटास बेत व्हायचा.
हा भोपळा कितीही मोठा असू शकतो. तो चिरला की, आतून लाल असतो. त्याच्या बारीक फोडी करून तो अगोदर पूर्णपणे पाण्यात टाकून उकडून घ्यायचा. तो पूर्ण उकडला की, त्याच्या फोडीचा त्याकाळी वरवंट्याखाली एकदम बारीक करुन घ्यायचा. त्यात विलायची टाकायची, त्यात गुळ टाकायचा आणि दूध टाकून ते शिजवून घ्यायचं. मग त्याची होते खीर! आहा… आहा.. आणि ताटात वाढेपर्यंत धीर धरायचा. चमचा मिळाला लवकर तर ठीक नाहीतर हातानीचं. साला ते सुख अनमोल हो. जिभेवर ज्या वेळी ही खीर रेंगाळतेना. आहा तो सांगून नाही अनुभवावा लागतो स्वाद तरच कळेल. आज बायकोनी खीर केली म्हणून खाण्याचा आणि न राहून लिहण्याचा प्रपंच.. तुम्ही वाचून गोड मानून घ्या!