krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Endless suffering of farmers : अंतहीन वेदनांची मूक घुसमट

1 min read
Endless suffering of farmers : कोणत्याही खेड्यात कधीही जा, समोर येणारं समान चित्र आहे... वेदना, वेदना आणि वेदना! शेतकरी (Farmer) कोणत्याही पिकाचा (Crop) असो, त्याचा घाटा (Losses) ठरलेला, तो कर्जाखाली दाबून गेलेला. वीज नाही. असली तर कधीही येते, कधीही जाते. त्यामुळे रात्री अपरात्री जीवावर उदार होऊन राबावे लागते. पाणी उपलब्ध असूनही ते पिकांना देता येत नाही. वीज आली तर वीजपुरवठ्याचा दाब कमी अधिक होत असतो. कारण शहरांना पुरवून शिल्लक राहिलेली आणि साठवता न येणारी वीज शेतीसाठी दिली जाते. बियाणे खात्रीशीर मिळण्याची खात्री नाही. खतात भेसळ केलेली नसेलच याची गॅरंटी देणार कोण? ऐन मोसमात मजुरांची वणवा (Labor problem). अशा कितीतरी समस्या. या साऱ्या संकटावर मात करून शेतकऱ्यांनी कितीही मेहनत घेतली तरी किती पीक पदरात पडेल, हे त्या वर्षीचा निसर्ग ठरवतो.

निसर्गाचे चांगले दान पडून भरभरून पीक पदरात पडले तर, माथेफिरू निर्णय घेणारे आणि शेतमालाचे भाव पाडायला सरकार टपून बसलेले असते. सभोवताली अडचणीचे असंख्य डोंगर उभे असलेल्या शेतकऱ्यांनी कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे? गावागावात शेतकऱ्यांच्या अंतहीन आणि मुक वेदनांची (Endless suffering) नुसती घुसमट चालू आहे.

या घुसमटीतूनच आजपावेतो साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा मार्ग पत्करला आहे. आजही दररोज चाळीस पन्नास शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य मरण कवटाळत आहेत. त्यांच्या वेदना आम्हाला जाणवतात की, नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. त्यांनी खुशाल झाडाला लटकावे आणि आम्हाला स्वस्त धन्य उपलब्ध करून द्यावे. नाही दिले तर, आम्ही महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारच, या मानसिकतेला काय म्हणावे? सरकार नावाच्या निर्दयी आणि संवेदनशून्य संस्थेबद्दल तर काय बोलावे? प्रत्येक राजकारण्याला सत्तेत स्थान मिळवण्यात आणि टिकवण्यातच रस आहे. सत्ता मिळवण्यालाच ते शेतकऱ्यांची सेवा समजतात, इतकी निगरघट्ट ही जमात बनली आहे.

परवा अहमदपूर (जिल्हा लातूर) तालुक्यातील थोरल्या वडीचे मोहनराव वलसे नावाचे शेतकरी मित्र भेटले. पूर्वीचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पुढे ते पोलिसात नाेकारीला लागले. आता रिटायर झाले. शेतीची प्रचंड आवड, सीड प्लॉट घेतात, टरबूज लावतात, काकड्या घेतात, म्हशी ठेवतात दूध विकतात, नुसता व्याप आणि मनस्ताप. मी म्हणालो, कशाला म्हातारपणात व्याप वाढवता आणि मनस्ताप करून घेता? बरं एवढा व्याप करून काही पदरात पडतं का? म्हणाले, काय सांगू आतापर्यंत भीत भीत सांगतो. 25 लाख तर घातलाव शेतात. खरा हिशोब लावला तर, हा आकडा 50 लाख होऊ शकतो. कशाचा कशाला थांग लागत नाही. आता वाटुलालया शेताच्या नादाला लागलो नसतो तर, तेवढे पैसे वाचले असते. सांगत होते, मी शेतात बटाट्यांपासून टोमॅटोपर्यंत अनेक पीक घेतोय. पण एकही पीक असं नाही, जे जनावराला खाऊ घालावं लागलं नाही.

वलसे साहेबाप्रमाणे रिटायर्ड नोकरदार, नोकरीत, राजकरणात, व्यापारी, गुत्तेदार या क्षेत्रात असलेला एक वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीत पैसे घालतो आहे. गाठीशी शेतीबाहेरून कामावलेले पैसे आहेत. पेन्शन चालू आहे. वेगवेगळ्या नोकरीत असलेली शेतकऱ्यांची मुलं बापा भावाला पैसे पुरवत आहेत. या शेतकऱ्यांना शेतीच्या तोट्याची आच त्यांना जाणवत नाही. शेतीबाहेरून कामावलेल्या पैशातून ही मंडळी शेतीचा तोटा भरून काढतात. याच शेतकऱ्यांचे बंगले उभे राहताहेत. घरासमोर गाड्या रहात उभ्या दिसतात. प्रामाणिकपणे काम करणारे शेतकरी प्रचंड दबावात आहेत. त्यांना वाटते की, बहुदा आपलच काही चुकत असलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याकडे यांच्याप्रमाणे काही शिल्लक राहत नसणार.

दुसरे नदीवडीचे शेतकरी भेटले. न्यानबा (ज्ञानोबा) पाटील. ते 25-30 वर्षांपासून ऊस लावतात. हे जातिवंत शेतकरी, यांना बाहेरून पैसा येत नाही. चुलवण, कलया, वगैरे गूळ करण्याचा सर्व बारदाना अद्ययावत आहे. आम्दा किती आदनं निघाले पाटील? म्हणाले, 90 गूळ तयार करण्याचा किती खर्च आला? म्हणाले, ते काई ईचारू नका. एका आदनात अडीच क्विंटल गूळ निघतोय. दोन ते अडीच हजार भाव हाय. 2,200 रुपये भाव धरला तर एका आदनाचे 5 ते 6 हजार होतात. ऊस तोडून त्याचा गूळ करेपर्यंत मजुरी जाते आडीच हजार रुपये. याचा अर्थ केवळ शेवटच्या काढनीच्या मजुरीत 35 ते 40 टक्के पैसे जातात. वर्षाच्या खर्चाचा हिशोब लावला तर हाती काही लागत नाही.

परवा सोलापूरच्या शेतकऱ्याला कांदे विकून खर्च वजा जाता दोन रुपये शिल्लक राहिलेले, ही बातमी ताजी आहे. आज बातमी आली एका शेतकऱ्याला कांदे विकून 1,688 रुपये पट्टी आली. त्यातील 1,687 रुपये खर्चात गेले. वरुन 140 रुपये खर्चाचे वेगळे भरावे लागले. सन 1985-86 ची गोष्ट असेल, मी एक पोतं भेंडी घेऊन लातूरच्या बाजारात गेलो. भेंडी तोडल्यानंतर बाजारात जाण्याचा आणि विक्रीचा खर्च झाला सव्वादोन रुपये. हातात आले दीड रुपये. हे काही आजच चालू आहे असं नाही. या आणि अशा घटना खेड्यात हरघडी घडत असतात. सगळ्या देशात पाण्याची सोय, खते, बऱ्यापैकी बियाणे उपलब्ध झाले आणि त्याला वाढत्या आर्थिक उलाढालीची जोड मिळाली. त्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादनात सातत्याने वाढत आहे. इकडे सरकार बाजारात हस्तक्षेप करून भाव पाडण्याचे कारस्थान कायमच करत असते. शेतीबाहेरील पैसे शेतीत ओतणारे शेतकरी असोत की आपल्या सामर्थ्यावर शेती करणारे शेतकरी असोत त्यांची शेती तोट्यातच आहे. शेतकऱ्यांच्या व्यवसायाच्या बाबतीतच असे का घडते? (पूर्वार्ध)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!