krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Bordo mixture, paste : शेतकरी बांधवांनाे, बोर्डो मिश्रण, बोर्डो पेस्ट कसे तयार कराल?

1 min read
Bordo mixture, paste : भारतात फळपिकांपासून मिळणाऱ्या उत्पादनात लिंबुवर्गीय फळपिकांचा फार मोठा वाटा आहे. व्यापारीदृष्ट्या संत्रा हे फळपीक अत्यंत महत्त्वाचे आहे. नागपुरी संत्री अतिशय लोकप्रिय आहे. विदर्भात एकूण संत्रा फळपिकाखालील क्षेत्र अधिक असून, त्याखालाेखाल क्षेत्र माेसंबी व लिंबू या फळपिकांचे आहे. परंतु, मागील पाच - सहा वर्षांपासून लिंबुवर्गीय फळपिके म्हणजेच संत्रा, मोसंबी आणि लिंबाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे. याची विविध कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने लिंबुवर्गीय फळपिकांवर येणारे विविध रोग जसे खैऱ्या, विषाणूजन्य मंदऱ्हास, जलदऱ्हास, बुरशीजन्य पायजूक आणि डिंक्या होय. या बुरशीजन्य रोगांपासून बचावात्मक उपाय म्हणजेच बोर्डो पेस्ट (Bordo paste) किंवा बोर्डो मिश्रण (Bordo mixture)! यांचा उपयोग करणे होय.

या पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिश्रण व बोर्डो मलम याचा वापर फायदेशीर आहे. बोर्डो मिश्रणाचा उपयोग द्राक्षावरील केवडा, बटाट्याचा करपा, संत्र्यावरील शेंडेमर, टमाट्याचा करपा, पानवेलीवरील मर इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो. बोर्डो मिश्रण व बोर्डो मलम तयार करण्याच्या पद्धतीची माहिती खालील प्रमाणे आहे.

🟢 बोर्डोक्स मिश्रण व बोर्डोक्स पेस्ट तयार करण्याची पद्धती
ताम्रयुक्त रासायनिक बुरशीनाशकामध्ये बोर्डोक्स मिश्रण फार जुने गणले जाते. पिकांवरील अनेक रोगांच्या व्यवस्थापनाकरिता बोर्डोक्स मिश्रण उपयोगात आणले जाते.

🟢 बोर्डोक्स मिश्रण म्हणजे काय
मोरचूद (कॉपर सल्फेट- Copper sulfate), चुना (कॅल्शियम हायड्रोक्साइड – calcium hydroxide) आणि पाणी यांच्या प्रमाणशीर मिश्रणास बोर्डोक्स मिश्रण (Bordeaux mixture) असे म्हणतात.

🟢 बोर्डोक्स मिश्रणाचा शाेध
1878 च्या सालात युराेपमध्ये द्राक्षावरील केवडा रोगाने द्राक्षबागांमध्ये थैमान घातले होते. यामुळे युरोपमधील वाईन उद्योग धोक्यात आला. यावर प्रतिबंधक उपाय औषधाची शाेध मोहीम सुरू होती. त्याचवेळेस फ्रांसमधील बोर्डो विद्यापीठातील प्रध्यापक पी. ए. मिलारडेट यांनी सन 1882-83 च्या दरम्यान बोर्डो मिश्रण या ताम्रयुक्त औषधाचा शाेध लावला. मोरचूद व चुना यांच्या प्रमाणशीर मिश्रणाच्या प्रयाेग त्यांनी द्राक्ष बागांमध्ये केला. 1885 साली शाेध षेध पत्रकाद्वारे बोर्डो मिश्रणाची उपयोगिता विस्तुत केली. कालांतराने या मिश्रणास बोर्डोक्स मिश्रण असे नाव प्राप्त झाले. तेव्हापासून आजतागायत या औषधाचा प्रयाेग एक प्रभावी, कमी खर्चिक रोग नियंत्रक म्हणून केला जातो.

🟢 उपयोग
या मिश्रणाचा उपयोग मुख्यतः फळबागांमध्ये रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक म्हणून वापर करतात. संत्रा, मोसंबी, द्राक्ष, आंबा, चिकू, बोर इत्यादी फळवर्गीय पिकावरील बुरशीजन्य राेग जसे डिंक्या, अंथकनोज, करपा, पानावरील ठिपके इत्यादी रोगांच्या व्यवस्थापनासाठी करण्यात येतो.

🟢 बोर्डोक्स मिश्रणाचे रासायनिक पृथःकरण
❇️ मोरचूद : मोरचूद (कॉपर सल्फेट), चुना (कॅल्शियम हायड्रोक्साइड) आणि पाणी असे बोर्डोक्स मिश्रणाचे प्रमुख घटक आहे. यातील मोरचुदाचे द्रावण हे आम्लधर्मी (acidic) आणि चुन्याचे द्रावण हे विम्लधर्मी (Alkaline) सांसपदम असते तर, पाणी हे उदासीन किंवा किंचित विम्लधर्मी असते. मात्र, तयार होणारे बोर्डोक्स मिश्रण उदासीन किंवा किंचित विम्लधर्मी असावे लागते. हे मिश्रण तयार करण्यासाठी लाकडी किंवा माती किंवा प्लास्टिक भांडी वापरावीत. मोरचुदाचे द्रावण हे लोखंडी अथवा तांब्या पितळीच्या भांड्यात रासायनिक क्रिया घडवून आणते. त्यामुळे अशा प्रकारच्या भांड्यात बोर्डोक्स तयार करू नये किंवा असे भांडे वापरू नये. या मिश्रणाचा सामे हा 7.0 ते 7.2 असणे आवश्यक आहे. मिश्रणाचा सामू हे 7.5 पेक्षा जास्त होऊ देऊ नये अन्यथा हे मिश्रण बुरशीनाशक म्हणून निरूपयोगी ठरते. बोर्डोक्स मिश्रण तयार करताना वेगवेगळ्या प्रमाणात मोरचूद आणि चुना यांचे प्रमाण घेवून वेगवेगळ्या तीव्रतेचे बोर्डोक्स मिश्रण वापरतात.

🟢 एक टक्का तीव्रतेचे 100 लिटर मिश्रण तयार करण्याची पद्धत
❇️ साहित्य
सर्वप्रथम बोर्डोक्स मिश्रण तयार काण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची जुळवणी करावी. यामध्ये अंदाजे 15-20 लिटर मापाचे प्लास्टिकची बादली किंवा मातीचे मडके/भांडे, 200 लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम, गर्दनिळ्या रंगाचे मोरचूद 1 किलो, कळीचा चुना 1 किलो, आम्ल – विम्ल निर्देशांक कागद (लिटमस पेपर) किंवा लोखंडी खिळा अथवा पट्टी, क्षारविरहित स्वच्छ पाणी, ढवळण्याकरिता लाकडी काठी, गाळण्याकरिता कापड इत्यादी.

❇️ पद्धत
✳️ गर्द निळ्या रंगाचे स्फटिकासारखे 1 किलो मोरचूद घ्यावे. त्यानंतर मोजलेल्या मोरचूदची बारीक पूड करावी. एका प्लास्टिकच्या बादलीत 10 लिटर पाणि घेवून मोरचुदाची बारीक पुड विरघळण्यास टाकावी.
✳️ उच्च प्रतिचा 1 किलो कळीचा चुना घ्यावा. दुसऱ्या प्लास्टिकच्या बादलीत 10 लिटर पाणी घेवून चुना विरघळू द्यावा.
✳️ चुन्याचे द्रावण पातळ कापडातून गाळून घ्यावे आणि तिसऱ्या बादलीत ओतावे. आवश्यकता वाटल्यास मोरचुदाने द्रावण सुद्धा गाळून घ्यावे.
✳️ चुन्याचे द्रावण थंड झाल्यानंतर मोरचूद व द्रावण एकत्रितरित्या वेगळ्या भांड्यात एकत्रिक ओतावे आणि ओतत असताना ते लाकडी काठीने सतत ढवळावे.
✳️ दोन्ही द्रावणे एकत्र केल्यानंतर चांगले ढवळावे आणि नंतर द्रावण 200 लिटर मापाच्या प्लास्किच्या ड्रमात ओतावे. त्यामधे उरलेले 80 लिटर पाणी द्रावणात टाकून ते लाकडच्या काठीने ढवळावे.
✳️ अशाप्रकारे एकुण 100 लिटर द्रावण तयार होईल. तयार झालेल्या मिश्रणाचा रंग आकाशी होतो.
✳️ तयार झालेले द्रावण फवारणीस योग्य आहे किंवा नाही तपासण्याकरिता म्हणजेच मिश्रणाची उदासीनता चाचणी घेण्यासाठी द्रावणत तांबडा लिटमस कागदाचा तुकडा बुडवावा. तो जर निळा झाला तर मिश्रणात अधिक थोडे चुन्याचे द्रावण ओतावे. लिटमस कागद नसल्यास लोखंडी खिळा किंवा पट्टी टाकावी. खिळा किंवा पट्टी यावर तांबुस थर चढला तर द्रावण आम्ल झाले असे समजून त्यात वरील प्रमाणे चुन्याची निवळी ओतावी आणि आम्लपणा नाहीसा करावा. अशाप्रकारे तयार झालेले द्रावण फवारणीसाठी वापरावे.(निरनिराळ्या तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यास लागणारे मोरचूद, चुना आणि पाणी यांचे प्रमाण तक्त्यात दिले आहे.)
एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी साठी 500 लिटर पाण्याची गरज भासते. अशावेळेस वरील तक्त्यानुसार 1 टक्के तीव्रतेच्या मिश्रणासाठी प्रत्येकी 5 किलो मोरचूद, 5 किलो चुना व 500 लिटर पाण्यासाठी वापरावा.

🟢 बोर्डोक्स पेस्ट
फळझाडांना रोगामुळे होणाऱ्या जखमांना लावण्यासाठी बोर्डोक्स पेस्टचा उपयोग होतो. बोर्डोक्स पेस्ट लावण्यासाठी बुरशीचा वनस्पतीच्या जखमांवर हल्ला होत नाही. फळझाडांमध्ये छाटणी करताना किंवा झाडांना आकार देण्यासाठी फांद्या कापाव्या लागतात. छाटनी झाल्यावर किंवा फांद्या कापल्यावर झालेल्या जखमेच्या ठिकाणापासून हानिकारक सूक्ष्मजीवांची लागण हाेण्याची भीती असते. अशा जखमेच्या ठिकाणी बोर्डोक्स पेस्ट लावल्यास रोगांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळते. लिंबुवर्गीय फळझाडांवरील डिंक्या रागाचे व्यवस्थापनाकरीता बोर्डोक्स पेस्ट लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. फळझाडांना जमिनीपासून वर 1 मीटर उंचीपर्यंत बोर्डोक्स पेस्ट वर्षातून दोन वेळा पावसाच्या आधी (जून मध्ये) आणि पावसाळ्यानंतर (ऑक्टोबर मध्ये) लावावी.

🟢 बोर्डोक्स पेस्ट तयार करण्याची पद्धत
✳️ एक किलो मोरचूद घ्यावे आणि त्याची बारीक पूड तयार करून किंवा पुरचुंदी बांधून 5 लिटर पाण्यात टाकून प्लास्टिकच्या बादलीत विरघळून घ्यावे.
✳️ दुसऱ्या बादलीत 5 लिटर पाणी घेवून त्यात एक किलो कळीचा चुना विरघळून घ्यावा.
✳️ तद्नतर दोन्ही द्रावणे एकाच वेळी तिसऱ्या बादलीत ओतावे आणि लाकडी काठीने ढवळावे.
✳️ एकत्रित झालेले सर्व घटक पेस्ट स्वरुपात तयार होतील, हे मिश्रण म्हणजे बोर्डोक्स पेस्ट होय.
✳️ घट्ट झालेले द्रावण ब्रश अथवा कुचीच्या सहाय्याने झाडाच्या बुध्याला लावावे.

🟢 बोर्डोक्स मिश्रण/बोर्डोक्स पेस्ट तयार करताना/वापरताना घ्यावयाची काळजी
✳️ चांगल्या प्रतिच्या मोरचुदाने गर्द निळ्या रंगाचे स्फटिकासमान खडे निवडावे.
✳️ चुना उत्तम प्रतिचा, विरी न गेलेला म्हणजेच विरजताना फसफसणारा वापरावा.
✳️ लाकडी पिंप किंवा मातीची भांडी किंवा प्लास्टिकची भांडी द्रावण तयार करण्यासाठी वापरावी.
✳️ मोरचूद आणि चुन्याचे द्रावण एकमेकात मिसळण्यासाठी दोन्ही द्रावणे थंड करून घ्यावे.
✳️ मिश्रण गाळून घ्यावे म्हणजेच फवारणी करताना पंपाच्या तोटीत कण अडकणार नाही.
✳️ बोर्डोक्स मिश्रण बागेवर फवारण्यापूर्वी ते उदासीन म्हणजेच मिश्रणाचा सामू 7.0 ते 7.2 असल्याची खात्री करून घ्यावी.
✳️ जेवढ्या मिश्रणाची आवश्यकता आहे, तेवढेच मिश्रण तयार करावे आणि त्याच वेळेस पूर्णपणे वापरावे.
✳️ मिश्रण केल्यानंतर त्याच दिवशी ताबडतोड वापरावे. उरलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी वापरू नये. वापरल्यास रोपांवर परिणाम होतो.

©️ डाॅ. एकता डी. बागडे
सहायक प्राध्यापक (रोगशास्त्रज्ञ)
©️ डॉ. प्रदीप दवणे,
सहायक प्राध्यापक (कीटकशास्त्रज्ञ)
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, काटोल, जिल्हा नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!