Medicinal plant Neem : औषधांचा राजा… कडुनिंब!
1 min read🔆 झाडाची रचना
कडुनिंबाचे झाड आकाराने खूप मोठे होते. त्याला अमर्यादित आयुष्य लाभलेले आहे. या झाडाचे खोड सरळ उच्च वाढते. या खोडाला अनेक फांद्या फुटतात. या फांद्यांना छोट्या छोट्या फांद्या येतात. या फांद्यांवर याला पाने लागतात. ही पाने छोट्या काड्यांना समांतर अंतरावर दोन्ही बाजूंनी जोडलेली असतात. हा वृक्ष गोलाकार आकारात वाढत जातो. फेब्रुवारीमध्ये या झाडाची पानगळ होते. मार्चमध्ये या झाडाला फुले येतात. एप्रिलमध्ये त्यातून फळे येतात. या फळांमधून या झाडाची नवीन रोपे उगवतात. याप्रमाणे याचे चक्र सुरू राहते.
🔆 साहित्यातील महत्त्व
प्राचीन काळापासून साहित्यामध्ये या झाडाचे उल्लेख आढळताे. वेदांमध्ये या झाडाविषयी सविस्तर वर्णने आढळतात. कथा, कादंबऱ्या, इतिहास, बालगीते, गाणी अशा सर्वच साहित्यात कडुनिंबाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झालेला आहे. इंदिरा संत आपल्या कवितेत सांगतात की… ‘माहेर किती जवळ डोळे उघडताच वेशीवरला कडुनिंब पावलांवर मोहोर ढाळतो.’ मानवी जीवनातील प्रत्येक प्रसंगात कडुनिंबाचा वावर कोठे ना कोठे आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे मराठी साहित्य कडुनिंबाच्या वर्णनानी समृद्ध झालेले आहे.
🔆 पर्यावरणीय महत्त्व
निसर्गामध्ये कडुनिंब हे झाड सर्वाधिक उपयोगी झाड आहे. निसर्गामध्ये मित्र किडींना संजीवनी देणारे व शत्रू किडींचां नयनाट करणारे हे झाड आहे. हे झाड दिवसा आणि रात्री असे 24 तास ऑक्सिजन सोडते. हे झाड हवेतील विषारी वायू, धूलिकण शोषून घेते. त्यामुळे वातावरण स्वच्छ होण्यास मदत होते. हे झाड हवेतील आद्रता शोषते व झाडाला पाने दाट असल्यामुळे ते गार सावली देते. हवेतील उष्णता कमी करते. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणार मुरविते. घरासमोर जर हे झाड असले तर, घराभोवताली वातावरण स्वच्छ व उत्साही ठेवते.
🔆 आयुर्वेदिक महत्त्व
आयुर्वेदामध्ये या झाडाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. या झाडाला औषधांचा राजा (King of Medicines) असे नाव प्राचीन ग्रंथामध्ये दिलेले आहे. या झाडाची पाने, फुले, फळे, साल, मुळ्या या सर्व औषधी (Medicinal) गुणधर्मांनी युक्त आहेत. केसांचे विकार, दातांचे विकार, पोटाचे विकार, सांधेदुखी, मुतखडा, संसर्गजन्य रोग, त्वचारोग, वात, पित्त, कफ, खोकला अशा विविध रोगांवर हे झाड उपयोगी आहे. या झाडापासून आजही अनेक औषधे बनतात. शेतीसाठी देखील अनेक औषधे यापासून बनतात. शेतीमधील सर्व रोगांवर हे झाड प्रभावी गुणकारी आहे.
🔆 आहारातील महत्त्व
या झाडाची चव कडू असल्याने याचा कोणी आहारात उपयोग करत नाही. परंतु, या झाडाचा आपल्या आहारात जर रोज समावेश केला तर आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे. गुढी पाडवा या सणाला या झाडाची पाने व फुले गुळात मिसळून खाण्याची प्रथा आहे. ही प्रथा आपल्याला या झाडाचे आहारातील महत्त्व आपल्याला सांगत आहे. रोज या झाडाची 2 पाने जर सकाळी खाल्ली तर शरीरात उत्साह वाढतो. निंबाच्या काडीने दात घासले तर ते स्वच्छ होतात. या पद्धतीने आपण या झाडाचा रोजच्या आहारात उपयोग करू शकतो.
🔆 अर्थशास्रीय महत्त्व
कडुनिंबाचे लाकूड मजबूत, कठीण व टिकाऊ असते. प्राचीन काळापासून घरे बनविण्यासाठी, शेतीची अवजारे व इतर कामांसाठी या लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. प्राचीन काळातील मोठ मोठे वाडे, किल्ले यांच्या बांधकामात या लाकडांचा वापर झालेला आहे. हजारो वर्षापूर्वीची दरवाजे, लाकडे आजही जशीच्या तशी आपल्याला आज पहायला मिळतात. त्यामुळे या लाकडाला आज खूपच किंमत आलेली आहे. त्यापासून विविध औषधे बनतात. यामुळे त्यासाठीही याची मागणी आहे. यांच्या फळापासून (निंबाेळ्या) खते, साबण, शाम्पू बनविले जातात. यामुळे हे झाड शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न देण्यास सक्षम आहे.
🔆 कडुनिंबाचे संवर्धन
कडुनिंबाची झाडे सर्वत्र विपुल प्रमाणात आढळत असली तरी या झाडाची कत्तल आज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माझ्या लहानपणी आमच्या गावात शेकडो वर्ष जुनी असंख्य झाडे होती. आज फक्त चिंतामणी महादेव मंदिरासमोर एकच झाड राहिले आहे, ते पण देवस्थान असल्यामुळे! शेतातील सर्व झाडे मागील 20 वर्षात तोडली गेली आहेत. नवीन झाडे मोठ्या प्रमाणावर उगवत आहेत. परंतु, ती ठेवली जात नाहीत. माळरान व डोंगरात आलेली झाडे जनावरे चरताना मोडली जात आहेत. त्यामुळे या झाडांचे रक्षण केले तर याचे संवर्धन आपोआप होईल. नागर फाऊंडेशन मागील 4 वर्षापासून या झाडांचे रक्षण करत आहे. आपणं डोंगरावर 500 झाडे लावून ती मोठी केली आहेत. अनेक झाडांना संरक्षण देऊन त्यांना वाढविण्याचे कार्य सुरू आहे. सर्वांनी आपल्या घरासमोर एक तरी कडुनिंब लावलाच पाहिजे. हे झाड तुम्हाला प्रसन्न, आनंदी व निरोगी जीवन प्रदान करेल!