Govt & Drought : सरकार तुमच्या पायाखाली काय जळते आहे?
1 min read
चंद्रावर पोहोचणारा आपला देश कितवा? चंद्राच्या दक्षिण भागात पोहोचणारा आपला देश कितवा? त्याच वेळी मला बोचणार वास्तव काय? तर या देशात, या महाराष्ट्रात रोज शेतकऱ्याच्या आत्महत्या (Farmer’s suicide) होत आहे. आकाशातील पावसाने (Rain) माझ्या डोळ्यातील हिरव्या स्वप्नांवर आसूड ओढले आहे. ऐन पावसाच्या हंगामात पावसाने मारलेली दडी त्याचा शेती क्षेत्रावर पडलेला प्रचंड असा ताण. मोठ्या मेहनतीने पेरणीची त्याने जुळवाजुळव केलेली असते. प्रत्येक शेतकऱ्याजवळ पेरणीच्या वेळेस पैसा असतोच असं नाही. परंतु, हा पेरणीचा हंगाम घालवणं त्याला परवडणारही नसते. म्हणून कसल्याही परिस्थितीत तो पेरणीसाठी तडजोड करत नाही. अत्यंत महाग मोलाचे आणलेले बियाणे,खते, औषधे, केलेली मेहनत. अनेक शेतकऱ्यांनी या हंगामाच्या सुगीवर, बोलीवर आर्थिक व्यवहार केलेले आहेत. अनेकांच्या पैसे परतफेडीचे मोघम वायदे त्यांनी केलेले आहेत. नेहमीप्रमाणे सरकारने शेतीमालावर निर्यात बंदी आणली, त्यावर मोठा करही लावला. आता या अवस्थेत शेतकरी जगणार तरी कसा? शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे.
पाऊस सुद्धा अगदी दुश्मनासारखा वागतोय. पावसाच्या काळात पावसाळी ढगांनी इतकं कोरड व्हावं. ही गोष्टच माझ्यासारख्या मनाला पटणारी नाही. हो, मला मान्य आहे. भारत हा मान्सून पट्ट्यातील देश आहे. मान्सून हा लहरी आहे. अगदी आपल्या सरकारासारखे. आपली शेती पूर्णतः मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. परंतु, याच मान्सूनने गेली कित्येक दिवस झाले आपलं दर्शनच दिलेलं नाही. किती शेतकऱ्यांचा जीव आता टांगणीला टांगला गेलेला आहे. आपल्या डोळ्यात देखत आपल्याच स्वप्नांचा चुरडा होताना शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे. काहीच दिवसांपूर्वीच पिकांच्या जोमदार वाढीने अख्ख शिवार मस्त डोलत होतं राव. तेच शिवार आज चिडीचुप आहे. आता हे पीक माझ्या हाती लागणार नाही, हीच गोष्ट शेतकऱ्याला हतबल करून सोडत आहे.
आता शेतकऱ्यांचे डोळे आकाशातील पावसाला शोधत आहेत. विनंती करत आहेत. हा काळीज फाट आक्रोश तिथपर्यंत कधी पोहोचतोय, असं झालेलं आहे. तोपर्यंत इथला शेतकरी तग धरणार का? वास्तविक पाहता तो आतून पूर्णतः कोसळून गेलेला आहे. एखादा दमदार पाऊसच शेतकऱ्याला आधार देऊ शकतो, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आजच्या काळात पाहिलं गेलं तर शेतकरी हा जवळपास अल्पभूधारक झालेला आहे आणि त्यामध्ये कोणतीही आर्थिक ताण सहन करण्याची क्षमता राहिलेली नाही. मग अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी असले लहान शेतकरी माेडून पडतात. त्यांना कुठलाही आधार दिसत नाही. त्यांची आर्थिक कुवत मजबूत राहिलेली नाही.
या नैसर्गिक आपत्तीने आणि शेतकरी विरोधी नरभक्षी कायद्यांनी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. त्यांना मरणाच्या दारात लोटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक तर सत्तेच्या सारीपाटात गुंतलेले आहेत. एक लाख शेतकरी आत्महत्या करायच्या तयारीत आहेत, असा अहवाल सादर झालेला आहे, मिळालेला आहे, हे त्यांच्या गावीही नाही. म्हणून म्हणतोय सरकार (Govt) तुमच्या पायाखाली काय जळते आहे ते पहाल काय ?