Beautiful ceremony for the Tribals : दंडकारण्यातील आदिमांचा रम्य सोहळा; गोडवा मोहामृताचा!
1 min readविकासाच्या तावडीत सापडूनही काहींना विकसित होता येत नाही किंवा विकास या संकल्पनेशी ते स्वत: जुळवून घेत नाहीत, हा दोषच आहे ना! मग, आदिमही दोषीच म्हणावेत! त्यात एक गोष्ट अशीही म्हणता येईल की, विकास पोहोचूच दिला नाही म्हणून ते विकसित झाले नाहीत. ही बाब गावखेडे असोत की शहरे की मग जंगल, साऱ्यांनाच लागू पडते. असो, हा अतिशय गहन चिंतनाचा विषय आहे आणि तो सोडविण्याचा प्रयत्न करणे योग्य की, अयोग्य हा फॅसिजम विरुद्ध कम्युनिझम विरुद्ध सोशॅलिजम असा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आदी आदी प्रकार ठरतो.
जंगल हे जसे वन्य प्राण्यांचे अधिवास आहेत, तसेच ते पुरातन संस्कृतीचेही आणि ही पुरातन संस्कृती पुरातन मानवामुळेच कधीकाळी विकसित झाली होती. म्हणूनच जंगल हे पुरातन मानवांचा अर्थात वनवासींचाही अधिवास आहेत. आता पुरातन म्हणजे कोण? हा प्रश्न पडणेही स्वाभाविक आहे. तू, मी, ते.. असे साऱ्यांचेच मुळ पुरुष प्राचिन काळातच ढगात गेले. कदाचित तो मुळ पुरुष म्हणा वा जिच्या गर्भातून मानवी पिढीचा विस्तार झाला ती मुळ स्त्री आपल्या साऱ्यांची एकच असेल ना.. पुरातन एवढ्यानेच की, आदिमांनी आपली पुरातन संस्कृती आजही टिकवली आहे आणि त्या संस्कृतीची लक्तरे काढण्यास ते आजही तयार नाहीत. अगदी कितीही आक्रमणे झाली तरी!
🌎 आता मुख्य मुद्द्यावर येऊ…
गडचिरोली येथील अभिनव लॉनमध्ये 26 मार्च 2023 (रविवार) रोजी आदिवासी सामूहिक विवाह सोहळा पार पडला. नागपुरातील मैत्री परिवार संस्था आणि गडचिरोली पोलीस दल या सोहळ्याचे आयोजक होते. या सोहळ्यात दहा-विस-तीस किंवा 50 जोडपी नव्हते तर तब्बल 127 जोडपी विवाहबद्ध झालीत. डगर (मोठे) घर, आलिशान कार, विद्युत रोषणाई, चकाचौंध रस्ते, मोठमोठ्ठे उड्डाणपूल, शानोशौकतमध्ये रमलेले आणि रात्रंदिवस पैशाच्या मागे लागून इतरांची निंदानालस्ती करणाऱ्या शहरी लोकांसाठी हा सोहळा म्हणजे एक मेजवानीच होता. जेवण्याखाण्या किंवा इतरण्यासाठी ही मेजवानी नव्हती तर, ही मेजवानी होती आदिमांच्या संस्कृतीत मनसोक्त रमण्याची. गोंड, माडिया आणि इतर आदिम उपजमातीतील ही जोडपी होती. आठ आत्मसमर्पित नक्षली जोडपीही या सोहळ्यात विवाहबंधनात अडकली.
सोहळाही अगदी आदिमांच्या पारंपारिक रितीने पार पडला. दीप, मोहाची डहाळी, रंगवलेली मडकी, सुतबंधन, डाळीचे वडे, दही-दूधभात, मुंडावळ्या आणि बडादेव (महादेव शंकर) पेरसापेन (शिवपार्वती) यांना समर्पित गोंडी भाषेतील मंत्रोच्चार (मंत्रोपचारच म्हणूयात) व हे सारे विधी पार पाडणारे वृद्ध स्त्री किंवा पुरुषाच्या रुपात असलेले किंवा दोघेही सोबतीने असलेले भूमक (पुरोहित) हे सारेच विकसित संस्कृतीतील वैदिक परंपरेप्रमाणेच होते. मग, प्रश्न असा पडतो तर ते वेगळे कसे काय? तर ते वेगळे नाहीतच! आपण इतरांपेक्षा विशेष म्हणजे सुसंस्कृत कसे, हे बिंबविण्याच्या काळात सुसंस्कृत म्हणविले जाणारे आपणच वेगळे होत गेलो आणि त्यांना ते वेगळे असल्याचा ठप्पा मारला गेला. या जाणिवेचा उलगडा होण्याचा हा सोहळा होता आणि हेच या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. वर मंत्रोच्चाराच्या कंसात लिहिल्याप्रमाणे ते मंत्रोपचार कसे, असा प्रश्न पडलाच असेल. आदिम संस्कृती ही पूर्णत: निसर्गाला सर्वेसर्वा मानणारी. निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा उदोउदो करण्याची त्यांची परंपरा विशिष्ट शैलीतून म्हणजेच त्यांच्या गाण्यातून, पूजनातून व्यक्त होत असते. कशाने काय केले आणि काय झाले तर त्याच्यावर काय करावे, हे सगळे त्यांच्या या मंत्रोपचारांमध्ये सामिल आहे. अगदी वैदिक परंपरेप्रमाणेच.
आजही आदिम शेती वगळता जंगलातील झाडांची फळे तोडताना दिसत नाहीत. टेंभरं (रानचिकू), आंबे, जांभळं, मोहफूल (महुआ) आदी अगदी झाडाच्या फांद्यांना लगडलेली असतानाही हे लोक ते तोडत नाहीत. हे फळ, फुल स्वत:च गळून पडण्याची वाट बघत असतात आणि गळून भूमातेवर विसावल्यावरच ते गोळा करून त्याचा म्हणावा, तो व्यवसाय करताना दिसतात. व्यवसायाचे गणित त्यांना कळत नाही असे नाही. परंतु, सृष्टीतील प्रत्येक गोष्टी, वस्तूंचा एक काळ पूर्ण होऊ देण्याचा संयम त्यांच्यात आहे आणि म्हणूनच ते आपण सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्यांपेक्षा खऱ्या अर्थाने सुसंस्कृत ठरतात. हा संयमाचा सुसंस्कृतपणा लग्नाच्या वेदीवर अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या मोहफुलाच्या झाडाची एक डहाळ तोडतानाही दिसतो बरं का! अगदी क्षमायाचना करूनच आणि पूजन विधी करूनच ती डहाळ तोडली जाते आणि नंतरच ती रंगवलेल्या छोट्याच्या मडक्यातील ज्वारी किंवा वाळलेल्या मोहफुलाच्या राशीमध्ये खुपसून उभी केली जाते. खरं सांगायचं तर, आदिम गावातील विवाह सोहळे हे मोहफूल झाडाच्या कुशीत साजरे होणारे असतात. परंतु, शहरात ते झाड कुठे असणार.. म्हणून डहाळ तोडून आणने हा एक पर्याय होता..
🌎 प्रेम हेच जीवन, लग्न हा एक संस्कार…
या सोहळ्यात सहभागी झालेली बरीच जोडपी हे अनेक वर्षांपासून एकत्र नांदत होती. आदिमांमध्ये गोटूल ही परंपरा आहे. गोटूल म्हणजे वयात आलेल्या मुला-मुलींना एकत्र येण्याचे केंद्र आणि जोडीदार निवडून संग करण्याचा अधिकार प्राप्त होतो.. अशी शहरातील बहुतांश लोकांची धारणा आहे. त्याचे कारण म्हणजे, आजपासून दहा-पंधरा वर्षापूर्वीपर्यंत किंवा बहुतेक आजही शालेय पाठ्यपुस्तकात किंवा महाविद्यालयील समाज जीवनाच्या अभ्यासक्रमात ही धारणा बिंबविण्यात आली आहे. त्यात तथ्य नाही, असे नाहीच. परंतु, ते अर्धसत्य म्हणता येईल.
गोटूल म्हणजे आदिम संस्कृती, शिक्षण आणि संस्काराचे केंद्र आहे. या केंद्रातून मुला, मुलींची वयाच्या 18 वर्षापर्यंत किंवा ते प्रगल्भ झाले ही जाण होईपर्यंत जडणघडण केली जाते. त्यासाठी या केंद्रात आदिमांतील सर्वात अनुभवी बहुदा भूमक (पुरोहित) हे कार्य इमानेइतबारे पार पाडत असतो. भूमकाचा (स्त्री व पुरुष) शब्द हा अंतीम मानण्याची परंपरा आहे.
या सोहळ्यात विवाहबद्ध झालेली बरीच जोडपी ही अनेक वर्षापासून एकत्र नांदत होती आणि बऱ्याच जोडप्यांना एक किंवा दोन अपत्ये होती. एखादी वधू गर्भवतीही होती. शहरात लिव्ह इन रिलेशनची परंपरा बावचळल्यासारखी फोफावत आहे आणि त्याचे दुष्परिणाम सारेच बघतही आहेत. मात्र, अर्थाअर्थी विचारात घेतल्यास आदिमांमध्ये लिव्ह इन रिलेशनची परंपरा प्राचिन काळापासून अस्तित्त्वात असल्याचे जाणवते. मात्र, त्यांच्या या लग्नापूर्वीच्या नात्याला खरेच लिव्ह इन रिलेशन म्हणता येईल का, असा प्रश्न पडतो. कारण, शहरी विशेषत: मेट्रोपोलिटन सिटीमध्ये जो हा लिव्ह इनचा प्रकार फोफावत आहे, त्यात सोबत राहून बघू, मन जुळले तर आणखी सोबत राहू आणि पटले तर लग्नबंधनात अडकू… असा विचार आहे. या बघू, राहू, अडकूच्या विचारात धादांतपणाचा कट दिसून येतो. असले हे रिलेशन शारिरिक आकर्षणापासून अलिप्त राहू शकतील का? बाकी पुढचे सर्वांच्या मनात आलेले प्रश्न माझ्याही मनात आहेतच.
आदिमांमध्ये असलेली विवाहपूर्वीपासूनच नांदण्याची परंपरा ही अतिशय विश्वासातून, सहवासाच्या उत्कटतेतून आणि निरागस, नि:स्पृह प्रेम भावनेतून चालत आलेली आहे. त्यांच्या प्रेमात स्पेसला जागा नाही तर रिकामी असलेली पोकळी भरून काढण्याची वृत्ती आहे. त्यांच्या या परंपरेच्या नात्यात कसलीही अट नाही. त्यांच्यासाठी प्रेम हेच जीवन आहे आणि म्हणूनच कुठल्याही कराराविना, लेखी पुराव्याशिवाय ते सोबत असतात. हे मात्र खरे की जोवर त्यांचा विवाह होत नाही तोवर त्यांना कौटूंबिक म्हणा वा ग्राम धार्मिक विधित स्थान नसते आणि त्याची जाणीव ठेऊन त्यावर ते कधीही आक्षेप घेत नाहीत. उलट आता आपण जबाबदार, प्रगल्भ झाल्याची जाणीव होते, तेव्हा ते लग्नाचा संस्कार (सोपस्कार) पार पाडण्यास सज्ज होतात. या सर्व प्रकाराला त्यांच्या ज्येष्ठांकडून मान्यताही मिळते, हे विशेषत्त्वाने सांगावे लागते. दोन्ही नात्यांची सुरुवात कुटूंबातील होकारातूनच होते. शहरातील लिव्ह इन रिलेशनमध्ये पालक वर्ग कायम अंधारात असतो.
असेही नाही की सारेच आदिम युवक-युवती विवाहापूर्वीच नांदत असतात, असे प्रकार एखाद दुसरे असू शकतात. मात्र, आदिमांमध्येही उपवर-वधूंचा शोध घेतला जातो. दोन्ही कुटुंबाचे ज्येष्ठ बसतात आणि पुढचे विधी ठरवले जाते. यांच्याही लग्न विधीत हळद लागण्याला महत्त्व असते. येणाऱ्या वऱ्हाड्यांना हलकीशी झिंग असणारी ताडी (ताडाच्या झाडातून निघणारा द्रव पदार्थ), गोरगा (गोरग्याच्या झाडापासून निघणारा द्रव पदार्थ), सापी (तांदळाचे पाणी) हे दिले जातात. गाणी गायली जातात. रेला नृत्य केले जाते. सारेच मजेशीर असते.
🌎 गोंडी गाण्यांवर रेलाचा ठेका…
या विवाह सोहळ्यातील एक लक्षवेधी घटना म्हणजे रेला.. रेला हा आदिम लोकनृत्य प्रकार आहे. अगदी साधा आणि बघताच कोणीही त्यांच्या पाऊलावर पाऊल मिळवून त्यात सहभागी होऊ शकतात. कुलगोत्राने समाज सारा एकत्र येऊ दे, अशा आशयाची गाणी असतात. आणि ही गाणी कुठेही वाजू लागली की आदिमांमध्ये एकप्रकारचे चैतन्यच संचारते आणि सारेच रिंगण घालून नाचायला लागतात. नाचताना ते ओरडतात आणि आपला आनंद व्यक्त करत असतात.
सामूहिक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. गोंडीतील मंगलाष्टके पार पडली. साऱ्यांनीच अक्षता उधळल्या आणि टेपरेकॉर्डरवर कुणीतरी गोंडी गाणी वाजविण्यास सुरुवात केली. गाण्यांचे बोल कानावर पडताच सारे 127 जोडप्यांचे वऱ्हाडी मांडवातच रिंगण घालायला लागले आणि आनंद व्यक्त करत रेला नृत्य नाचू लागले. त्यांच्यासोबतच वर-वधूही ठेका धरायला लागले. तिकडे भूमक वऱ्हांड्यांवर व वर-वधूंवर ओरडायला लागले. कारण, विवाहवेदीवर असलेल्या वर-वधूंना नाचण्यास मनाई असते. मात्र, सारेच जेव्हा एकसाथ ठेका धरत असतील तर ते ऐकणार तरी कसे? ही सारी मानवी वृत्ती. एकसाथ 127 जोडपी व त्यांचे वऱ्हाडी एकत्र आले तर ते कुणाला जुमानणार? सारीच मज्जा. त्यांच्यासोबत उत्सुकतेपोटी आलेले शहरातील नागरिक, तरुण-तरुणीही जल्लोष करण्यासाठी होतेच की! विवाहसोहळ्यात पार पडलेल्या हा रेला नृत्याचा नृत्यमहोत्सव दिलखेच आणि मनाला दिलासा तसेच आल्हाद देणाराही होता. विशेष सांगावे ते अतिदुर्गम अशा भामरागड मधून वेगवेगळ्या दुर्मिळ गावांतून आलेल्या जोडप्यांचे व त्यांच्या वऱ्हांड्याचे. ते कसलाही मुलाहिजा न बाळगात मनसोक्त रेला करत होते.
🌎 नक्षली जोडपी आणि त्यांचे भविष्य…
या सोहळ्यात 8 आत्मसमर्पित नक्षली जोडपीही विवाहबद्ध झाली. बहुतेक ही आठही जोडपी नक्षलीच होती आणि त्यांचे प्रेमसंबंध चळवळीत असतानाच जुळलेली होती. नक्षली गणवेषाचे आकर्षण, बंदूक आणि त्यांचे गाणे व नाचणे हे बालमनाला भूरळ घालणारेच असतात. जंगलात आकर्षणाचे दुसरे सोंगच नाहीत ना.. ते सारेच जेव्हा बुद्धीचा विकास झालेला नसतो. चांगले-वाईट काय याचे भान उमगलेले नसते. अशा वयात जोरजबरीने म्हणा वा नासलेल्या भीतीने नक्षली चळवळीत सहभागी झालेले. त्यांच्यापैकी काहींशी बोलणे झाले तेव्हा कळले की, प्रारंभीचे काही वर्ष स्वेच्छेने चळवळीत होते. परंतु, नंतरचे वर्ष अनिश्चेनेच. एक तर सलग 21 वर्षे नक्षली चळवळीत होता. वयाच्या 14 व्या वर्षी गणवेष, बंदूक आणि नाच-गाण्यांच्या आकर्षणाने तो त्यांना हिरोच मानत होता. एकदा नक्षल्यांनी त्याला सोबत नेले आणि पाच दिवस सोबत ठेवले. जेव्हा त्याच्या मनाला उबग आली तेव्हा तो घराकडे परतायला निघाला तर, नक्षल्यांच्या म्हेरक्याने त्याला आता तू आमच्यासोबत असल्याने पोलीस तुला मारून टाकतील आणि तुझ्या घरच्यांचा छळ मांडतील, अशी भीती दाखवली.
वयाच्या 14 व्या वयात तो बालक घाबरला आणि तो तेथेच थांबला. आज तो 36 वर्षाचा आहे. 2022 मध्ये त्याने त्याच्या सखीसोबत आत्मसर्पण केले. या 21 वर्षात तो त्याच्या कुटुंबीयांना केवळ एकदाच भेटला होता. कुटूंब दूर झाले होते. आता मात्र तो त्यांना भेटतो. परंतु, आपल्या गावात जाऊ शकत नाही. कारण, तो त्याच्या गावात गेला तर त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे काय होईल? हे त्याला चांगल्याने ठाऊक आहे. अशा आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांसाठी गडचिरोली पोलिसांनी नवजीवन वसाहत उभारली आहे. तेथेच त्यांना घर व रोजगार दिला जातो. त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था असते आणि भविष्यातील एक सुजाण नागरिक घडविण्याचे उपक्रम सुरू असते.
🌎 एक हात मैत्रीचा…
मैत्री परिवार संस्था ही तशी नागपूरची. नागपुरात विविध सामाजिक उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात. गेल्या काही वर्षात या संस्थेने आपला ओढा गडचिरोलीकडे वळवला आहे. आदिवासींचे विवाह करण्याइतपतच ते थांबले नाहीत तर त्यांनी तिथे शैक्षणिक, सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. त्यांचे हे कार्य वाचून होणार नाही तर, प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा अनुभव घेता येईल, इतके मोठे कार्य संस्थेचे आहे.