krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Premonitions of rain : पशुपक्ष्यांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत!

1 min read
Premonitions of rain : प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक तथा अरण्यऋषी श्री मारुती चितमपल्ली यांनी वेगवेगळ्या पशुपक्षांचे बारकाईने निरीक्षक करून ते पावसाचे संकेत कसे देतात, याबाबत विस्तृत लेखन केले आहे. विशेष म्हणजे, पशुपक्षांची दिलेले पावसाविषयीचे पूर्वसंकेत (Premonitions of rain) हवामान खाते (Department of Meteorology) आणि पंचागाच्या अंदाजाच्या (weather forecast) तुलनेत अचूक ठरतात, असा आजवरचा अनेकांना अनुभव आहे.

💦 चातक पक्षी (Jacobin cuckoo)
पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की, पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

💦 पावशा पक्षी (Common hawk cuckoo)
चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की, जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

💦 तित्तीर पक्षी (Pheasant bird)
माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोड्यान केको.. कोड्यान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की, आता लवकरच पाऊस येणार, असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु, मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की, ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

💦 कावळा (Crow)
कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभूळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर, पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर, त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर, पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात. यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

💦 वादळी पक्षी (Storm bird)
पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार, याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

💦 मासे (Fish)
पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंड्यांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

💦 खेकडे (Crabs)
तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता, अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु, त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

💦 हरीण (Deer)
पाऊस येणार नसेल तर, विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.

💦 वाघीण (Tigress)
आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु, या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही. त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी, आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

💦 वाळवी (Odontothermic obesity)
जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु, पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाट्यात बाहेर पडू लागले की, पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढ्या तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

💦 काळ्या मुंग्या (Black ants)
हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

💦 सरपटणारे प्राणी (Reptiles)
बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की, ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठ्या प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

🌳 मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा – म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.
🌳 खैर (Acacia catechu) आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.
🌳 कवठाला (Wood-Apple) आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.
🌳 बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.
🌳 आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!