krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Import duty on oranges : निर्यात शुल्कमुळे कांदा तर बांगलादेशच्या आयात शुल्कमुळे संत्रा उत्पादक संकटात!

1 min read
Import duty on oranges : केंद्र सरकार शेतमालाच्या निर्यातीला प्राेत्साहन देण्याऐवजी शेतमालाची शुल्कमुक्त आयात (Duty Free Import) करून तसेच निर्यातबंदी व निर्यात शुल्क (Export duty)लादून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी साेडत नाही. सरकारने शेतमालाच्या निर्यातीला सबसिडी (Export Subsidy) देणे गरजेचे असताना अलीकडे कांद्याच्या (Onion) निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याचे दर पाडले. त्यातच बांगलादेशने यावर्षी नागपुरी संत्र्यावरील (Nagpuri oranges) आयात शुल्कमध्ये (Import duty) तब्बल 440 टक्क्यांनी वाढ केल्याने संत्र्याची निर्यात अर्ध्यावर आली आहे. हा तिढा साेडविण्यासाठी 100 टक्के निर्यात सबसिडी देणे गरजेचे असताना केंद्र सरकार व संत्रा पट्ट्यातील लाेकप्रतिनिधी काहीही करायला तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाेबत संत्रा उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत.

🌏 नागपुरी संत्रा निर्यातीची पार्श्वभूमी
आंबट-गाेड चव, आकर्षक नारिंगी रंग, चकाकणारी साल आणि साेलून खाण्यास अत्यंत साेपा असल्याने नागपुरी संत्र्याने जगभरात एक वेगळी ओळख अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र, संत्र्याच्या निर्यातीसाठी सरकारी पातळीवरून आजवर प्रभावी प्रयत्न करण्यात आले नाही. संत्रा निर्यातीचा पहिला प्रयत्न महाराष्ट्राचे तत्कालिन पणनमंत्री श्री गणपतराव देशमुख यांनी सन 2003-04 मध्ये केला. त्यावर्षी श्री गणपतराव देशमुख यांच्या पुढकाराने युराेपीन राष्ट्रांमध्ये 7 तर दुबईमध्ये 8 असा एकूण 15 कंटेनर संत्रा निर्यात करण्यात आला हाेता. युराेपीय राष्ट्रांमध्ये कीटकनाशक अंश मुक्त (Residue free) शेतमालाला विशेष प्राधान्य दिले जात असल्याने तसेच प्रयाेगशाळेत शेतमालाची तपासणी करून त्यांना रेसिड्यू फ्री प्रमाणपत्र द्यावे लागत असल्याने अडचणी निर्माण झाल्या. एअर कार्गाे उपलब्ध नसणे, युराेपीन व आखाती राष्ट्रांमध्ये जहाजाद्वारे संत्रा पाठविण्यास बरेच दिवस लागणे, संत्र्याचे सेल्फ लाईफ कमी असल्याने त्याच्या वाहतुकीसाठी एअर कूल्ड बाॅक्स व प्री कूल्ड कंटेनरची आवश्यकता असणे यासह अन्य बाबींमुळे संत्रा निर्यातीला अडचणी येऊ लागल्या. या अडचणी साेडवून निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे केंद्र व राज्य सरकारने आजवर लक्ष न दिल्याने संत्रा निर्यातीसाठी युराेपीय व आखाती राष्ट्रांऐवजी शेजारच्या राष्ट्रांचा पर्याय पुढे आला.

🌏 बांगलादेशचा पर्याय
युराेपीयन व आखाती देशात संत्रा निर्यातीची आशा मावळत असतानाच बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांचा पर्याय पुढे आला. कारण, श्रीलंका वगळता इतर तीन देशांमध्ये राेडने संत्रा पाठविणे सहज शक्य आहे. शिवाय, या देशांमध्ये रेसिड्यू फ्री प्रमाणपत्राचीही (Residue Free Certificate) आवश्यकता नाही. सन 2005 मध्ये भारत व बांगलादेशमधील संत्रा निर्यातदार (Orange exporter) व आयातदारांची (Importer) बैठक पार पडली. या बैठकीला भारतीय संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा अपेडाचे (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) संचालक श्री माेहनराव ताेटे, बांगलादेशमधील आयातदार संघटनेचे अध्यक्ष इसराम अली प्रामुख्याने उपस्थित हाेते. या बैठकीत बांगलादेशने संत्रा आयातीला हिरवी झेंडी दाखविल्याने सन 2005 पासून खऱ्या अर्थाने बांगलादेशात संत्रा निर्यात व्हायला सुरुवात झाली.

🌏 संत्र्याचे उत्पादन व निर्यात
विदर्भात किमान 2.50 लाख हेक्टरवर संत्र्याच्या बागा आहेत. संत्रा लागवडीत अमरावती जिल्हा आघाडीवर असून, या जिल्ह्यात 85 हजार हेक्टरवर संत्रा बागांची लागवड करण्यात आली आहे. या बागांपासून विदर्भात दरवर्षी सरासरी 12 ते 15 लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन हाेते. यातील 30 टक्के म्हणजेच 3.60 ते 4.50 लाख मेट्रिक टन फळे ही निर्यातक्षम असतात. सन 2019-20 पर्यंत बांगलादेशात सरासरी 1.50 लाख मेट्रिक टन संत्रा निर्यात केला जायचा. मार्च 2020 मध्ये जगभर काेराेनाची लाट आली आणि संत्रा निर्यातीला काही काळासाठी ब्रेक लागला. त्यानंतर सन 2021-22 पासून पुन्हा बांगलादेशात संत्रा निर्यात सुरू झाली.

🌏 आयात शुल्क
सन 2019-20 पर्यंत बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्याच्या आयातीवर फारसा आयात शुल्क लावला नव्हता. नंतर मात्र आयात शुल्क लावून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. या आयात शुल्कमध्ये सुरुवातीला 50 टक्के वाढ करण्यात आली. पाच वर्षात ही वाढ 440 टक्क्यांवर पाहाेचली.
वर्ष आयात शुल्क
🔆 2019-20 :- 20 रुपये प्रति किलाे.
🔆 2020-21 :- 30 रुपये प्रति किलाे.
🔆 2021-22 :- 51 रुपये प्रति किलाे.
🔆 2022-23 :- 63 रुपये प्रति किलाे.
🔆 2023-24 :- 88 रुपये प्रति किलाे.

🌏 आयात शुल्कचे परिणाम
बांगलादेश सरकारने संत्र्यावर 88 रुपये प्रति किलाे आयात शुल्क लावल्याने तेथील किरकाेळ बाजारातील संत्र्याचे दर वाढले व ते सर्वसामान्य बांगलादेशी नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे तेथील बाजारात संत्र्याची मागणी असूनही विक्री मंदावली. त्याचा परिणाम संत्र्याच्या निर्यातीवर झाला. सरासरी 1.50 लाख मेट्रिन संत्र्याची निर्यात अर्ध्यावर म्हणजेच 60 ते 70 हजार मेट्रिक टनावर आली.

🌏 देशांतर्गत बाजारातील दर काेसळले
संत्र्याची निर्यात अर्ध्यावर आल्याने हा संत्रा देशांतर्गत बाजारात विकण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर 2023 मध्ये असलेले संत्र्याचे दर 62,000 ते 70,000 रुपये प्रति टनावरून ऑक्टाेबर 2023 मध्ये 20,000 ते 25,000 रुपये प्रति टनापर्यंत खाली आले. संत्र्याची निर्यात आधीप्रमाणे पूर्ण क्षमतेने सुरू असती तर हेच दर ऑक्टाेबर 2023 मध्ये किमान 30,000 ते 35,000 रुपये प्रति टन असते. निर्यात अर्ध्यावर आल्याने संत्रा उत्पादकांना प्रति टन किमान 10,000 रुपये नुकसान सहन करावे लागत आहे. हा संत्रा देशांतर्गत बाजारात विकावा लागताे. देशांतर्गत बाजारातील संत्र्याची मागणी कायम असून, पुरवठा वाढल्याने दर काेसळले आहे. याचा फटका संत्रा बागायतदारांना बसत असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

🌏 आठ महिने बाजारात असणारे फळ
संत्राचे सेल्फ लाईफ कमी असून, नाशिवंत फळ असले तरी ते आठ महिने बाजारात असणारे फळ आहे. संत्र्याचे अंबिया व मृग असे दाेन बहार घेतले जाते. ऑक्टाेबर ते जानेवारी या चार महिन्यात अंबिया तर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात मृग बहाराचा संत्रा बाजारात असताे. दरवर्षी श्रीगणेश उत्सव काळात बागांमधील झाडांवरील फळांचे वजन कमी करण्यासाठी विरळणी केली जाते. हा संत्रा सहसा ऑगस्टमध्ये बाजारात येताे. दक्षिण भारतात या अर्धवट नारिंगी हिरव्या सालीच्या संत्र्याला माेठी मागणी असते. या काळात बाजारात संत्र्याचा पुरवठाही कमी असताे. त्यामुळे दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये संत्र्याला चांगले दर मिळतात.

🌏 केंद्र सरकारची अनास्था
बांगलादेश सरकारने संत्र्यावर लावलेला आयात शुल्क कमी करण्यासाठी किंवा निर्यातीला सबसिडी देण्याच्या मागणीसाठी आपण पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाशी 14 वेळा पत्रव्यवहार केला. बांगलादेश सरकारशी वाटाघाटी करण्याबाबत तेथील भारतीय उच्चायुक्तांना जानेवारी 2023 मध्ये निर्देश दिले आहे, हे एकच उत्तर केंद्र सरकारकडून वारंवार मिळत आहे. केंद्र सरार ही समस्या साेडविण्याबाबत गंभीर नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष श्री धनंजय ताेटे यांनी व्यक्त केली. यावर्षी फळगळीमुळे संत्रा उत्पादकांचे माेठे नुकसान झाले आहे. त्यातच निर्यात मंदावल्यामुळे नागपुरी संत्र्याचे दर काेसळले आहेत. या दराला उभारी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संत्रा निर्यातीला 100 टक्के सबसिडी द्यावी, अशी मागणी महाऑरेजचे संचालक श्री मनाेज जवंजाळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!