Soybean rate : साेयाबीनचे दर दबावात का?
1 min read🌍 आंतरराष्ट्रीय बाजरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात घसरण हाेत असल्याने त्याचा परिणाम साेयाबीनच्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारातील दरावर झाला आहे. त्यामुळे या पंधरवड्यात साेयाबीनचे दरही 14.55 डाॅलर प्रति बुशेल्सवरून 14.19 डाॅलर प्रति बुशेल्सवर (1 बुशेल म्हणजे 28 किलो) आले. याच काळात पामतेलाचे दर 4,322 रिंगीट (मलेशियाचे चलन) वरून 3,828 रिंगीट प्रति टनावर आले आहेत. त्याआधी हेच दर 305 रिंगीटने घसरले हाेते. साेबतच आंतरराष्ट्रीय बाजारात साेयातेलाच्या दरात घसरण बघायला मिळाली. सीबाॅटवर साेयातेलाचे दर 77 सेंट प्रति पाउंडवरून 70.32 पर्यंत खाली आले आहेत. त्याआधी हे दर 73 सेंटपर्यंत खाली आले हाेते. याच घसरणीचा परिणाम साेयाबीनच्या दरावर झाला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात साेयाबीनचे दर प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलने घसरले आहेत.
🌍 खरेदीसाेबतच आवक वाढली
ऑक्टाेबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत साेयाबीनमध्ये अधिक ओलावा आणि स्टाॅक लिमिट असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीत हात आखडता घेतला हाेता. केंद्र सरकारने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढल्यानंतर तसेच साेयाबीनमधील ओलावा कमी हाेताच प्रक्रिया प्लांट, स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारांनी सोयाबीनची खरेदी वाढवली आहे. याच काळात दरात थाेडी तेजी निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन विकायला काढले. बाजारातील साेयाबीनची आवक वाढत असतानाच दर पुन्हा दबावात आले. मात्र, बाजारातील आवक स्थिर राहिली.
🌍 साेयाबीन ढेपेची निर्यात
भारतीय साेयाबीन ढेपेला (पेंड) (DOC – De Oiled Cake) चीनमध्ये माेठी मागणी असते. यावर्षी 22 नाेव्हेंबरपर्यंत साेयाबीन ढेपेच्या निर्यातीचे चीनसह इतर देशांसाेबत फारच कमी करार झाले आहेत. त्यामुळे साेयाबीन ढेपेचे दर 42 रुपये प्रति किलाेवरून 38 रुपये प्रति किलाेवर आले आहेत. स्टाॅक लिमिट काढल्यानंतर महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील साॅल्व्हंट प्लांटने (Solvent Extraction Plant) माेठ्या प्रमाणात साेयाबीनची खरेदी करायला सुरुवात केली. या काळात बाजारातील साेयाबीनची आवक थाेडी वाढली हाेती. मात्र, साेयाबीन ढेपेच्या निर्यातीचे (DOC export) समाधानकारक करार न झाल्याने प्लांटने 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल कमी दराने साेयाबीन खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील साेयाबीनचे दर दबावात आले आहेत. साेयाबीन ढेपेच्या निर्यातीचे करार वाढल्यास तसेच ढेपेचे दर किमान 45 रुपये प्रति किलाेपर्यंत वाढल्यास साेयाबीनच्या दरात आजच्या दराच्या तुलनेत किमान प्रति क्विंटल 400 ते 800 रुपयांची वाढ हाेऊ शकते.
🌍 वायद्यांवरील बंदीमुळे दबाव
केंद्र सरकारने देशांतर्गत खाद्यतेलाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी साेयाबीनसह इतर तेलबियांवर स्टाॅक लिमिट लावण्यासाेबत त्यांच्या वायदे बाजारातील साैद्यांवर बंदी घातली. त्यातच केंद्र सरकारने 1 नाेव्हेंबर राेजी स्टाॅक लिमिट तर काढले, मात्र, वायदे बाजारातील साैद्यांवरील बंदी कायम ठेवली. त्यामुळे गुंतवणूकदारांना इच्छा असूनही साेयाबीन खरेदीत गुंतवणूक करता येत नाही. सरकारने या वायद्यांवरील बंदी हटवल्यास साेयाबीनच्या आजच्या दराच्या तुलनेत प्रति क्विंटल 500 ते 900 रुपयांची वाढ हाेईल. वायदे बंदीमुळे शेतकऱ्यांना आज साेयाबीन 6,000 ते 6,500 रुपये प्रति क्विंटलऐवजी 5,200 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल दराने विकावे लागत आहे. वायदे बंदीमुळे देखील साेयाबीनचे दर दबावात आले आहेत.
🌍 सोयाबीन दरपातळी
सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी 5,300 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या साेयाबीनचे दर 4,650 ते 5,600 रुपये, मध्य प्रदेशात 4,300 ते 5,500 रुपये तर कर्नाटकमध्ये 4,200 ते 5,500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. या दरात सुधारणा हाेण्याची आणि साेयाबीनेच कमाल दर 6,000 रुपये प्रति क्विंटलवर जाण्याची शक्यताही शेतीमाल बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
🌍 उत्पादनाचा अंदाज
ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना हे महत्त्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनामध्ये सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज युएसडीएने नुकताच व्यक्त केला आहे. यावर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनात 349 लाख टनांची वाढ हाेणार असल्याचा अंदाज युएसडीएने व्यक्त केला आहे. यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन 3,900 लाख टनांवर पोहाेचेल. जगात साेयाबीनचा एकूण सरासरी वापर 3,802 लाख टन आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शिल्लक साठा कमी असल्याने सोयाबीनचा एकूण पुरवठा 4,852 लाख टन होईल. यातील 3,293 लाख टन साेयाबीन गाळपासाठी वापरले जाईल, असेही युएसडीएने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. भारतात मात्र मुसळधार, अति मुसळधार व परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. तरीही बाजारातील केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे साेयाबीनचे दर दबावात आहेत.