krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Marathi Sahitya Smmelan : मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख अतिथी, साहित्यिकांना खुले पत्र

1 min read
Marathi Sahitya Smmelan : प्रिय सुज्ञ साहित्यिक, पुढारी, नागरिक बंधू,भगीनींनो, वर्धा येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने आयोजकांचे अभिनंदन.देशाची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायांवर अवलंबून असल्याने आपला देश 'कृषिप्रधान' असल्याचे सर्व साहित्यात, पुढाऱ्यांच्या भाषणातून दिसून येते. पण देशात सर्वांत जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्यांच का होत आहे ? या विषयावर या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चिंतन व्हावे, यासाठी हा संवादाचा प्रयत्न.

देशातील व्यावसायिक म्हणून त्यांचे व्यवसायात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण, शेतकऱ्यांना त्यांचे शेती व्यवसायांत जगात वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेले जी.एम. बियाणे, तणरोधक बियाणे वापराला, उत्पादनाला पूर्वीच्या सरकारने घातलेली बंदी आताच्या सरकारने सुद्धा कायम ठेवून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाकारले आहे. ही बंदी कायम राहावी म्हणून आज सत्तेत असलेले सरकार आणि पूर्वीचे सत्ताधारी, काही पर्यावरणवादी, काही स्वयंसेवी संघटना, काही बुद्धीजीवी कायम प्रयत्नशील आहे. पण का ? देशातील सर्व घटकांना व्यवसाय, व्यापार स्वातंत्र्य आहे. फक्त शेतकऱ्यांनाच ते का नाकारल्या जात आहे?

जीएम, तणरोधक बियाणे आरोग्यास हानिकारक असल्याची ओरड काही बुद्धीजीवी मंडळी करते. पण, कोरोना प्रतिबंधक घेतलेली ‘कोविड’ लसीला कोणीच विरोध केला नाही आणि सरकारने ही पुढाकार घेवून 100 टक्के जनतेचे लसीकरण केले. ही लस तर याच ‘जीएम’ तंत्रज्ञानाने तयार केली आहे. ती लस जर रोगप्रतिकारक व ‘आरोग्यवर्धक’ आहे, तर तेच ‘जीएम’ तंत्रज्ञान शेती पिकांत वापरले तर, ते आरोग्यास हानिकारक असल्याचा कांगावा जी बुद्धीजीवी मंडळी करते, त्यांना खरंच बुद्धीजीवी म्हणावं काय?

सरकार विदेशातून खाद्य तेल, कडधान्य, तूर डाळ, पामतेल, सोयापेंडची आयात करून जनतेला वितरीत करते किंवा बाजारात आणते. ते संपूर्ण जीएम बियाण्यांचे उत्पादन आहे. या आयातीला ही स्वयंमघोषित बुद्धीजीवी विरोध का करीत नाही? जगात जीएम, तणरोधक शेतीमाल हे आरोग्यास हानिकारक असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, हे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी संसदेत सांगितले. इतकेच नव्हे तर, केंद्र सरकारच जीएम,तणरोधक मालाची आयात करते, आयात करण्यासाठी देशातील उद्योजकांना आयातीला परवानगी देते. पण, हेच सरकार देशातील शेतकऱ्यांना जीएम, तणरोधक बियाणे उत्पादन, वापरावर बंदी का घालत आहे?

आजही देशात 64 टक्के खाद्यतेल,58 टक्के कडधान्य आयात केल्या जाते. कारण देशाची गरज भागविणारे उत्पादन आपल्या देशात होत नाही. या आयातीवर मोठ्या प्रमाणात देशाच्या गंगाजळीत सामान्य जनतेकडून कराचे रुपात जमा झालेले अब्जावधी रुपये दरवर्षी खर्ची पडते. भारतीय शेतकऱ्यांना जीएम बियाणे वापराला, उत्पादन घेण्यावर घातलेली बंदी हटवून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. कारण, देशात कडधान्य व खाद्यतेलाचे उत्पादन वाढवून देशाला स्वयंपूर्ण करण्याची ताकद भारतीय शेतकऱ्यात आहे. नागरिकांना सुद्धा स्वस्त दरात धान्य, खाद्यतेल, डाळी उपलब्ध होईल. देशातील जनतेचा पैसा देशातच राहील आणि शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी होवून उत्पादन वाढत असल्याने त्यांच्या शेती व्यवसाय नफ्याचा होईल. शेतकऱ्यांची मुलं शेतीतून होणा-या बचतीतून छोटे, मोठे व्यवसाय सुरू करून रोजगार प्राप्त करेल. म्हणजे युवकांची बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल.

महागाईच्या नावावर सरकार सातत्याने शेतीमालाच्या खुल्या बाजारात कधी आयात, कधी निर्यातबंदी, खरेदीवर साठाबंदी, इतकेच नव्हे तर, वायदे बाजारात हस्तक्षेप करून वायदेबंदीचा वापर करीत आहे. केंद्र सरकारने वायदे बाजारात हरभरा, मोहरी, माेहरी तेल, माेहरी पेंड, सोयाबीन, सोयापेंड, साेयातेल, तांदूळ (बिगर बासमती), गहू या शेतमालावर वायदेबंद लावून त्यांचे भाव पाडले आहेत. शेतकऱ्यांचे हिताचे दर्शवून सरकार एफसीआय, नाफेड, सीसीआय या संस्थांद्वारे किमान आधारभूत किमतीप्रमाणे (हमीभाव) शेतमालाची खरेदी करते. तेच धान्य, कडधान्य सरकार कमी दरात विकून देशातील खुल्या बाजारातील शेतीमालाचे भाव पाडते. दुसरीकडे, काेट्यवधी रुपयांचा तोटा सहन करूनही महागाई कमी होताना दिसत नाही. जर ती कमी झाली अस कोणी म्हणत असेल, तर सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी महागाई भत्ता वाढवून का दिल्या जात आहे? म्हणजेच महागाई कमी होत नाही, हे सिद्ध होते.

शेती व्यवसाय व बाजारपेठेवर घातलेली बंधने कायमची हटवून देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे, बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळाले तरच, देश अन्नधान्य व खाद्यतेलाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होईल. शेतकरी सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल. ग्रामीण व शहरी युवकांची बेरोजगारी दूर करण्यास मदत होईल आणि देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल.

या विचाराचा जागर व्हावा, यासाठीच हा प्रयत्न. आपणही आपल्या लेखणीतून, विचारांतून, संवादातून या विचाराला पाठिंबा द्याल, ही अपेक्षा! धन्यवाद!!
पुन्हा एकदा मराठी साहित्य संमेलनाला खूप खूप शुभेच्छा!!!

शुभेच्छूक शेतकरी
मधुसूदन हरणे,
शेगाव (कुंड), ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!