Rain and Cotton : पाऊस आणि कापूस!
1 min read✳️ सर्व प्रथम कापूस पिकातील पाणी शेताबाहेर काढावे. पाण्याचा निचरा लवकर कसा करता येईल हे बघावे.
✳️ ढगाळ वातावरण आणि जमिनीत पिकाच्या मुळांजवळ पाणी साचले असल्याने अन्नद्रव्ये शोषणावर त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. त्यामुळे कापूस पिकाचे पानांद्वारे पोषण करावे. पाऊस बंद झाल्यावर 19:19:19 या विद्राव्य खताची 15 लिटर पाण्यात 45 ग्राम + 10 मिली स्टिकर मिसळून त्याची फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची उणीव आढळल्यास चिलेटेड (Chelated) ‘मायक्रोन्युट्रीएंटस्’ची (Micronutrients) फवारणी करावी.
✳️ वाफसा स्थिती आल्यावर ठिबकमधून एकरी 2.5 किलो युरीया + २ किलो 12:61:00 + 1 किलो पांढरे पोटॅश व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टॅंकमधून (Fertilizer tank) द्यावे.
✳️ सततच्या पावसाने जमिनीत दिलेल्या खतांमधील अन्नद्रव्ये झिरपून जातात. त्यामुळे कापूस पिकास पुरेसे पोषण न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होतो, म्हणून रासायनिक खते (Fertilizers) एकाच वेळी जादा देण्यापेक्षा जास्तीत जास्त विभागून दिली पाहिजेत.
✳️ बुरशीनाशक (Fungicides) बाविस्टीन (Bavistein) किंवा सी.ओ.सी ची (Copper Oxychloride) फवारणी करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणार नाही.
✳️ गेल्या 5 – 6 वर्षांपासून कापूस पिकाची गादी वाफ्यावर लागवड करावी, असे सुचवित आहे. त्यामुळे जादाचे पाणी सरीतून बाहेर जाऊन मुळांजवळ पाणी साचत नाही. गादी वाफ्यातून पाणी झिरपून जाऊन मुळांजवळ हवेचे संतुलन उत्तम राहाते. गादी वाफ्यावर मल्चिंग फिल्मचा (Mulching film) वापर अधिक फायदेशीर आहे. तणांचा प्रादूर्भाव कमी होतो तसेच पावसाळ्यात ठिबकमधून (Drip) खते देता येतात. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
✳️ गादी वाफ्यावर लागवड केली नसल्यास कापसाच्या दोन ओळींमध्ये बलराम नांगराने चर/सरी काढावी म्हणजे कापूस पिकात पुन्हा पाणी साचणार नाही.