Cold & rainy weather forecast : देशात थंडीची चाहूल, राज्यात मात्र पाऊस
1 min read🔆 या भागांसाठी पावसाचे 24 तास
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये मधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुले राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे. ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते. मुंबईत तुलनेनं हवामान दमट राहणार असून, सकाळ आणि दुपारच्या वेळी उष्णतेचा दाह अधिक तीव्र जाणवणार आहे. कोकण किनारपट्टी भागात मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
🔆 मान्सून परतीच्या वाटेवर
सध्या दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंडमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधूनही मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागणार आहे. IMD च्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढलेला असेल. तर उत्तर हिमालय क्षेत्रामध्ये काही भागांमध्ये पावसाच्या हजेरीसोबतच काही ठिकाणांवर तापमानाचा आकडाही कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये काही ठिकाणांवर पावसाची रिमझिम असू शकते. तर, बहुतांश भागात तापमान अपेक्षेहून कमी नोंदवले जाऊ शकते. येत्या काळात देशाच्या उत्तरेकडील थंडीची (Cold) ही चाहूल महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार असल्यामुले हवामानाचे एकंदर रूप बदलणार आहे.