Thorn tree… Acacia : काटेरी वृक्ष… बाभूळ!
1 min read
आउली सारी माया,
अन् बाभळी सारी छाया असावी’…
🔆 बाभळीच्या जाती
बाभूळ हा वृक्ष उष्ण कटिबंधात येणारा आहे. खडकाळ जमिनी, वाळवंट, कमी पावसाचा परिसर, अशा ठिकाणी हे झाड मोठ्या प्रमाणावर आढळते. संपूर्ण भारतात हे झाडं सगळीकडे आढळते. हे झाड आपोआप कोठेही उगवते आणि वाढते. हे काटेरी झाड असल्यामुळे त्याला रक्षणाची गरज नसते. भारतामध्ये या झाडांच्या अनेक जाती पहायला मिळतात. आपल्याकडे रामकाठ, देवबाभूळ, झुडुपी बाभूळ, वेडी बाभूळ, या जाती पहायला मिळतात. कोरडवाहू जमिनीत येत असल्याने त्याला पाण्याची गरज नसते. पूर्वीपासून ही विपुल प्रमाणात झाडे आपल्याकडे होती. अनेक गावांची नावे या झाडावरून आजही आहेत. परंतु दिवसेंदिवस ती झाडे कमी होताना दिसत आहेत.
🔆 पर्यावरणीय महत्त्व
बाभूळ हे झाड कोरडवाहू, खडकाळ, मुरमाड, वाळवंट अशा ठिकाणी कोणतीही मेहनत न घेता आपोआप येते. निसर्ग त्याची सर्व व्यवस्था करतो. याच्या मुळ्या जमिनीत पाण्याचा शोधात खोलवर जातात. यामुळे पावसाचे पाणी खोल जमिनीत जाण्यास मदत होते, तसेच हे झाड मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा जमिनीत करते. या झाडावर जे काटे असतात, ते पाण्याचे बाष्पीभवन होऊ देत नाहीत. गरज पडल्यास हे काटे हवेतील बाष्प शोषून घेतात. बाभूळ अनेक पक्षी आणि प्राण्यांसाठी एका वसाहतीची भूमिका निभावते. या झाडावर, विविध प्रकारच्या मुंग्या, मुंगळे, पाच ते सहा प्रकारचे कीटक, रातकिडे, सरडे, खारी अशा प्राण्यांचे ते महत्त्वाचे वसाहतीचे ठिकाण असते.
🔆 बाभळीचे अर्थशास्त्र
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा, टणक पाठ
वारा खात, गारा खात, बाभुळ झाड उभेच आहे.
कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे या झाडाचे लाकूड अतिशय मजबूत व टिकाऊ असते. पूर्वीच्या काळापासून शेतीमध्ये लागणारे सर्व औजारे याच लाकडपासून बनविली जातात. घर बांधण्यासाठी याच लाकडाचा वापर होतो. या झाडाला अतीशय चविष्ट असा डिंक निघतो. या डिंकाचे लाडू व इतर पदार्थ बनविले जातात. रंग बनवण्यासाठी डिंकाचे उपयोग होतात. या झाडाच्या शेंगापासून विविध आयुर्वेदिक उत्पादने बनविली जातात. या झाडाचा पाला शेळ्या आवडीने खातात. तसे पाहिले तर हे झाड अर्थशास्त्रीय बाजूने दुर्लक्षित राहिलेले आहे. यामुळे यांचे महत्त्व समाजाला अजूनही समजले नाही. याच कारणांमुळे हे झाड तोडून टाकण्याकडे लोकांचा कल जास्त आहे.
🔆 बाभळीचे आयुर्वेदिक महत्त्व
‘बब्बुलस्तुवर: शीत: कुष्ठकासामयापह:l आमरक्तातिसारघ्न पित्ताशरेदाहनाशन्:ll
बाभळ हे झाड विविध गुणकारी गुणधर्मांनी युक्त असे झाड आहे. या झाडाची साल काढून तिची भुकटी करून जखमेवर लावली जाते. दातांचे सर्व प्रकारचे आजार हे झाड दूर करते. याच्या शेंगांपासून दंत मंजन बनविले जाते. हे दातांना मजबुती देते. डोळ्यांच्या विविध प्रकारांच्या आजारांवर हे गुणकारी आहे. पोटाचे आजार, सर्व प्रकारचे लैंगिक आजार, त्वचा विकार, रक्ताचे आजार, गर्भाशयाचे आजार, अशा विविध आजारांवर या झाडाचे पाने, फुले, शेंगा, साल गुणकारी आहे.
🔆 बाभळीचे आहारातील महत्त्व
बाभळ हे झाड शक्यतो आहारात कोणी वापरत नाही. सर्दी खोकला, सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, थकवा, यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी याच्या शेंगाची पावडर एक चमचा पाण्यातून घेतल्यावर गुण येतो. बाभळीच्या काडीने दात घासल्यास दात शुभ्र होतात. याच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास तोंडाचे विकार दूर होतात. जुलाब, अतिसार, मधुमेह यामध्ये सालीची पावडर करून पाण्यातून रोज घेतली तर गुण येतो. यामुळे आपण जर रोजच्या आहारात या झाडाचा वापर केला तर अनेक फायदे होतील.
🔆 बाभळीच्या झाडाविषयी अफवा
बाभूळ हे काटेरी झाड आहे. यामुळे ते कोणाला आवडत नाही. शक्यतो या झाडाच्या जवळ कोणी जात नाही. या झाडाचा आर्थिक काहीही उपयोग नाही. हे झाड जमिनीत वसावा निर्माण करते. शेतामध्ये काटे (Thorn) होतात. घरासमोर असेल तर ते कमकुवत असल्यामुळे वादळात घरावर पडेल. जमिनीत पडले की, अनेक रोपे उगवतात. या भीतीमुळे या झाडाची प्रचंड वृक्षतोड झाली. अशा अफवांमुळे ही झाडे वेगाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
🔆 बाभळीचे संगोपन
या झाडाचे संगोपन करण्यासाठी या झाडाचे रक्षण करणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण निसर्गामध्ये ही झाडे मोठ्या प्रमाणावर उगवतात, वाढतात, त्यांचे रक्षण झाले तर ती मोठी होतील. जंगल, गायरान अशा ठिकाणी या झाडांच्या बिया टाकल्या आणि चाराईबंदी केली तर ही झाडे मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी एक झाड तरी आपल्या शेतामध्ये ठेवावे व त्याचे रक्षण करावे. नागर फाऊंडेशन, रवळगाव बाभूळ या झाडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जंगल खात्याच्या जमिनीवरती आपण अनेक बिया लावल्या आहेत. या झाडांचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या झाडांचे फायदे लोकांना सांगण्यासाठी प्रबोधन, प्रचार, प्रसार या मार्गाने आपण कार्य करत आहोत.
🔆 शेवटी जाता जाता
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभूळ झाड उभेच आहे….
आजही बाभळी चे काटेरी सुंदर उंच झाड आमच्या शेतातील घरासमोरील बांधावर दिमाखात उभे आहे .