krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Ethanol effect : उसाची ‘एफआरपी’ एकरकमी ऐवजी दोन टप्प्यात; इथेनॉल इफेक्ट!

1 min read
Ethanol effect : पूर्वी साखर कारखाने 'सी मोलॕसिस' (C Molasses)वर प्रक्रिया करायचे, ज्याचा साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत नव्हता. केंद्र सरकारच्या नवीन महत्त्वाकांक्षी धोरणाप्रमाणे 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे भारतातील इथेनॉल (Ethanol) उत्पादन क्षमता सध्याच्या 700 वरून 1,500 कोटी लिटरपर्यंत वाढणार आहे. देशाची दरवर्षी 30,000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची (Foreign currency) बचत होणार आहे.

साखर कारखान्यांनी प्रक्रियेत बदल करून ‘बी हेवी मोलॕसिस’ (B Heavy Molasses), उसाचा ज्यूस/सिरप किंवा दोन्हीपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. काहींनी ‘स्टँड अलोन युनिट’ (Stand alone unit) उभारले आहेत. मे 2022 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण आसवानीचे (Distillery) 117 व इथेनॉलचे 115 प्रकल्प उभारले आहेत.

या कारखान्यांनी आपल्या उत्पादनामध्ये कुठल्या उपपदार्थापासून इथेनॉल बनवले आहे व त्या उत्पादनाचा किती टक्के भाग त्यासाठी वळवला आहे, ही कारखान्याच्या आतील तांत्रिक बाब बाहेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळत नाही. उदाहरणार्थ बी – हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन केल्यास अंदाजे 1.3 ते 1.5 टक्के इतकी साखर उताऱ्यात घट होऊ शकते.

हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कारण, या प्रक्रियेमुळे साखरेच्या रिकव्हरीमध्ये घट होत असते. म्हणून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकार व साखर आयुक्तालयाने परिपत्रक काढून असे निर्देश दिले आहेत की, ती सदर रिकव्हरीतील घट कारखानानिहाय किती आहे, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI – Vasantdada Sugar Institute) व नॕशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूर (National Sugar Institute, Kanpur) किंवा तत्सम शासनमान्य संस्थेकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार असे बंधनकारक आहे की, साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपल्यानंतर त्यांनी कुठल्या पदार्थापासून व उत्पादनाचा किती भाग इथेनॉल निर्मितीसाठी वळवला आहे, हा तपशील 15 दिवसांच्या आत व्हीएसआयला कळवावा. त्यांच्याकडून उताऱ्यामध्ये किती घट आहे हे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे.

🟢 खालील टिपिकल उदाहरण पाहूया.
⭐ साखर कारखान्याने जाहीर केलेली रिकव्हरी (Recovery) : 9.64 टक्के.
नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस पुरवठा केल्यापासून 14 दिवसांत ऊस दराची रक्कम मिळण्याचा हक्क आहे. सन 2022-23 च्या आक्टोबर-नोव्हेंबर गाळप हंगामापासून नवीन धोरणाप्रमाणे बेसिक रिकव्हरी 10.25 टक्क्यांप्रमाणे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार. पण, गाळप हंगाम संपल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्टिफिकेटप्रमाणे सुधारित उतारा खालीलप्रमाणे आहे. (याचे कॅल्क्युलेशन सूत्र फार क्लिष्ट असल्यामुळे इथे देत नाही).
⭐ त्या साखर कारखान्याने बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखर रिकव्हरीतील घट : 1.302 टक्के.
⭐ त्या साखर कारखान्याने थेट उसाच्या रसापासून किंवा शुगर सिरप (साखर पाक)पासून इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखर रिकव्हरीतील घट : 1.055 टक्के.
⭐ शासनाच्या निर्देशाप्रमाणे अंतिम उतारा : (9.64+1.302+1.055)= 11.997 टक्के.

आता या वाढीव उताऱ्याप्रमाणे फरकाची जादा रक्कम शेतकऱ्यांना प्रीमियम म्हणून दुसऱ्या हप्त्यात देणे बंधनकारक आहे. अर्थात, त्यामध्ये त्याच हंगामाची ऊसतोडणी व वाहतुकीचा (Harvesting and Transportation) खर्च वजा करून. कारण बदललेल्या परिस्थितीमध्ये साखर उतारा हंगाम संपल्यानंतरच अचूकपणे काढता येतो.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार संबंधित साखर कारखान्याचे गाळप हंगाम संपल्यानंतर त्या हंगामाचा साखर उतारा 30 दिवसांच्या आत निश्चित करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वाढीव रक्कम दुसऱ्या टप्प्यात मिळावी अशी ती तरतूद आहे. कार्यकर्त्यांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

कारखाने गाळप चालू असेपर्यंत सिरप किंवा बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मिती करतात व नंतर ऑफ सिझनमध्ये साठलेल्या मोलॅसिसपासून इथेनॉल करतात. या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने दिलेले वरील सर्टिफिकेट कारखान्याच्या नोटीस बोर्डावर लावावे, अशी आम्ही मागणी करीत आहोत.

🟢 महसुली विभागणी सूत्र – आरएसएफमध्ये बदल आवश्यक
⭐ सध्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार, कारखानाच्या साखर विक्री मुल्याच्या 75 टक्के किंवा साखर व प्राथमिक उप पदार्थाच्या म्हणजेच मळी, भुसा आणि प्रेसमड विक्रीच्या 70 टक्के जे जास्त आहे, तो त्या कारखान्याचा आरएसएफ दर असतो. तो जर एफआरपी (Fair and Remunerative Price)पेक्षा जास्त निघत असेल तर तोच देय होतो. पण, बदललेल्या परिस्थितीनुसार मळीची घट होऊन, विक्री न करता साखर कारखाने इथेनाॕल निर्मिती करीत आहेत. त्यामुळे सध्याचे सूत्र हे कालबाह्य झाले आहे. त्यात बदल करणे आवश्यक आहे.
⭐ अजून एक मुद्दा हा आहे की, बरेच वेळा कारखाने त्यांच्याकडे अतिरिक्त पडून राहिलेल्या साखरेच्या साठ्यांपासून इथेनॉल तयार करतात. याबाबत ची नोंद शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेमध्ये गृहीत धरावी लागेल. याचा कुठेही उल्लेख आलेला नाही किंवा वसंतदादा साखर संशोधन संस्थेच्या प्रामाणिकरण मध्ये दाखवलेले नाही. साधारणपणे एक टन साखर उत्पादन हे 600 लिटर इथेनॉलच्या बरोबर आहे.

🟢 इथेनॉलचा सध्याच्या किमती खालीलप्रमाणे
⭐ इथेनाॕल सी मोलॕसिसपासून बनवले असेल तर – 49.41 रुपये प्रति लिटर.
⭐ इथेनाॕल बी मोलॕसिसपासून बनवले असेल तर – 60.73 रुपये प्रति लिटर.
⭐ इथेनाॕल ऊसाच्या रस/साखर सिरप/साखरेपासून बनवले असेल तर – 65.61 रुपये प्रति लिटर.

इथेनाॕल हे द्वितीय प्रक्रिया उपपदार्थ आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. भार्गव यांच्या शिफारशीनुसार व ऊस (नियंत्रण) आदेश 1966 च्या कलम 5 A मधील जुन्या तरतुदीनुसार या उपपदार्थांच्या विक्रीतील नफा कारखान्यांनी 50 टक्के व ऊस उत्पादकांना 50 टक्के असा वाटून घ्यावा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा.

दुसरा मुद्दा असा आहे की, साखर कारखाने जो तपशील व्हीएसआयला पाठवतात, म्हणजे मुख्य उत्पादनाचा कोणचा व किती टक्के भाग इथेनॉलसाठी वळवला आहे, हे कोण तपासते? कारखान्यांमध्ये महागडे मास फ्लो मीटर (Mass flow meter) लावलेले आहेत. त्यात दररोज किती पदार्थ वळवले गेले, याच्या अचूक नोंदी केल्या जातात. त्याची पडताळणी एकत्रितपणे व्हीएसआयच्या प्रतिनिधींकडून करण्यात येते असे समजते.

व्हीएसआयच्या वार्षिक अहवालामध्ये असे नमूद आहे की, त्यांनी सन 2019-20 च्या गाळप हंगामामध्ये फक्त 23 कारखान्यांचे रिकव्हरी घट सर्टिफिकेशन केले आहे. बाकीच्या कारखान्यांनी ज्यांनी इथेनॉल तर प्रकल्प उभारले आहेत, त्यांनी त्या सीझनमध्ये ते कार्यान्वित केले नव्हते का, हे पाहावे लागेल.
( हा लेख आमच्या टास्क फोर्स शुगर कोअर कमिटीच्या मीटिंगमधील चर्चेवर आधारित आहे.)
🟢 एकच ध्यास – शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

1 thought on “Ethanol effect : उसाची ‘एफआरपी’ एकरकमी ऐवजी दोन टप्प्यात; इथेनॉल इफेक्ट!

  1. अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद याची तसूभरही कल्पना किंवा माहिती ज्ञान शेतकरी वर्गाला नसते त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत यांवर बोलता येत नाही सुशिक्षित तरुणांना देखील ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!