krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Citrus Gummosis : संत्र्यावरील डिंक्या राेग व व्यवस्थापन

1 min read
Citrus Gummosis : संत्रा बागेमध्ये फायटोप्थोरा या रोगाचे बिजाणू जमिनीत असतात. पावसाच्या जोरदार सरीमुळे व अयोग्य मशागतीने लिंबूवर्गीय (Citrus) फळझाडांच्या बुंध्यांना इजा झाल्यास मातीसोबत त्यातील रोगांचे बिजाणू झाडाच्या बुंध्यावर उडतात. बुरशीच्या वाढीस अनुकूल ओलसर दमट वातावरणात झाडाच्या पेशीत प्रवेश करतात. त्यामुळेच डिंक्या रोगाची लागण होते. अनेक बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाने फळझाडांचा जोम कमी होतो. फळझाडांचे उत्पादक आयुष्य कमी होते.

🟢 दुहेरी फायदा
फळबागांचे रोगांपासून रक्षण करण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून वर्षातून कमीत कमी दोन वेळेस बोर्डो पेस्ट (मलम) लावणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी आणि बहाराचे सुरुवातीस बोर्डो पेस्टचा केलेला वापर ‘डिंक्या’ (Gummosis) रोगास प्रतिबंध करतो. त्याबरोबरच उन्हाळ्यातील उष्णतेपासून झाडांचे संरक्षण होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाच्या पाण्याने बोर्डो पेस्ट वाहून बुंध्याशी गेले तरी ते मुळाशी असलेल्या रोगकारक बुरशींचा नाश होवून दुहेरी फायदा मिळतोच.

🟢 बोर्डो पेस्ट म्हणजे काय?
चुना, मोरचूद व पाण्याच्या योग्य प्रमाणातील गडद किंवा घट्ट द्रावणास बोर्डो पेस्ट (मलम) म्हणतात. बोर्डो पेस्ट (मलम) प्रभावी बुरशीनाशक असून, झाडाच्या बुंध्यावर लावण्याकरिता त्याचा वापर केला जातो. यासाठी लागणारे घटक (कळीचा चुना, मोरचूद, पाणी) सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे शेतकरी हे मिश्रण स्वतःच तयार करू शकतात.

🟢 बोर्डो पेस्ट (मलम) तयार करण्याची पद्धत
🔆 बोर्डो पेस्ट तसे पाहिल्यास 10 टक्के द्रावण होय.
🔆 1 किलो मोरचूद : 1 किलो चुना : 10 लिटर पाणी
मोरचूद पाच लिटर पाण्यात भिजवावे आणि वेगळ्या प्लास्टिकच्या बादलीत पाच लिटर पाण्यात कळीचा चुना भिजवावा. मोरचूद व चुना पूर्ण विरघळल्यावर ही दोन्ही द्रावण एकाच वेळेस तिसऱ्या भांड्यात ओतल्यावर हे मिश्रण 10 लिटर होईल.
🔆 द्रावण बनविताना लाकडी, माती किंवा प्लास्टिकच्याच भांड्यांचा वापर करावा. कोणत्याच धातुची भांडी वापरू नयेत.
🔆 मिश्रण तयार झाल्यावर त्याच दिवशी 12 तासातच वापरावे.
🔆 बोर्डोमिश्रण वापरण्यापूर्वी ते रासायनिकदृष्ट्या उदासीन (7 सामू) असणे आवश्यक आहे. त्यावरच या मिश्रणाची शक्ती अवलंबून आहे.

🟢 बोर्डो पेस्ट (मलम) वापराची पद्धत
🔆 झाडांची छाटणी किंवा इजा झालेल्या ठिकाणी व डिंक पाझरत असेल, अशा जागेवरची रोगट साल धारधार व निर्जंतुक केलेल्या पटाशीने किंवा चाकूने काढून रोगट भाग 1 टक्के पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने (10 ग्राम पोटॅशियम परमॅगनेट : 1 लिटर पाणी) निर्जंतुक करून घ्यावे. त्यानंतर बोर्डो पेस्ट लावावी. चाकू किंवा पटास सोडियम हायपोक्लोराइडने निर्जंतुक करावी.
🔆 काढलेली रोगट साल काळजीपूर्वक बागेबाहेर घेऊन जाळून नष्ट करावी.

🟢 डिसेंबर महिन्यात करावयाची कामे
🔆 अंबिया बहाराच्या फळ तोडणीनंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवावी. झाडाना पाणी बंद करून ताण द्यावा. पुरेसा ताण देण्यासाठी सायकोसील 2 मिली/लिटरची फवारणी करावी.
🔆 अंबिया फळतोडणीनंतर वाळलेल्या फांद्या छाटून टाकणे गरजेचे आहे. छाटणीनंतर ताबडतोब कार्बनडायझिम या बुरषीनाषकाची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🔆 नर्सरीधारकांनी डोळे बांधणी सुरू करावी. डोळा जमीनीच्यावर 20-25 सेंमी वर बांधावा.
🔆 मृग बहाराच्या संत्रा आणि मोसंबी फळांवर ठिंबक सिंचनाद्वारे ओलित सुरू ठेवावे. 6 वर्षाच्या झाडाला 41 लिटर /पाणी /दिवस झाड तर 10 वर्षाच्या वरील त्यावरील झाडाला 82 लिटर पाणी/दिवस/झाड पाणी द्यावे. मृग बहारासाठी ठिंबक सिंचन सुरू ठेवावे.
🔆 कोळी कीडीचा प्रादुर्भाव या महिन्यात दिसतो. त्यामुळे फळांवर तांबुस चट्टे दिसतात. यासाठी 2 मिली डिकोफोल किंवा 3 ग्राम विद्राव्य गंधक किंवा 1 मिली. प्रोपरगाईट प्रति लिटर पाण्यात टाकून/मिसळून फवारणी करावी. 15 दिवसानंतर आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी यापैकी एका औषधाची करावी.
🔆 रोपवाटिकेतील लिफ मायनरच्या नियंत्रणासाठी क्षतीग्रस्त पाने तोडून नष्ट करावी आणि थायमिथॅक्झम 0.3 ग्राम किंवा इमॅडाक्लोप्रीड 0.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 2 मिली/लिटरची फवारणी करावी. दुसरी फवारणी वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 15 दिवसांच्या अंतराने करावी.
🔆 जमिनीमध्ये कायम वाफसा अवस्था निर्माण रहावी एवढा ओलावा असावा, कारण वाफसा अवस्थेमध्ये जमिनीमध्ये पाणी आणि हवा यांचे संतुलन निर्माण झालेले असते. अधिकतम उत्पादन व चांगली गुणवत्ता मिळण्यासाठी वाफसा अवस्था महत्त्वाची आहे.
🔆 साधारणतः पाट पाणी दिले असल्यास दोन पाणी पाळ्यातील अंतर 10 ते 12 दिवस असल्यास त्यामध्ये पिकांची वाढ फक्त 3 ते 4 दिवस उत्तम होते. पहिले 3 ते 4 दिवस पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये जादा पाणी असल्यामुळे ताणाखाली असते, तर शेवटच्या 3 दिवसांमध्ये दिलेले पाणी पिकांच्या मुळाखाली निघून गेल्यामुळे पिकास पाण्याचा ताण पडतो. थोडक्यात पिकाच्या मुळाजवल हवा खेळती राहिल्यास अनद्रव्याचा पुरवठा चांगला होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!