krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sharad Joshi and the Marshall Plan : शरद जोशी आणि मार्शल प्लॅन

1 min read
Sharad Joshi and the Marshall Plan : वेगवेगळ्या प्रसंगी लोकांच्या गाठीभेटी घेत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, सर्वदूर अशी समजूत करून घेण्यात आली आहे की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस साहेब यांना 'मार्शल प्लॅन' (Marshall Plan) नावाची शेतकऱ्यांच्या समुच्च उद्धाराची काही एक योजना सादर केली आहे. ही गोष्ट अत्यंत दिशाभूल करणारी आहे.

मी, फक्त हिंदुस्थानातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपियन समूहातील दोस्त राष्ट्रांची जी परिस्थिती झाली होती, तिच्याशी तुलना करून ती राष्ट्रे जशी पूर्णतः विनाशाकडे गेली होती तसेच आपले शेतकरीही संपूर्णतः विनाशाप्रत गेले आहेत, हे लक्षात घेता किरकोळ आणि जुजबी उपायांनी काही जमणार नाही, याकरिता अमेरिकेने दोस्त राष्ट्रांच्या उत्थानाकरिता जसा ‘मार्शल प्लॅन’ आखला, त्या धर्तीवर काहीतरी व्यापक योजना घ्यायला पाहिजे, अशी कल्पना फक्त मुख्यमंत्र्यांना सुचवली.

त्याची अंमलबजावणी कशी करायची, याची काही रूपरेखा मी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. त्यात शेतकऱ्यांची वीजबिलांसह संपूर्ण कर्ज मुक्ती, किमान 3 लाख कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करणे, शेतीमालावरील सर्व नियंत्रणे हटवून शेतीमालाची व शेतीनिविष्ठांची बाजारपेठ खुली करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मुभा असणे, उपयुक्त व कार्यक्षम संरचना स्थापित करणे अशा काही मुद्द्यांचा, जे मी वेळोवेळी वर्तमानपत्रांच्या व दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींसमोरही मांडले आहेत, समावेश आहे.
आता त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे काम अर्थातच त्यांना करायचे आहे.

@ शरद जोशी,
17 सप्टेंबर 2015

🎯 पूर्वपीठिका
12 डिसेंबर 2015 ला शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी (Sharad Joshi) यांचे निधन झाले. या आधी 1979 पासून शेतकरी प्रश्नावर चाकण येथे सुरू केलेली छोटीशी चळवळ देशभर पोचली. या चळवळीतून शेती शोषणाचा लेखाजोखा त्यांनी समर्थपणे मांडला. ‘इंडिया आणि भारत’ हे आर्थिकदृष्ट्या दोन वेगळे देश आहेत, अशी मांडणी त्यांनी केली. ‘शेतीमालाला रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी चाललेली ही चळवळ 1992 च्या आर्थिक सुधारणांनंतर ‘आर्थिक खुलीकरणाशी’ येऊन भिडली. मात्र, शेतीसाठी खुलीकरण व स्वातंत्र्य आलेच नाही.

वातावरण बदल, पूर दुष्काळ आदी अस्मानी संकटांबरोबर सुलतानी संकटे वाढत गेली. शेतीचे अधिक तुकडे, न फिटणारी कर्जे, थकीत वीजबिले, जाचक सरकारी बंधने होतेच. शिवाय, शहरी पक्ष व संघटना ‘भाववाढीबद्दल’ पूर्वीपासून विरोधी व आक्रमक होत्याच. जोशींच्या हयातीत शक्य ते सर्व प्रयत्न करूनही शरद म्हणजे 2014 पर्यंत शेतकरी आत्महत्यात वाढ होऊन शेती-समस्या इतकी जटील झाली की, शरद जोशी यांना भारतीय शेतकरी लढाई हरतोय अशी खात्री झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर विजयी राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रांच्या पुनर्वसनासाठी ‘मार्शल प्लॅन’ नामक आर्थिक मदतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या मार्शल प्लॅनमुळे पराभूत उद्ध्वस्त राष्ट्रांतून तिसऱ्या महायुद्धाची बीजारोपण होण्याची शक्यता समंजस मार्शल प्लॅनमुळे टळली. याच धर्तीवर वाढत्या शेतकरी आत्महत्या उद्ध्वस्त शेती अर्थव्यवस्थेमुळेच होत आहेत. ‘पराजित व शोषित भारतासाठी’ नवा आर्थिक कार्यक्रम नसेल तर ग्रामीण भारतच नव्हे तर संपूर्ण देशच आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महासंकटात सापडेल, अशी त्यांना भीती वाटत होती. आपल्या सहकाऱ्यांबरोबर अशा योजनेची ते चर्चा करीत होते. या काळात ते अत्यंत आजारी होते, तरीही इमेलवर त्यांनी एक टिपण पाठवले होते. या आधारे आम्ही ‘भारत उत्थान कार्यक्रम’ ही पुस्तिका तयार केली आहे.

मार्शल प्लॅनची संकल्पना शरद जोशींची असली तरीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचेकडून हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आ. शरद जोशींच्या कल्पनेतील मार्शल प्लॅनमधील तपशील आम्ही तयार केले आहेत. ते आदर्श आणि अंतीम नाहीत. यानंतरही आलेल्या सूचनांचा विचार करून ‘मार्शल प्लॅन’ दुरुस्त करून अधिक परिपूर्ण करण्यास संपादक मंडळ बांधील आहे.
(क्रमश:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!