krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Shetkari sanghatana : शेतकरी संघटनांना ‘संघटित’ कसे करावे?

1 min read
Shetkari sanghatana : एकत्रीकरणाचा लाभ काय? मतभेद बाजूला सारून जर सर्व शेतकरी संघटना (Shetkari sanghatana) एकत्र झाल्या तर शेतकऱ्यांचा खरंच फायदा होईल का? यावर माझे उत्तर आहे, हो! आपल्या देशात लोकशाही आहे व लोकशाहीत कोणत्या मागणीच्या मागे किती लोक आहेत, याचा विचार केला जातो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर सत्ताधारी पक्ष बदनाम होतो. खूप मोठ्या संख्येने लोक विरोधात गेले तर मत परिवर्तन होऊन सत्ता जाऊ शकते, अशी भिती सत्ताधारी पक्षाच्या मनात तयार झाली, तर मागणीचा गांभीर्याने विचार केला जातो.

🌐 शेतकरी आंदाेलनाचा रेटा
सन 1980-90 च्या दशकात शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचा रेटा इतका मोठा असायचा की, सरकारला शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे लागले. कांदा, ऊस, कापूस आदी आंदोलनाला मिळालेले यश हे शरद जोशी यांची तर्कसंगत मांडणी व त्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्‍यांची प्रचंड संख्या हे होते. दुधाचे दर पडले तेव्हा शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण, वारणा सहकारी उद्योग समूहाने आंदोलन फोडण्यासाठी मुंबईला दूध पुरवठा सुरू ठेवला. आंदोलन यशस्वी होणार नाही, हे पहाता शरद जोशी यांनी आंदोलन बिनशर्त मागे घेतले. पण, शेतकऱ्‍यांच्या मनात तयार झालेली नाराजी लक्षात येताच तत्कालीन सरकारने दुधाला एक रुपया वाढ जाहीर केली होती. शेतकरी संघटना एक झाल्या तर असे परिणाम आजही पहायला मिळू शकतील.

🌐 राजकीय यशासाठी एकत्र येणे महत्त्वाचे
दुसरा भाग राजकीय यशाचा! रस्त्यावरची आंदोलने करून शेतकऱ्‍यांचा एक एक प्रश्न सोडवता येतो. मग असे किती वर्ष रस्त्यावरचीच आंदोलने करणार? धोरण बदलायचे असेल तर सत्तेत जावे लागेल. संघटना विखुरल्या की संघटनेचे बिल्ल्यावालेच एकमेकांविरुद्ध उमेदवारी करताना आपण पाहिले आहे. यांच्यातच मेळ नाही, असा विचार करून मतदार काय, शेतकरीच मतदान करत नाहीत. संघटनेच्या विचारांना राजकीय यश मिळायचे असेल, तर सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या पाहिजेत. सर्व शेतकरी संघटना एकत्र झाल्या तर ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात.

🌐 एकत्रिकरणासाठी विचारधारा महत्त्वाची
एकत्रिकरणात अडचणी काय आहेत? एकत्र यायचे म्हटले तर कोणती विचारधारा घेऊन काम करायचे, यावर एकमत होणे आवश्यक आहे. खुल्या व्यवस्थेचा पुरस्कार करणारी शरद जोशी यांची एकमेव संघटना पूर्वी होती. नंतर काही मंडळी संघटना सोडून दुसऱ्‍या पक्षात गेले. त्याने फारसा फरक पडला नाही. पण, सन 2004 नंतर संघटना सोडलेल्यांनी वेगळ्या संघटना स्थापन केल्या. काहींनी वेगळ्या नावाने संघटना काढल्या, तर काही शरद जोशी यांचे नाव, बिल्ला, झेंडा सर्व वापरत वेगळे काम करू लागले. नंतर तर शेतकरी संघटनांचे पेवच फुटले. तत्त्व नाही, ध्येय-धोरण नाही, संघटनही नाही, एकट्याचीच संघटना असेही पाहावयास मिळते. एका लेखात डॉ. गिरधर पाटील म्हणतात तसे, आंदोलन झाल्यास तडजोड करण्यासाठी वापरता याव्यात अशाही सरकार पुरस्कृत शेतकरी संघटना तयार झाल्या आहेत. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या शेतकरी संघटना (विंग/सेल) आहेतच. भाजपचा भारतीय किसान संघ, कॉंग्रेसचा किसान सेल, राष्ट्रवादीची किसान भारती, कम्युनिष्टांची किसान सभा आदी. या सर्वाची विचारधारा भिन्न, उद्दिष्ट भिन्न, नेते भिन्न हे कसे एकत्र राहू शकतात. शरद जोशी यांनी स्थापन केलेली मूळ शेतकरी संघटना शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल, किसान सभा सरकारी अनुदानाचा आग्रह धरेल, भारतीय किसान संघ जीएम बियाण्यांना विरोध करेल, किसान भारती सोयीचे राजकारण बघेल, मग कसे एकत्र काम करायचे?

🌐 नेतृत्व कोणी करायचे?
दुसरा महत्वाचा मुद्दा नेतृत्व कोणी करायचे? प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटते की नेतृत्व आपल्याच नेत्याकडे असले पाहिजे. एक वेळ नेते मन मोठे करून एकत्रित संघटनेच्या नेतेपदावर पाणी सोडायला तयार होतील. पण, कार्यकर्ते नाही होणार. तिसरी अडचण आहे ती राजकीय लाभ! संघटनेचा दबाव वाढला, की हा समूह आपल्या गटात असावा, असे प्रमुख राजकीय पक्षांना वाटते. त्यासाठी राजकीय पदांचे आमिष दाखविली जातात. मग यावर कोणाची वर्णी लावायची यावर वादंग, मतभेद होतात. अगदी जवळचे कार्यकर्ते वेगळी चुल मांडायची भाषा करतात. मग फुटाफुटीला सुरुवात होते. राजकीय पक्षांचा हेतू मात्र सफल होतो. पद दिले तर संघटना गळाला लागते, नाही तर संघटनेत फूट पडून कमजोर होते. एखादे मंत्रीपद, खासदारकी, आमदारकी, महामंडळांवर नियुक्त्यांची हत्यारे वापरून संघटना दुबळ्या करण्याचे प्रयत्न सत्ताधारी करतच असतात.

🌐 संघटना अनेक, मागणी एक, आंदोलन एक
संघटना एकत्र कशा येतील? शेतकरी संघटनेतील फुट ही शरद जोशी यांना नेहमीच बोचत राहिली. अंबाजोगाईला एका कार्यक्रमात त्यांनी अक्षरश: हात जोडून ‘काही चुकले असेल तर माफ करा व परत या’ अशी साद घातली होती. इतक्या मोठ्या मनाचा माणूस पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. सन 2015 मध्ये कोपरगावच्या गवारे मामा फाऊंडेशनच्या सभागृहात शरद जोशी यांनी भाषण केले. हे बहुतेक त्यांचे शेवटचे जाहीर भाषण असावे. या भाषणात ते संघटना एकत्र होण्याची अपेक्षा व्यक्त करताना म्हणाले की, हे तीन ठोकळे (तेव्हा तीनच संघटना होत्या) सुतळीने एकत्र बांधले तर ते कधी ना कधी सुटणारच आहेत. त्याऐवजी या तिन्ही ठोकळ्यांचा भुसा करून त्यांचा एक ठोकळा केला तरच तो कायमचा टिकू शकतो. असे करण्यासाठी प्रथम कोणत्या विचारधारेवर काम करायचे हे निश्चित केले पाहिजे. आता इतक्या विभिन्न विचारांच्या शेतकरी संघटना आहेत की त्या एकत्र होणे अशक्यच वाटते. यातून मार्ग काढायचा असेल तर किमान असे करता येईल, संघटना अनेक पण मागणी एक, आंदोलन एक. सर्व संघटनांच्या नेत्यांनी आपला प्रभाव व संघटन असलेल्या भागात काम करावे. शेतकऱ्‍यांना विषय समजून सांगावा व आंदोलनात उतरण्यास प्रवृत्त करावे. असे केले तर आंदोलन प्रभावी होऊन सरकारवर दबाव निर्माण करता येईल.

🌐 शरद जोशी यांच्या विचाराचा गाभा
शेतकऱ्‍यांची लूट थांबवून, त्यांना सुखाने व सन्मानाने जगता यावे, यासाठी शेतीमालाला रास्त भाव मिळायला हवा. तो मिळवण्यासाठी शेतकऱ्‍यांना आर्थिक स्वातंत्र्य, व्यापार स्वातंत्र्य, तंत्रज्ञान स्वातंत्र्य असले पाहिजे, हा शरद जोशी यांच्या विचाराचा गाभा आहे. ज्यांना ज्यांना हे मान्य असेल त्यांनी सोबत यावे. शेतकऱ्‍यांच्या व देशाच्या अर्थिक प्रगतीचा हा एकच राजमार्ग दिसतो. या मार्गावर एकत्र चालू या, एक दिवस शेतकऱ्‍यांचा येईलच. तो आपल्या डोळ्यादेखत यावा, हीच अपेक्षा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!