krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Export ban on Non Basmati rice : आता बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी

1 min read
Export ban on Non Basmati rice : देशांतर्गत बाजारातील धान्याच्या किमती (Grain prices) नियंत्रित ठेवण्यासाठी नरेंद्र माेदी सरकारने गव्हासाेबत बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या (Non Basmati rice) निर्यातीवर बंदी (Export ban) घातली आहे. देशातील अन्न सुरक्षा सुनिश्चत करणे तसेच या तांदळाची अवैध निर्यात राेखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी ते संयुक्तिक वाटत नाही. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर 9 सप्टेंबर 2022 पासून 20 टक्के निर्यात शुल्क (Export duty) लावला हाेता. आता या वाणाच्या निर्यातीवर 20 जुलै 2023 पासून बंदी घातली आहे.

बिगर बासमती पांढऱ्या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लावला असताना 1 एप्रिल ते 17 ऑगस्ट 2023 या काळात (निर्यातबंदी असलेला तुटलेला तांदूळ वगळता) 73.3 लाख टन तांदळाची निर्यात झाली हाेती. मागील वर्षी म्हणले 1 एप्रिल ते 17 ऑगस्ट 2022 या काळीत ही निर्यात 63.7 लाख टन एवढी हाेती. त्यामुळे या तांदळाच्या निर्यात 15.06 टक्क्यांनी वाढली आहे. साेबतच बिगर बासमती सेला (para boiled) आणि बासमती तांदळाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. या दोन्ही जातींच्या तांदळाच्या निर्यातीवर बंधन घालण्यात आलेले नाही. बिगर बासमती सेल तांदळाची निर्यात 21.18 टक्क्यांनी वाढून 32.9 लाख टन झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 27.2 लाख टन तांदळाची निर्यात झाली होती. बासमती तांदळाच्या निर्यातीत 9.35 टक्के वाढ झाली आहे. चालू वर्षात 18.6 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली असून, मागील वर्षी निर्यात 17 लाख टन एवढी होती.

केंद्र सरकारने 9 सप्टेंबर 2022 पासून बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क लावला आणि 20 जुलै 2023 पासून त्यावर निर्यात बंदी लावण्यात आली. विशेष म्हणजे, या तांदळाची निर्यात 4.36 टक्क्यांनी वाढून 19.7 लाख टनावर गेली. गेल्या वर्षी याच कालावधीत 18.9 लाख टन तांदूळ निर्यात करण्यात आला हाेता, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार सन 2022-23 च्या रब्बी हंगामात देशात 158.95 लाख टन तांदळाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. जे सन 2021-22 रब्बी हंगामाच्या तुलनेत 13.84 टक्क्यांनी कमी असून, सन 2021-22 च्या रब्बी हंगामात 184.71 लाख टन तांदळाचे उत्पादन झाले होते.

आशियाई देशांमध्ये भारतीय तांदळाला भरीव मागणी आहे. सन 2022-23 मध्ये थायलंडसह इतर प्रमुख धान उत्पादक देशांमध्ये तांदळाचे उत्पादन घटले हाेत. एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तांदळाच्या किमती गेल्या वर्षीपासून सतत वाढत आहेत. जुलै 2023 मध्ये FAO तांदूळ किंमत निर्देशांक 129.7 अंकांवर पोहोचला. सप्टेंबर 2011 नंतरचा हा उच्चांक होता. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात 19.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तांदळाच्या किमतीच्या तुलनेत भारतीय बाजारातील तांदळाच्या किमती कमी असल्याने भारतीय तांदळाची मागणी वाढली हाेती. त्यामुळे सन 2021-22 व 2022-23 मध्ये तांदळाची विक्रमी निर्यात करण्यात आली.

बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या चुकीच्या वर्गीकरण आणि बेकायदेशीर निर्यातीबाबत विश्वासार्ह ग्राउंड रिपोर्ट प्राप्त झाले आहेत, असे केंद्र सरकारने स्पअ केले आहे. सेला (परबोल्ड) तांदूळ आणि बासमती तांदळाच्या एचएस कोड अंतर्गत बिगर बासमती पांढर्‍या तांदळाची निर्यात सरकारने नोंदविली आहे. Agricultural and Processed Food Products Export Development Authority (APEDA) बासमती तांदळाच्या निर्यातीचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे. त्यांच्याकडे आधीपासूनच वेब-आधारित प्रणाली आहे. त्यामुळे बासमती तांदळाच्या नावाने बिगर बासमती पांढर्‍या तांदळाची संभाव्य बेकायदेशीर निर्यात रोखण्यासाठी आणखी उपाययोजना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने काही निर्देश दिले आहेत…

🔆 1,200 डाॅलर प्रति टन आणि त्याहून अधिक मूल्याच्या बासमती तांदळाच्या निर्यातीचे करार केवळ नोंदणी-सह-वाटप प्रमाणपत्र (RCAC) जारी करण्यासाठी नोंदणीकृत केले जावेत.
🔆 प्रति टन 1,200 डाॅलरपेक्षा कमी किंमतीच्या निविदा स्थगित ठेवल्या जाऊ शकतात आणि बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीसाठी या मार्गाचा वापर आणि किंमतीतील फरक समजून घेण्यासाठी APEDA च्या अध्यक्षांद्वारे स्थापन केलेल्या समितीद्वारे पुनरावलोकन केले जाऊ शकते. असे दिसून आले आहे की, चालू महिन्यात निर्यात केल्या जाणाऱ्या बासमतीच्या कराराच्या किमतीत कमालीची तफावत आहे आणि किमान कराराची किंमत 359 डॉलर प्रति टन आहे. सरासरी निर्यात किंमत 1214 डॉलर प्रति टन या पार्श्वभूमीवर आहे. समितीने महिनाभरात आपला अहवाल सादर करावा, त्यानंतर कमी मूल्याच्या बासमतीच्या निर्यातीबाबत उद्योगाकडून योग्य तो निर्णय घेता येईल.
🔆 APEDA ने व्यापाऱ्यांशी सल्लामसलत करून त्यांना या विषयाबद्दल संवेदनशील बनवावे आणि बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीसाठी असा कोणताही वापर रोखण्यासाठी त्यांच्यासोबत काम करावे.

✳️ या देशांमध्ये तांदूळ निर्यातीला परवानगी
नरेंद्र माेदी सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी भूतान, मॉरिशस आणि सिंगापूरला 1.43 लाख टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास विशेष मान्यता दिली आहे. या तीन देशांना ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत केली जाईल. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत निर्यातदारांना 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 20 जुलै 2023 रोजी बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू करण्यापूर्वी ज्या निर्यातदारांनी निर्यात शुल्क जमा केले होते किंवा त्यांची निर्यात माल सीमाशुल्क विभागाकडे सुपूर्द केला होता आणि त्यांना ती निर्यात करण्याची परवानगी होती. सीमाशुल्क प्रणालीमध्ये नोंदणीकृत असेल तर ती खेप निर्यात केली जाऊ शकते. डीजीएफटीने यासाठी 20 जुलै 2023 रोजी रात्री 9:57 वाजेपर्यंत मुदत दिली होती, म्हणजेच ज्या निर्यातदारांनी या वेळेपर्यंत निर्यात शुल्क जमा केले आहे त्यांनाच ही सूट देण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर 2023 पर्यंतच ही सूट देण्यात येत आहे, म्हणजेच या वेळेपर्यंत निर्यात माल पाठवणे आवश्यक असेल, असे डीजीएफटीच्या 29 ऑगस्टच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!