Intensity of rain decrease : मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर होणार कमी
1 min read
🔆 ‘मान्सूनी आस’ व ‘प्रणाल्यां’चे पुढील रब्बी हंगामात पावसासाठी जर अनुकूल स्थलांतर झाले तरच पोळा सणाच्या आत म्हणजे 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान पहिल्या व अनंत चतुर्दशीच्या आत म्हणजे 25 ते 29 सप्टेंबर दरम्यानच्या दुसऱ्या आणि घटस्थापनेच्या आत म्हणजे 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यानच्या तिसऱ्या अशा एकूण तीन पावसांच्या आवर्तनापैकी एखाद-दुसऱ्या आवर्तनातून महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असू शकते, एव्हढेच आशादायी चित्र सध्या जाणवत आहे.
🔆 कारण बंगालच्या उपसागरात गुरुवारी (दि. 31 ऑगस्ट) चार विविध ठिकाणी व विविध उंचीच्या पातळीवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती (Cyclic wind conditions) जाणवत आहे. शिवाय पाच दिवसानंतर म्हणजे 4 सप्टेंबर दरम्यान अजून एक चक्रीय वारा प्रणाली (Cyclic wind system) स्थिती तेथे तयार होण्याची शक्यता जाणवत आहे. या सर्व घडामोडी देशात सप्टेंबरच्या पावसासाठी अनुकूल ठरू शकतात. महाराष्ट्रासाठी या वातावरणाचा काय फायदा होवू शकतो, हे त्या त्या वेळी सांगितले जाईल.
🔆 दुसरे असे की, सध्या पंजाब, हरियाणा, राजस्थान, सौराष्ट्र व कच्छ सहीत संपूर्ण वायव्य भारतात लागोपाठ अनेक दिवस पावसाची गैरहजरी व आर्द्रतेच्या (Humidity) टक्केवारीतील होणारी हळूहळू घसरण व निरभ्र आकाश (Clear sky) यासारखे वातावरणीय बदल नकळत परतीच्या पावसाचेच वेध दर्शवू लागले आहेत. अर्थात सध्या या निरीक्षणांवर हवामान विभाग मात्र सध्या नक्कीच लक्ष ठेवून आहे.
🔆 विरोधाभासात सध्या पावसासाठी प्रतिकूलतेत ‘एल-निनो'(El Nino)चे तर अनुकूलतेत नकळत तटस्थ ‘आयओडी’चे सावट आहेच. ‘आयओडी’ (Indian Ocean Dipole) सध्या विशेष नाही, पण येणाऱ्या काळात धन अवस्थेकडे झुकू लागेल. म्हणजे प्रतिकूलतेत ‘एल-निनो’चा बळकट शह तर अनुकूलतेत कमकुवत धन ‘आयओडी’चा काटशह जाणवतो. म्हणून तर रब्बी हंगामात स्थिती पाहून व हवामान व कृषी विभाग यांच्या सूचनानुसारच जपून पावले टाकावीत.
🔆 सध्या महाराष्ट्रात विदर्भ वगळता दुपारच्या कमाल तापमानातही (Maximum temperature) सरासरीपेक्षा 2 डिग्रीने झालेली वाढ पुढील आठवडाभर म्हणजे कदाचित रविवार (दि.10 सप्टेंबर)पर्यंतही टिकून राहू शकते. त्यामुळे उष्णतेत झालेली सध्याची अतिवाढ व वाऱ्याची शांतता शेतकऱ्यांचा शेवटच्या पायरीतील खरीप पिके जगवण्याच्या धडपडीचा मात्र कस लागत आहे.