Varieties of Hurda Sorghum : हुरड्याच्या ज्वारीचे वाण व लागवड तंत्रज्ञान
1 min read🎯 दाण्यांचे वैशिष्ट्ये
साधारणपणे मकरसंक्रांतीपासून हुरडा निघण्यास सुरुवात होते. राज्यात हुरडा सिझन 45 ते 60 दिवस चालतो. चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिरव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करताे. हिरव्या दाण्याचा हुरडा अतिशय स्वादिष्ट लागतो. कारण त्यावेळेला या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या आचेवर भाजले असता दाण्यातील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन कॅरमलायझेशनमुळे दाण्यास एक प्रकारची स्वादिष्ट चव प्रप्त होते. यामध्ये लिंबू, मीठ, साखर ,तिखट, मसाला यासारखे पदार्थ वापरून त्यांची चव द्विगुणीत करता येते. खास हुरड्यासाठी गोड,सर रसाळ आणि भरपूर दाणे असणारे वाण राज्यातील कृषी विद्यापीठांनी निर्माण केले आहेत.
🎯 ज्वारीच्या हुरड्याचे महत्त्व
🔆 तंतुमय पदार्थांने संतृप्त.
🔆 लोह, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस यांनी समृद्ध.
🎯 हुरड्याचे सुधारीत वाण
❇️ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर यांनी विकसित केलेले वाण.
✳️ फुले मधुर (आर.एस.एस.जी.व्ही.-46)
🔆 प्रसारण वर्ष 2014.
🔆 उत्कृष्ट प्रतिचा व चवदार हुरडा.
🔆 या वाणाचे खोड मध्यम, गोड, रसरशीत.
🔆 हा वाण उंच व पालेदार.
🔆 हुरडा अवस्था येण्यास 93 ते 98 दिवस लागतात.
🔆 हुरडा अवस्थेत दाणे सहज सुटण्याचे प्रमाण हे 95 टक्क्यांपेक्षा जास्त.
🔆 खोडमाशी, किडी, खडखड्या रोगास प्रतिकारक.
🔆 अवर्षणास प्रतिकारक.
🔆 हुरड्याचे उत्पादन 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 कडब्याचे उत्पादन 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर.
✳️ फुले उत्तरा
🔆 प्रसारण वर्ष 2005.
🔆 स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित.
🔆 हुरड्याची अवस्था येण्यास 90 ते 100 दिवस.
🔆 भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात.
🔆 सरासरी 70 ते 90 ग्राम इतका हुरडा मिळतो.
🔆 हुरडा चवीस सरस अत्यंत गोड.
🔆 ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
🔆 कणीस गोलाकार, मध्यम घट्ट.
🔆 मध्यम उंचीचा, पाने पालेदार.
🔆 खोड मध्यम, गोड रसरशीत.
🔆 खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
🔆 हुरडा उत्पादन 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 कडब्याचे उत्पादन 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
✳️ एसजीएस 8-4
🔆 हुरडा रुचकर आणि गोड.
🔆 हुरड्याची प्रत उत्तम.
🔆 कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात.
🔆 इतर हुरड्याच्या वाणापेक्षा याचा दाणा टपोरा.
🔆 हुरडा उत्पादन 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 कडब्याचे उत्पादन 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टर.
❇️ परभणी वसंत (पीव्हीआरएसजी-109)
🔆 प्रसारण वर्ष 2021.
🔆 खाण्यास चवदार, गोड, मऊ.
🔆 कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात.
🔆 हुरड्याची अवस्था येण्यास 95 दिवस.
🔆 खोडमाशी, खोड कीड व खडखड्या रोगास सहनशील.
🔆 दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम.
🔆 हुरडा उत्पादन 34 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 कडब्याचे उत्पादन 133 ते 135 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 मराठवाडा विभागासाठी शिफारस.
❇️ डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
✳️ ट्रॉम्बे अकोला सुरुची (टी.ए.के.पी.एस.-5)
🔆 प्रसारण वर्ष 2022.
🔆 मळणीस अतिशय सुलभ.
🔆 हुरड्याची प्रत उत्तम, चवदार.
🔆 हुरडा तयार होण्याचा कालावधी 91 दिवस.
🔆 हुरड्याचे उत्पादन 43 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 हिरवा चारा उत्पादन 110 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 महाराष्ट्रासाठी प्रसारित.
❇️ खरीप हंगामातील हुरडा वाण
✳️ पी.डी.के.व्ही. कार्तिकी (वाणी-103)
🔆 हुरडा चवदार आणि गोड.
🔆 हुरडा 82 ते 84 दिवसांत तयार.
🔆 मीज माशीच्या प्रादुर्भावाला बळी पडत नाही.
🔆 हुरडा उत्पादन 42 ते 43 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 विदर्भासाठी प्रसारित.
✳️ पी.के.व्ही. अश्विनी (वाणी-11/6)
🔆 हुरडा 82 ते 84 दिवसांत तयार.
🔆 हुरडा मळणीस सुलभ.
🔆 हुरडा अधिक गोड व चवदार.
🔆 दाण्यात साखरेचे प्रमाण अधिक.
🔆 मीज माशी प्रतिकारक.
🔆 हुरडा उत्पादन 42 ते 43 क्विंटल प्रति हेक्टर.
🔆 स्थानिक वाण :- सुरती, गुळभेंडी, कुची कुची, काळी दगडी, वाणी, मालदांडी
🎯 हुरडा ज्वारी लागवड तंत्रज्ञान
🔆 जमीन :- मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी.
🔆 पूर्वमशागत आणि मृद व जलसंधारण :- रब्बी हंगामात हुरडा वाणाची पेरणी करण्यासाठी मशागत करावी. ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची नांगरट केल्यास जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. त्याकरिता पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीची बांध बंदिस्ती करावी. सारा यंत्राने वाफे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने बांधणी करावी. त्यामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाफ्यात साचून जमिनीत मुरण्यास मदत होते.
🎯 पेरणीची योग्य वेळ
🔆 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान. खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व भरपूर उत्पादन मिळण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. लवकर पेरणी केली तर (15 सप्टेंबर अगोदर) खोडमाशीमुळे मोठ्या प्रमाणात पोंगे मर होते. उशिरा पेरणी केल्यास जमिनीचा ओलावा कमी झाल्यामुळे बियाण्याची उगवण कमी होते. आर्थिक फायद्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड करावी. मात्र, कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासठी बीजप्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून 15 दिवसाच्या अंतराने नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यापर्यंत पेरणी शक्य.
🔆 पेरणी अंतर व हेक्टरी बियाणे :- दोन ओळीतील अंतर 45 से.मी. व दोन रोपातील अंतर 15 से.मी. ठेवावे. पेरणीकरिता हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे.
🔆 हुरडा वाण :- खरीप लागवडीसाठी वाण :- पीडीकेव्ही कार्तिकी (वाणी-103), पीकेव्ही अश्विनी (वाणी-11/6)
🔆 रब्बी लागवडीसाठी वाण :- फुले मधूर, एसजीएस 8-4, परभणी वसंत, ट्रॉम्बे अकोला सुरुची.
🔆 स्थानिक वाण :- सुरती, गुळभेंडी, कुची कुची, काळी दगडी, वाणी, मालदांडी.
🎯 बीज प्रक्रिया
🔆 प्रति किलो बियाण्यास 4 ग्राम गंधक चोळावे. त्यानंतर 25 ग्राम प्रत्येकी ॲझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.
🔆 थायोमिथोक्झॅम (70 टक्के) 3 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यास खोडमाशीमुळे होणारी पोंगे मर कमी होते.
🎯 खत व्यवस्थापन
🔆 मध्यम जमिनीत पेरणी करताना प्रति हेक्टरी 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद म्हणजेच 87 किलो (सर्वसाधारणपणे दोन गोण्या) युरिया व 125 किलो (सर्वसाधारणपणे अडीच गोणी) एसएसपी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे.
🔆 भारी जमिनीत पेरणी करते वेळी प्रति हेक्टरी 60 किलो नत्र व 30 किलो स्फुरद म्हणजेच 130 किलो युरिया (सर्वसाधारणपणे अडीच गोणी) व 187 किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे पावणे चार गोणी) द्यावे.
🔆 बागायती ज्वारीसाठी, मध्यम व खोल जमिनीसाठी जमिनीकरिता प्रति हेक्टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश म्हणजेच 174 किलो युरिया (सर्वसाधारणपणे साडेतीन गोणी), 250 किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे पाच गोणी) व 67 किलो एमओपी (सर्वसाधारणपणे सव्वा गोणी) याप्रमाणे खते द्यावीत.
🔆 बागायती ज्वारीच्या पेरणीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी पहिली खुरपणी झाल्यावर साधारणपणे द्यावे.
🔆 भारी जमिनीत प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. त्याकरिता 217 किलो युरिया (सर्वसाधारणपणे सव्वाचार गोण्या), 308 किलो एसएसपी (सर्वसाधारणपणे सहा गोणी) व 84 किलो एमओपी (सर्वसाधारणपणे पावणे दोन गोणी) द्यावे.
🔆 पेरणी करते वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र द्यावे. उर्वरित नत्र साधारणपणे पेरणीनंतर एक महिन्यांनी पहिली खुरपणी झाल्यावर द्यावे.
🔆 कोरडवाहू रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी 50:25:25 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे. त्याकरिता साधारणपणे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी या प्रमाणे खतांची मात्रा द्यावी.
🎯 आंतर मशागत
🔆 ज्वारीची उगवण झाल्यावर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करावी. पिकाच्या सुरुवातीच्या 35 ते 40 दिवसात पीक ताणविरहित ठेवावे.
🔆 पेरणीनंतर आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी करावी आणि तीन वेळा कोळपणी करावी.
🔆 पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी.
🔆 दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यांनी पासच्या कोळप्याने करावी. त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो.
🔆 तिसरी कोळपणी आठ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजवण्यास मदत होऊन जमिनीतील ओल्याव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
🎯 पाणी व्यवस्थापन
🔆 कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना 50 ते 55 दिवसांनी द्यावे.
🔆 दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
🔆 बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी द्यावे.
🔆 पेरणी नंतरचे व्यवस्थापणामुळे उत्पादनात 20 टक्के भरीव वाढ होते.
🎯 काढणी
🔆 काढणी अंगठा व बोटाच्या मध्ये ज्वारीचा दाणा दाबून पाहिल्यास किंचित बाहेर येते. दाणे मऊसर लागतात. झाड फुलोऱ्यात आल्यानंतर 15 ते 25 दुधासारखा द्रव दिवसात ही अवस्था येते. या टप्प्यावर दाण्यामध्ये स्टार्च वेगाने साचत असते.
🔆 या अवस्थेत एकूण धान्य वजनाच्या 50 टक्के एवढे असते. पुढे हुरड्याच्या अवस्थेत दाण्यामध्ये ते प्रमाण 65 ते 68 टक्के एवढे असते.
हुरडा अवस्थेमधील कणसे आणल्यानंतर कणसे खुडून ती हाताने चोळावेत. हाताने चोळल्यानंतर त्यामधील दाणे सहज वेगळे होऊ शकतात.
🔆 साठवणूक हुरडा 4 अंश सेल्सिअस तापमानात साठवल्यास 30 दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो.
🎯 रासायनिक खतांचा वापर
जमिनीच्या प्रकारानुसार खालील रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
🔆 मध्यम (45-60 से.मी खाेली) :- कोरडवाहू – नत्र (युरिया) 40 (87), स्फुरद (एसएसपी) 20 (125), पालाश (एमओपी) 00.
🔆 मध्यम (45-60 से.मी खाेली) :- बागायती – नत्र (युरिया) 80* (174), स्फुरद (एसएसपी) 40 (250), पालाश (एमओपी) 40 (67).
🔆 भारी (60 सें.मी. पेक्षा जास्त) :- कोरडवाहू – नत्र (युरिया) 60 (130), स्फुरद (एसएसपी) 30 (188), पालाश (एमओपी) 00.
🔆 भारी (60 सें.मी. पेक्षा जास्त) :- बागायती – नत्र (युरिया) 100* (217), स्फुरद (एसएसपी) 50 (313), पालाश (एमओपी) 50 (84).
🔆 नत्र दोन हफ्त्यात (पेरणीवेळी अर्ध व पेरणीनंतर एक महिन्याने अर्ध), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे.
🔆 कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश (50:25:25 किलो / हेक्टरी) दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
🎯 सारंगपूर, नरसापूर हुरडा उत्पादनासाठी प्रसिद्ध
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सारंगपूर व नरसापूर ही गावे हुरडा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. कमी पाण्यात हलक्या जमिनीत हमखास उत्पादन देणारा सुरती व गूळभेंडी हुरडा ही या भागाची विशेष ओळख आहे. या पंचक्रोशीत सुमारे 1,000 हून अधिक एकरावर हुरड्याचे पीक घेतले जाते. गंगापूर तालुक्यातील या पट्ट्यात पिकणारा हुरडा राज्याच्या सर्व भागात विक्रीसाठी पोहोच केला जातो. हुरडा सीझननुसार 150 ते 350 रुपये प्रती किलो दर्जानुसार आहे. यातून कोटीची उलाढाल डिसेंबर ते फेब्रुवारी या 45 ते 50 दिवसांत होते.