krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer suicide : शेतकरी आत्महत्या करताेय, पण लक्षात घेतंय कोण?

1 min read
Farmer suicide : शेती हा देशातील सर्वात मोठा उद्योग आहे. छन्न आणि प्रछन्नपणे 80 टक्के लोकांना सामावून व सांभाळून घेणाऱ्या शेतीकडे उद्योग बघायला हवं. पण, जगाचा इतिहास शेतकऱ्यांच्या (Farmer) लुटीचा आहे. हजारो वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेली ही लूट संघटित आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षांत शेतीची लुटमार करणारे लुटारू अलीकडे जास्तच कोडगे बनले आहेत.

शेतीची लूट हा नवीन विषय नाही. देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर ते सहज लक्षात येणार नाही. बहुतांश राजांच्या शौर्यकथा या निव्वळ शेतीच्या लुटींनी भरलेल्या आहेत. राजा कुणीही असला तरी तो शेतकऱ्यांना लुटतो. राजा जेवढा उदार आणि दानधर्म करणारा असतो, तो तेवढाच मोठा शेतकऱ्यांना लुटणारा दरोडेखोर असतो. शेतकऱ्यांना लुटायचं व लुटलेलं धन दानधर्माच्या नावाखाली ऐतखाऊ लोकांना वाटायचं. भलेही नाव काहीही द्या.. अश्वमेध, नरमेध, वाजपेय वगैरे वगैरे.

13 व्या शतकातील हेमाडपंतानं तर भारीच शक्कल लढवली. त्यानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा भ्रामक ग्रंथ लिहिला किंबहुना लिहून घेतला. त्यात दीड हजार नित्य आणि नैमित्तिक व्रतवैकल्ये सांगितली आहेत. आता वर्षांत दिवस असतात 365! म्हणजे सगळी व्रतं करायची तर दर दिवशी किमान चार व्रतं वैकल्ये करावी लागतात! त्याआडून मोठ्या दानधर्माच्या नावाखाली पुन्हा लूट केली जाणार! कारण मेल्यावर स्वर्ग मिळावा म्हणून.

काहीही झालं तरी स्वातंत्र्यापूर्वी शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट नव्हती. आज सर्वत्र दिसत असलेली देशाची प्रगती निव्वळ शेतकऱ्यांच्या लुटीवर उभी राहिली आहे. आमचं सरकार आम्हाला जी उणे-सबसिडी देतं, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची दरवर्षी किमान 20 लाख कोटी रुपयांची लूट केली जाते. ही लूट आज रुपयाची जी डॉलरच्या तुलनेत किंमत आहे त्यावर ठरते. प्रणव मुखर्जी ज्यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री होते,त्यावेळी World Trade organisation निमित्ताने General Agreement On Trade and Tariffs (GATT) वर सही करताना त्यांनी लेखी कबुली दिली होती. त्यानुसार आमचं सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी उणे 72 टक्के सबसिडी देतं. याचा अर्थ शेतकऱ्यांना केलेल्या खर्चातून केवळ 28 टक्के परतावा मिळतो. बाकी सगळं लुटलं जातं.

शरद जोशींच्या भाषेत शेतीचा धंदा म्हणजे ‘सौ के साठ करना और बाप का नाम चलाना!’ कितीही मोठा शेतकरी असला तरी तो कर्जबाजारी असतोच. तो आपण आतबट्ट्याचा धंदा करतोय, हे सांगायला लाजतो. आपली गरिबी आपल्यामुळे नाही तर सरकारच्या धोरणामुळे आहे, हे त्यांना कळत नाही. मग मुलाबाळांच्या सोयरिकी जुळणार नाहीत म्हणून तो आपली गरिबी लपवतो. शेती विकून मुलाबाळांची लग्नं लावतो. दोन पिढ्या गेल्या की कितीही मोठा शेतकरी आपोआप अल्पभूधारक बनतो.

काहीही करून शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांची धडपड सुरू आहे. ते ऑटाे घेतील, छोटंसं किराणा दुकान घालतील, चहाची टपरी टाकतील, पण शेती करणार नाहीत. आज सरकारी कार्यालयात चपराशी होणं हे शेतकरी होण्यापेक्षा जास्त सुखाचं व मानाचं आहे. 75 वर्षांच्या काळात लाखाे शेतकऱ्यांनी गळफास (Farmer suicide) लावून घेतला हा खरं म्हणजे या सरकारवरील सर्वात मोठा अविश्वास ठराव आहे! पण लक्षात घेतं कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!