krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton production, Psychological pressure : कापूस उत्पादन अंदाजात घोळ, दरावर ‘सायकाॅलाॅजिकल प्रेशर’

1 min read
Cotton production, Psychological pressure : देशात चालू कापूस हंगामात (cotton season) (1 ऑक्टाेबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023) कापसाचे नेमके किती उत्पादन (Cotton production) हाेईल, याचा अंदाज काही महत्त्वाच्या संस्थांनी व्यक्त केला आहे. या संस्थांच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या अंदाजात माेठी तफावत दिसून आली. जून 2023 मध्ये सीएआय (Cotton Association of India)ने देशभरात एकूण 298.35 लाख गाठी तर सीओसीपीसी (The Committee on Cotton Production and Consumption)ने 343.47 लाख गाठींचे उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. या दाेन्ही संस्थांच्या अंदाजात तब्बल 45.12 लाख गाठींची तफावत आहे. सीएआयने जुलै 2023 मध्ये कापूस उत्पादनाच्या अंदाजात 12.83 लाख गाठींची वाढ केली. या संस्थांच्या कापूस उत्पादन अंदाजामुळे बाजारात 'सायकाॅलाॅजिकल प्रेशर' (Psychological pressure) तयार हाेऊन दर दबावात येत व दरवाढीला ब्रेक लागत असल्याचेही अनुभवास आले.

🌎 उत्पादन अंदाजातच घाेळ
सन 2022-23 च्या कापूस हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टाेबर 2022 मध्ये सीएआयने देशभरात एकूण 375 लाख गाठी (170 किलाे रुई) कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला हाेता. सीएआयचा हा अंदाज डिसेंबर 2022 मध्ये 352 लाख गाठी, जानेवारी 2023 मध्ये 345 लाख गाठी, मार्च 2023 321.50 लाख गाठी, एप्रिल 2023 मध्ये 303 लाख गाठी, जून 2023 मध्ये 298.35 लाख गाठींपर्यंत खाली आला. जुलै 2023 मध्ये सीएआयने त्यांच्या कापूस उत्पादन अंदाजात 12.83 लाख गाठींची वाढ केली आणि देशात 311.18 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचे जाहीर केले. यूएसडीए (United States Department of Agriculture)ने सुरुवातीला 362 लाख गाठी, जानेवारी 2023 मध्ये 339 लाख गाठी, फेब्रुवारी 2023 मध्ये 326.58 लाख गाठी आणि नंतर 313 लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला हाेता. सीओसीपीसीने 24 मार्च व 20 एप्रिल 2023 राेजी याच संस्थेने अनुक्रमे 337.23 लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला हाेता. 1 जून 2023 राेजी या संस्थेने त्यांच्या अंदाजात घट करण्याऐवजी वाढ करून 343.47 गाठींचा अंदाज व्यक्त केला. या संस्थेने महिनाभरात 6.24 लाख गाठींनी कापसाचे उत्पादन कसे व का वाढणार, हे मात्र स्पष्ट केले नाही. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मते 337.23 लाख गाठी तर टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजच्या सूत्रांच्या मते देशात किमान 330 लाख गाठी तर नॅशनल काॅटन ब्रोकर्स असोसिएशनच्या (National Cotton Brokers Association) मते देशात 330 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. कापसाची बाजारातील आवक विचारात घेऊन कापूस उत्पादनाचा अंदाज घटत जाताे. कापूस उत्पादन अंदाज आलेख सातत्याने खाली येत असताना सीएआय व सीओसीपीसीचा आलेख शेवटच्या टप्प्यात वर गेला. सीओसीपीसी ही संस्था केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाच्या (Union Ministry of Textiles) अखत्यारीत कार्य करीत असल्याने या संस्थेच्या अंदाजाला विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे, टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीज याच संस्थांच्या कापूस उत्पादन अंदाजाला महत्त्व देत असल्याने त्यांच्या अंदाजातील काही घाेळ बाजारातील कापूस दरवाढीला ब्रेक लावणारा ठरताे.

🌎 अंदाजातील राज्यनिहाय तफावत
कापूस उत्पादनातील राज्यनिहाय तफावतीचा विचार केल्यास सीओसीपीसीच्या मते सन 2022-23 च्या कापूस हंगामात तेलंगणात 53 लाख गाठी कापूस उत्पादन झाले तर सीएआयच्या मते 31 लाख गाठींवर उत्पादन स्थिरावणार आहे. म्हणजेच दोन्ही संस्थांच्या अंदाजात 22 लाख गाठींची तफावत आहे. महाराष्ट्राच्या अंदाजात 11 लाख आणि कर्नाटकाच्या अंदाजात 5.50 लाख गाठींची तफावत दिसून येते.

🌎 अंदाज व त्यातील अचूकता
देशात सीएआय व सीओसीपीसी या दाेन प्रमुख संस्था दरवर्षी कापूस उत्पादनाचा अंदाज वेळाेवेळी व्यक्त करते. बाजारातील कापसाची आवक, हवामान, पर्जन्यमान, पिकावरील राेग व कीड यासह इतर बाबी विचारात घेऊन या संस्था त्यांच्या ंदाजाचे आकडे कमी-अधिक करतात. सीएआय गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक यासह इतर सहा कापूस उत्पादक राज्यांमधील जिनिंग उद्योगांच्या संघटनेकडून कापूस गाठींची माहिती घेत असते आणि त्या आकडेवारीवरून कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करते. सीओसीपीसी कापूस वेचणी प्रयोगाच्या माध्यमातून त्यांचा अंदाज जाहीर करते. या दोन्ही संस्थांच्या कापूस उत्पादनाचा अंदाज काढण्याच्या पद्धती विचारात घेता, देशातील कापड उद्याेजक, अभ्यासक आणि जाणकार सीएआयचा अंदाज ग्राह्य धरतात. कारण, सीएआयचा अंदाज हा बाजारात विक्रीला आलेल्या कापूस व त्यापासून तयार करण्यात आलेल्या गाठींच्या आकडेवारीवर अवलंबून असताे. सीएआयने 298.35 लाख गाठींवरील कापूस उत्पादनाचा अंदाज जुलै 2023 मध्ये 311.18 लाख गाठींवर नेला. वास्तवात, 4 ऑगस्ट 2023 पर्यंत देशभरात 289.559 लाख गाठी कापूस बाजारात आला हाेता. म्हणजे सीएआयच्या मते 21.63 लाख गाठी कापूस अजून शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.

🌎 कापसाची मागणी, वापर व उत्पादनातील घट
चालू कापूस हंगामात देशात 312 ते 315 लाख गाठी कापसाचा वापर व मागणी राहील, असे सीओसीपीसीने आधीच स्पष्ट केले हाेते. 4 ऑगस्ट 2023 पर्यंत देशांतर्गत बाजारात 289.56 लाख गाठी कापसाची आवक झाली हाेती. प्रतिकूल हवामान, राेग व किडींचा प्रादुर्भाव, सतत अतिमुसळधार पाऊस यामुळे प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील कापसाचे घटले. मात्र, ही महत्त्वाची बाब सीओसीपीसी, सीएआय या संस्था मान्यच करायला तयार नाहीत. शेतकऱ्यांनी मध्यंतरी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस राेखून धरल्याने बाजारातील आवकही संथ हाेती. सीओसीपीसीने एप्रिलमध्ये कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करताच मेमध्ये आवक वाढली व दर घसरले हाेते. 1 ऑक्टाेबर 2022 ते 31 मे 2023 या काळात 255.532 लाख गाठी, 30 जून 2023 पर्यंत 278.205 लाख गाठी तर 4 ऑगस्ट 2023 पर्यंत 289.559 लाख गाठी कापूस बाजारात आला. सीओसीपीसीच्या मते किमान 87.97 लाख गाठी, तर सीएआयच्या मते जूनमध्ये 42.82 लाख गाठी तर ऑगस्टमध्ये 21.63 लाख गाठी कापूस अजून शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. परंतु, देशभरातील कापूस उत्पादकांची आर्थिक परिस्थिती आणि कापूस साठवण क्षमता विचारात घेता सीओसीपीसी व सीएआय कापूस शिल्लक असल्याचा अंदाज तर्कविसंगत ठरताे. नेमक्या याच प्रकारामुळे बाजारात सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार हाेऊन दर दबावात राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!