krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Shy Leopard : मायावी आणि लाजाळू बिबट्या…!

1 min read
Shy Leopard : गोष्ट 2015 ची आहे. मी वसई येथील वर्तक महाविद्यालयात प्राणीशास्त्र शिकत होतो. विद्यार्थी दशेपासून मी सर्पमित्र म्हणून मदत कार्य करत होतो. दरम्यान आमच्या शिरगांवमध्ये बिबट्या (Leopard) आला. गावाबाहेरील स्मशानभूमीजवळ असलेल्या खाजनात त्याला कुणीतरी पाहिलं आणि गावात एकच खळबळ उडाली. गावातील माळीवाड्यातील काही मुलांनी त्याचे ठसे पाहिले आणि त्यांचे फोटो व्हॉट्सॲपवरती व्हायरल झाले. पाठोपाठ माळीवाड्यात लाकडांची मोळी घेऊन जाणाऱ्या एका आदिवासी बाईला पाहून झाडावरून बिबट्यानं डरकाळी फोडली. ती बाई लाकडं तशीच टाकून गावात बोंब ठोकत आली, वाघ आलाय... वाघ आलाय... पाठोपाठ अख्खं गाव तिथे गेलं. वनविभागाला फोनाफोनी झाली. वनविभागाची गाडी आधी देखील येऊन गेली होतीच.

बाबा वनविभागातून नुकतेच रिटायर झाले होते. शिवाय, मीही सर्पमित्र म्हणून काम करत असल्यानं वन कर्मचारी अधिकारी वर्गाशी तशी जुनीच ओळख. त्यामुळे असं काही असेल तर आम्हाला नेहमी बोलावलं जात असे. यावेळी वन विभागाच्या सोबत ठाणे येथून मयूर कामथ आणि नितेश पंचोली असे दोघं बिबट तज्ज्ञ म्हणून आले होते. पहिल्याच भेटीत आमची चांगली गट्टी जमली. वेळ साधारण संध्याकाळी 4 वाजताची असेल, आम्ही तिघं बिबट्या जिथे जिथे दिसला, तिथे तिथे जाऊन त्याच्या पाऊलखुणा पाहू लागलो. तसे करता करता आम्ही अख्खा माळीवाडा पालथा घातला आणि तीन ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवायचं ठरल. त्यावेळी जुने कॅमेरा ट्रॅप असल्याने बसवताना खूप काळजी घ्यावी लागत असे. शिवाय, ते अशा ठिकाणी बसवावे लागत की, त्या ठिकाणी बिबट्याची यायची शक्यता जास्त असली पाहिजे. मग त्यासाठी बिबट्याने कुठे कुठे हद्द निश्चिती केली आहे, हे शोधून काढावं लागत असे.

विशेषतः त्याची विष्ठा जिथे मिळेल, त्या ठिकाणी तो पुन्हा रात्री हद्द निश्चित करायला येईल, असे पकडून चालावं लागतं. म्हणून मग खास या खुणा कुठे कुठे आहेत, याचा मागोवा घ्यायला लागत होता. लवकरच आम्हाला एक चिंचेचं झाड दिसले. हे तेच झाड होत, ज्यावरून बिबट्यानं डरकाळी फोडून त्या आदिवासी बाईला घाबरवल होतं. आम्ही त्या झाडावर बिबट्यानं नखाने केलेल्या खुणा पहिल्या आणि एक कॅमेरा इथे लावयच ठरल, तर दुसरे दोन आम्ही जवळपासच्या तार कुंपणाच्या धारीने लावले.

कॅमेरा ट्रॅप लावताना खूप अडचणी येत होत्या. कारण त्यावेळी इन्फ्रारेड सेन्सर कॅमेरे खूपच महाग असल्याने वन विभाग मोशन सेन्सर पद्धतीच्या कॅमेराचा उपयोग करत होते. पण असे जरी असले तरी हे कॅमेरे अती सूक्ष्म ती सूक्ष्म जरी हालचाल झाली तरी फ्लॅश होत आणि फोटो घेत. ही त्या कॅमेराची खुबी देखील होती आणि तीच कधी कधी अडचण देखील. कारण तो बसवताना त्याच्या समोर फक्त प्राणीच येईल, इतर झाडं पानं येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागत होती. कारण जर बसवताना चूक झाली तर एखादं पान जरी समोर हलत राहिलं तरी कॅमेरा ट्रॅप ट्रिगर होत होता. रात्रीच्या वेळी तो ट्रिगर झाल्यास फोटो काढताना जसा फ्लॅश होतो तसा फ्लॅश येत असे. त्यामुळे वन विभागाचे कित्येक कॅमेरे चोरीला देखील जात असत आणि म्हणून कॅमेरा देताना तत्कालीन एसीएफ श्री कुप्ते सरांनी आम्हाला कॅमेरा चोरी होणार नाही अशा पद्धतीने लावा, असे बजावले होते.

या अडचणी येत असल्याने कॅमेरा बसवायचा तर एखाद्याची खासगी मालमत्ता असेल आणि तिथे जर बिबट्याचा वावर असेल तरच तो बसवायला लागत होता. तोही संध्याकाळी 4 वाजायच्या आत बसवायचा आणि सकाळी 6 वाजायच्या आत काढावा लागत होता. असं आमचं रोजच रुटीन झालं होतं. मयूर आणि नितेश यांनी मला कॅमेरा कसा वापरायचा, बिबट्याचा माग कसा काढायचा, हे शिकवलं आणि मग आमचं रोज फोन वरून संभाषण सुरू झालं. जवळपास दोन तीन दिवस सरले असतील, नसतील तर पहाटे सातपाटीहून 5 च्या बसने जाणाऱ्या ड्राइव्हरने गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमीजवळ मादी बिबट्या आणि दोन पिल्ले रस्त्याजवळून जाताना पहिली, अशी उडती उडती खबर आली.

पुन्हा आमचे रात्री बेरात्री फेरे सुरू झाले. गावकऱ्यांचा रोष हळूहळू वाढत होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागणी जोर धरू लागली. दरम्यान, बिबट्या समजून घेण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाच्या प्रशस्त ग्रंथालयात काही वाचायला मिळेल का म्हणून शोधू लागलो. लवकरच मला तिथे जिम कॉर्बेट भेटला. तो आणि त्याचे शिकारीचे अनुभव… त्याच ‘रुद्रप्रयागचे नरभक्षक बिबटे’ मी संपूर्ण वाचून काढलं. पाठोपाठ केनेथ अँडरसन याचं ‘ब्लॅक पँथर ऑफ सिवानिपल्ली’ देखील वाचून पूर्ण झालं होतं. दोघंही त्या काळचे प्रख्यात शिकारी. या पुस्तकात त्यांनी बिबट्या आणि वाघांच्या सवयी, त्यांनी केलेली प्रत्येक शिकार, एखादा बिबट/वाघ नरभक्षक का होतो, याची खूप छान माहिती दिली आहे. किंबहुना; प्रत्येक शिकार करताना केवळ नरभक्षकच मारला जाईल, यासाठी त्यांनी घेतलेली खबरदारी देखील अधोरेखित होते. ज्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

महाविद्यालयात वाचन आणि घरी आल्यावर बिबट्याचा माग काढणे, माझा रोजचा छंद झाला होता. आठवडा झाला असेल, नसेल गावाबाहेरील खाजनाच्या पलीकडे असलेल्या एका वाडीत बिबट्याने शिकार केली असं समजलं आणि मी त्या वाडीत गेलो. बिबट्यानं एक कुत्र्याची शिकार केली होती. पाणी सोडायच्या पाटात त्याचे ठसे उमटले होते. वाडीत थोडासा ऊस लावला होता, जिथे कुत्र्याचं शव पडलेलं होतं. कदाचित बिबट्या इथेच राहत असावा आणि रात्री गावात येत असावा, असा मी अंदाज बांधला. कारण या वाडीवर सहसा कोणी येत जात नव्हत. शिवाय, ऊस उंच असल्यानं लपायला चांगली जागा होती आणि रात्री वेळी भटकी कुत्री, खाजना पलीकडे असलेली आदिवासी वस्ती, त्यात त्यांची गुरं असा भरपूर खूराक आजूबाजूला होताच. असो तर साधारण अंदाज आल्यावर मी कुप्ते सराना रात्री पेट्रोलिंग करण्यासंदर्भात विचारणा केली. त्यांनी लगेचच रात्रीच्या वेळी माझ्यासोबत एक गार्ड, चांगली 500 मीटर जाईल, अशी टॉर्च आणि एक कंत्राटी पगार देऊन सोबतीला म्हणून आदिवासी मुलगा, अशी टीम तयार केली आणि आमची रात्रीची भटकंती सुरू झाली.

दिवस तसे हिवाळ्याचे होते. आम्ही जेवलो की, गावातल्या बिबट्या सफारीला निघायचो. गावच गुप्त वैभव मी या रात्री पाहिलं. बॅटरी मारत मारत आम्ही पुढे जात असत. लांब कुठे तरी डोळे चमकत असत पण दर वेळी नेमका कुत्रीच निघायची. थोडं पुढे गेल्यावर निवडुंगाच्या कुंपणात काहीतरी खडबडलं, आम्ही दचकून बॅटरी मारली पाहतो तर काय सुतार पक्षी आम्हाला पाहून फांदीवर स्तब्ध झाला होता. कदाचित बॅटरीच्या प्रखर प्रकाशामुळे डोळे दिपले असावेत त्याचे. थोड पुढे जात नाही तर एक ठिपक्यांचे घुबड आमच्याकडे डोळे मोठे करून पाहत होते. असं करता करता आम्ही मिठागरपर्यंत पोहोचलो. आम्हाला पाहून टिटवी मोठं मोठ्यानं ओरडून इतर प्राण्यांना सावध करत होती. तिच्यामुळे आता आम्हाला पुढे काही पाहायला मिळणार नाही, म्हणून आम्ही माघारी फिरून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या खाजनात जायचं ठरवलं. तिथे गेलो आणि दूर वर फ्लॅश मारतच होतो की, लहान लहान डोळे चमकले. आम्ही थोड जवळ गेलो पाहिलं तर ससे. त्यांना पाहून माझा आदिवासी मित्र म्हणाला, अशी बॅटरी जर गावात कोणाला मिळाली ना तर एक पण ससा शिल्लक ठेवणार नाही. असं म्हणत आम्ही हसत हसत पुढे निघून गेलो. एव्हाना; पहाट झाली होती, आम्ही दोघं देखील घरी जायला निघालो. बिबट्या मात्र आम्हाला काही दिसला नाही.

दुसरा दिवस उजाडला, मी महाविद्यालयातून घरी येतो तोच, बिबट्यानं गावाबाहेर खाजनात एका लहान म्हशीच्या पारडाची शिकार केली होती. आम्ही गावात चौकशी केली, कोणाचं पारडू असेल? परंतु कोणी मालक समोर आला नाही. पण शिकार पाहून ही नक्कीच बिबट्यानं केली असावी, असं स्पष्ट दिसत होतं. कारण मानेवर आणि कंठाशी घाव होते आणि थोडं रक्त गवतावर काही ठिकाणी लागलं होतं. शिकार तशी ताजी होती. कदाचित माणसांची ये जा झाल्यानं बिबट्या शिकार टाकून पळाला असावा. जवळच निवडुंग वाढलेलं होतं, त्यामुळे कॅमेरा ट्रॅप नेमका इथेच लावुया. यावेळी 100 टक्क्के बिबट्या आपल्या ट्रॅप कॅमेरामध्ये येईल, याची खात्री मला होती. म्हणून ठरल्याप्रमाणे बिबट्या यायच्या आगोदर साधारण 5.30 वाजता मी तिथे कॅमेरा फिट करून आलो.

संध्याकाळचे 6.30 झाले असतील, माळीवाड्यातून फोन आला, एक गुरख्याचा लहान मुलगा खजनात पळून गेला आहे. त्याची आई रडत रडत आली. मी तिला शांत करत काय झालं विचारलं. ती म्हणाली, त्या पोऱ्याचा बाप पिऊन इधेल, तो पोऱ्याला मारेल होवा, तेव्हा तो खाजनात पलून गेला होवा, सत्यानाश…. पोरगं तस लहानच होत. शिवाय, तीन फूट खाली असलेल्या सर्व गोष्टींची शिकार बिबटे करत असतात आणि नेमका तो यायच्या वेळात हा पोरगा त्याच्या मैदानात पळून गेला आहे, असं समजल्यावर कॅमेरा ट्रॅप फसला तरी चालेल पण या पोराला आधी शोधायला हवं, म्हणून गावात फोनाफोनी केली. माळीवाड्यातली पोरं, तुषार, तोण्या आणि टायकल वाडी मधला पप्पू दादा, मयूर आदी मंडळी आठ दहा दुचाक्या घेऊन आम्ही त्या मुलाला शोधत खाजनात शिरलो. अख्खा खाजन पालथं घातलं, पण पोरगा काही मिळाला नाही. पण हे करत असताना बिबट्याने जिथे शिकार केली होती. नेमका तिथेच काही पोरं गेली आणि कॅमेरा ट्रॅप ट्रिगर झाला, फ्लॅश झाली आणि गावातल्या मुलांना माहिती झालं मी कॅमेरा ट्रॅप कुठे बसवला आहे तो.

तसा कोणी कॅमेरा काढला नसता. पण, गावकरी लोकांनी तो पहिला होता. जर चोरी झाली तर कुप्ते साहेब आपल्यालाच ओरडतील. कारण त्यांनी आधीच बजावलं होतं, कॅमेरा ट्रॅप फक्त खासगी जागेतच लावा आणि हा तर बाहेर खुल्यावर लावला होता. शेवटी चोरी होऊ नये म्हणून सगळी लोकं निघून गेल्यावर मी तो कॅमेरा काढून घरी घेऊन आलो. बिबट्या पुन्हा एकदा माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद होता होता राहून गेला. दोन चार दिवस गेले. माझं रोज रात्री खाजनात फिरायला जाणं सुरू होत. पण, माझ्या सोबत फिरणारी मंडळी मात्र पार वैतागली होती. एक एक करत सगळी गळती लागली आणि शेवटी उरले आम्ही दोघच मी आणि ती बॅटरी.

काही केल्या बिबट्या काही मला दिसत नव्हता. पण, त्याची विष्ठा पायाचे ठसे मात्र दिसत होते. पुन्हा एकदा खाजनाच्या पलीकडे असलेल्या चुरी बाईंच्या वाडीमध्ये बिबट्या दिसला, अशी खबर आली आणि मी तिथं गेलो. वाडीमध्ये वस्तीला असलेल्या आदिवासी जोडप्याला मादी आणि दोन पिल्ले दिसली होती. वाडीच्या दक्षिणेला एका कंपनीचं बांधकाम सुरू होतं आणि आजूबाजूला खूप मोकळी जागा आणि त्यात उंच वाढलेलं गवत होतं. शिवाय, बांधकाम करण्यासाठी आठ दहा कामगार कुटुंब याच आवारात राहत होती. आम्ही त्यांना पहाटेच्या वेळी आणि संध्याकाळी 5 नंतर लहान मुलांना मोकळं सोडू नका, तसेच आवारात उघड्यावर शौचाला जाऊ नका, बिबट्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे, हे सांगून पुन्हा वाडीत आलो. बिबट्या वाडीमध्ये येताना कंपनी आणि वाडीमधून जाणाऱ्या एक सुक्या ओढ्यातून ये जा करत असावा असा अंदाज बांधला आणि समोरच असलेल्या एका चिक्कुच्या झाडाला कॅमेरा ट्रॅप लावला. शिवाय, वाडीत हौद होता, ज्यात पाणी होत. कदाचित बिबट्या इथे पाणी प्यायला आला, तर असा कयास लावत इथे देखील एक कॅमेरा लावून आम्ही माघारी फिरलो.

दरम्यान, जिथे गावातली लोकं बिबट्यानं भयभीत झाली होती, तिथे वाडीत लोकवस्तीपासून अगदी लांब कुडाच्या घरात 240 व्हॉटच्या अपुऱ्या प्रकाशात राहणारे हे आदिवासी जोडपे मात्र भलतेच धीट होते. ती बाई बिबट्याच्या मागे मागे तिला पाहत जाऊन आली होती. आम्हाला म्हणाली, ते काही करत नाहीत, आमच्या गावाला असे कित्येक येतात. आम्हाला त्याची सवय झाली आहे. त्यामुळे काही वाटत नाही. आधी सुरुवातीला मला ती काहीतरी बनाव करत असेल, असं वाटलं पण नंतर बिबट्याचे ठसे पाहून ती खरं बोलत असावी असं वाटलं. असो, तर आम्ही पुन्हा एकदा बिबट्या कॅमेरामध्ये दिसेल, याची आशा करत घरी परत आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी वाडीवर पोहोचलो. हौदा वरचा आणि चिक्कू जवळचा असे दोन्ही कॅमेरे ट्रिगर झाल्याचं डिस्प्लेवर दिसत होतं. चिक्कूजवळचा कॅमेरा रात्री 11 आणि 1 वाजता ट्रिगर झाला होता. पण, नेमकं बिबट्या त्याच्या हद्दीबाहेर होता, ज्यामुळे तो कॅमेऱ्यामध्ये आलाच नाही. या वेळी देखील हिरमोड झाला. आता पूर्ण आस हौदाजवळ बसवलेल्या कॅमेरा वरती होती. झटपट कॅमेऱ्यामधलं कार्ड काढून मी लॅपटॉपमध्ये घातलं. पाहतो तर घार, टिटवी, तीतर, ससा असे वेगवेगळे प्राणी आळीपाळीने हौदाच्या सांडव्यावर पडलेलं पाणी पिऊन गेले आणि बिबट्या काही आलाच नाही. पुन्हा दर्शन होता होता राहिलं.

पुढे आठ दहा दिवस असेच गेले आणि आमच्या शिरगावपासून साधारण 6 किमी अंतरावर असलेल्या अल्याळी येथून फोन आला बिबट्या पाहिल्याचा. मी आणि वनविभाग वाडीत गेलो. तिथे बिबट्याचे ठसे मिळाले, पण सोबत रानडुक्कर देखील असावं आणि बिबट्या त्याच्या मागावर असावा, असा अंदाज लागला. कारण वाडीत रानडुक्कर चिखलात लोळल्याने चिखलात तसे पायाचे ठसे आणि खड्डे दिसत होते. पुढे शे दोनशे मीटर माग काढत काढत आम्ही बंधन गार्डन समोरील एका वाडीत पोहोचलो. रानडुक्कर आणि बिबट्या असे दोघांचेही ठसे एका मागून एक दिसत होते. कदाचित बिबट्या रानडुकराच्या मागावर होता. थोड्याच पुढे डुकराच्या पायाचे ठसे मिळायचे बंद झाले. म्हणजे कदाचित बिबट्याला शिकार मिळाली असावी आणि त्यानं डुकराला मरून उचलून नेलं असावं.

ही आमच्या गावच्या बिबट्याची आणि माझी शेवटची अप्रत्यक्ष मुलाखत होती आणि बिबट्या दिसायचा बंद झाला. पण तो गावकऱ्यांसाठी बंद झाला होता, माझ्यासाठी नाही. मला त्या नंतरही कित्येकदा गावाबाहेरील खाजनात त्याची विष्ठा मिळत राहिली, पण मी कोणाला काहीच सांगितलं नाही. कारण बिबट्या आता चांगलाच हुशार झाला होता. त्यानं माणसांच्या नजरेत न येता कधी कोणत्या वेळी शिकार करायची, दिवसाच्या वेळी माणसांना टाळत कुठे पडून राहायचं याचा पुरेपूर अभ्यास करून ठेवला होता. कदाचित त्या मादीची पिल्ल देखील मोठी झाली असावीत. पिल्ले असल्यामुळे स्वत:ला आणि पिल्लांना मुबलक अन्न मिळण्यासाठी देखील मादी मानवी वस्तीजवळ राहायला आली असावी. पिल्ल मोठी झाल्यावर ती कदाचित माणसाच्या दृष्टीपासून थोडं लांब राहायला गेली असावी. कारण काही पण असो, आम्ही बिबट्यासोबत राहायचं शिकलो होतो. अशा तऱ्हेनं गावातल्या लोकांसाठी जरी बिबट्या (Leopard) मायावी वाटत असला तरी माझ्यासाठी मात्र तो अजूनही लाजाळूच (Shy) होता. कारण अजून तरी तो माझ्या कॅमेऱ्यासमोर आला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!