October hit : ऑक्टोबर हिट मावळतीकडे अन् पहाटेचा गारवा उगवतीकडे
1 min read
October hit : महाराष्ट्रात गुरुवार (दि 26 ऑक्टोबर) नंतर अपेक्षित असलेल्या ऑक्टोबर हिट(October hit)चा उतरतीकडे कल जाणवू लागला असून, पहाटेच्या गारव्यात कमालीची वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा कमी जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिकपासून सोलापूरपर्यंतच्या 10 जिल्ह्यात 2 ते 5 डिग्रीने खालावले असून, सध्या कमाल तापमान सरासरी इतके जाणवत आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
ईशान्य वाऱ्याचा वाढता जोर व उत्तर भारतात जोरदार बर्फबारी अभावी महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे, असे अजून तरी म्हणता येणार नाही. परंतु, निरभ्र आकाश व कमी होत असलेली आर्द्रता तसेच उच्च दाब क्षेत्राची खालावत असलेली घनता यामुळे महाराष्ट्रात नकळत उन्हाची काहिली कमी झाली आहे. वातावरण उबदार जाणवत आहे. प्राथमिक अवस्थेतील रब्बी पिकांसाठी ही वातावरणीय परिस्थिती आल्हाददायक भासत आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्रात सध्या कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.