krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer Suicide : शेतकऱ्यांनी गळ्यातील फास काढण्यासाठी कोणत्या राज्यात जावे?

1 min read
Farmer Suicide : जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं राहते की, आपल्याला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. बापाला वाटतं आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळायला हवं. आरोग्याच्या सोयी सुविधा मिळायला हव्यात. कोणत्याही कटकटी शिवाय शांतपणे जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी त्याला हवा असतो खिशामध्ये पैसा!

🌐 शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी
आपल्या राज्यातील सीमावर्ती भागात राहणाऱ्या गावांनी नवीन मागणी केली आहे. आम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी बाजूच्या राज्यात जाऊ द्या. तेलंगणाच्या राज्याला लागून असणारी गावे म्हणतात, आम्हाला तेलंगणात जाऊ द्या. आम्ही तेलंगणात जाण्यासाठी तयार आहोत. गुजरातच्या सीमावर्ती भागातील गावे सुद्धा म्हणायला लागली आहेत, आम्हालाही गुजरातमध्ये जाऊ द्या. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील गावे म्हणायला लागली आहेत, आम्हालाही कर्नाटक राज्यात जाऊ द्या. असं का होत आहे? याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

🌐 अस्मितेपेक्षा पैसा महत्त्वाचा
आज फक्त अस्मितेच्या नावाखाली चाललेलं राजकारण पाहताना व त्याचंवेळी दुसरीकडे सीमावर्ती भागातील लोक मात्र मला अमुक राज्यात जाऊ द्या, म्हणून मागणी करत आहेत. याचा साधा अर्थ असा की, लोकांना जीवन जगण्यासाठी नुसत्या अस्मितेपेक्षाही पैसा महत्त्वाचा असतो. आपलं पोट चालवणं महत्त्वाचं असतं. आपले राजकारणी लोकही गोष्ट समजून घेण्यासाठी कमी पडलेले दिसून येतात.

🌐 शेतकरी विरोधी कायदे व शेतकरी आत्महत्या
या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात रोज बारा-तेरा शेतकऱ्यांची आत्महत्या होते. याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी उच्चांक गाठलेला असताना सुद्धा कोणताही राजकीय व्यक्ती कोणताही राजकीय पक्ष शेतकरी आत्महत्यावर, शेतकरी विरोधी नरभक्षी कायद्यांवर, शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर बोलताना मला तरी अजिबात दिसत नाही. म्हणतानाच प्रत्येक जण म्हणत असतो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. मग मला प्रश्न पडतो, तुम्ही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर कधी बोलणार आहात? शेतकऱ्यांचे दुःख कळतं, मग तुम्हांला शेतकऱ्याचा फाटलेला खिसा का दिसत नाही? मग तुम्हाला शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक दिसत नाही का तुम्हाला? आज शेतकऱ्यांच्या मरणाला कारणीभूत असलेले शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे तुम्हाला दिसत नाहीत का? बाभळीच्या भिंतीवर लटकलेले शेतकऱ्यांचे सांगाडे दिसत नाहीत का?

शेवटी,
मला विझवायचा आहे
माझ्या हिरव्यागार शेतीला लागलेला
विखारी वणवा….

मला करायचा आहे
सैल फास
शेतकरी विरोधी नरभक्षी कायद्यांचा,

मला थांबवायचे आहेत
विषाचा प्याला पिण्यासाठी
थरथरत कापत जाणारे हात
हा विषारी विळखा

मला भरायचे आहे
गावाच्या स्मशान कॅनव्हासवर
उद्याच्या स्वातंत्र्याचे सोनेरी रंग

हो माझच काम आहे ते
तुम्ही आतापावेतो ऐकत आलेल्या
वणवा विझू पाहणाऱ्या चिमणी सारखे
चिमणी इतकेच…

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!