Rain possibility : आठवडाभर पावसाची शक्यता कमीच
1 min read🔆 सोमवार (दि. 21 ऑगस्ट)पासून मान्सूनच्या श्रावण सरी पुन्हा उर्जीतावस्थेत येऊन त्यापुढील तीन आठवडे म्हणजे रविवार (दि. 10 सप्टेंबर)पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा जोरदार तर नव्हे, पण काहीशा मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
🔆 सध्याच्या पाऊस-खण्ड प्रणालीमुळे महाराष्ट्रातील खरीपातील जिरायती क्षेत्र पिकांना ओढ (ताण) बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या रब्बी हंगामाची भिस्तही याच 21 ऑगस्टनंतर पडू शकणाऱ्या अपेक्षित पावसावरच अवलंबून राहू शकते.
🔆 लघु पल्ल्यातील पावसाच्या मासिक अंदाजानुसार ऑगस्ट व सप्टेंबर या दाेन महिन्यात महाराष्ट्रात तसेही सरासरीपेक्षा कमीच पावसाच्या शक्यतेचे भाकीत असून, केवळ सप्टेंबर महिन्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
🔆 बंगालच्या उपसागरातील आर्द्रता ईशान्येकडे म्हणजे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरीयन किनारपट्टीवरील ‘खनून’ (khanun) तर जपान किनारपट्टीवरील ‘लान’ (Lan) नावाच्या दोन चक्रीवादळांनी (टायफून-Typhoon) खेचल्यामुळे देशातील दक्षिणेकडील पाच राज्याबरोबर महाराष्ट्रातही या पंधरवड्यात पावसाची उघडीप पाहवयास मिळत आहे.
🔆 सध्या दोनपैकी एक टायफून विरळले असून, दुसरेही विरळण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ‘मान्सून-खण्ड’ प्रणाली नामशेष होणे व ‘मान्सून आस’ त्याच्या मूळ सरासरी जागेवर प्रस्थापित होणे या शक्यतेमुळेच आपल्याकडे 21 ऑगस्टनंतर पावसाची शक्यता वाढली आहे.