krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Betel leaf : रोजगार निर्मितीसाठी पानमळ्यांचे पुनरुज्जीवन काळाची गरज!

1 min read
Betel leaf : नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहर प्रभू श्रीरामांचे गडमंदिर, अंबाळा तलाव, महाकवी कालिदास स्मारक, वाकाटककाली किल्ला, बाहुली विहिरी यासह अन्य पाैराणिक व प्राचीन वास्तूंमुळे पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी 'कपुरी' पानासाठी (Betel leaf) देखील रामटेक शहर प्रसिद्ध होते. अलीकडच्या काळात राज्य सरकारची अनास्था आणि पानांची घटलेली मागणी यामुळे रामटेकचे पानमळे इतिहासजमा हाेण्याच्या मार्गावर आहेत. रोजगार निर्मितीसाठी या पानमळ्यांचे पुनरुज्जीवन करणे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

🟤 उदरनिर्वाहाचे पारंपरिक साधन
पानमळे हे बारी (बारई) समाजबांधवांचे हक्काचे व परंपरागत उपजीविकेचे साधन हाेय. त्याच समाजाच्या भरीव प्रयत्नांनी एकेकाळी रामटेकच्या खाण्याची पाने आणि पानमळ्यांची ख्याती देशभर पसरली हाेती. उत्तम चव हे त्यामागचे प्रमुख कारण हाेते. रामटेक शहरात सध्या सुमारे 2,000 बारी समाजबांधव वास्तव्यास आहेत. या समाजाची 600 एकर जमीन, जी पूर्वी पानमळ्यांसाठी वापरली जायची, ती आजही कायम आहे. मात्र, ही जमीन आता पानमळे आणि पानांच्या उत्पादनासाठी वापरली जात नाही. बदलत्या काळात पानमळे उपेक्षेचे शिकार झाले आणि ते मागे पडू लागले. पानमळे माेडित निघाल्याने पानमळ्यांवर उपजीविका करणारा बारी समाज आर्थिक संकटात सापडला. त्यांनी पानमळे साेडून वेगवेगळ्या व्यवसायात शिरकाव केला.

🟤 नगदी पीक म्हणून ओळख
रामटेक शहरातील 600 एकर जमिनीवर 20 वर्षांपूर्वी पानमळे असायचे. बांबू, पळसाची मुळे, गवत व लाकडाच्या वापरातून पानमळे बनविले जायचे. त्यावेळी हे साहित्य सहज उपलब्ध व्हायचे. वेलींना आधार देण्यासाठी एकदा मंडप उभारल्यानंतर सहा महिन्यात पानांचे उत्पादन व्हायला सुरुवात होत असे.
रामटेक शहरातील कपुरी पाने विदर्भातील बाजारपेठेत विकली जायची. पानांची शेती नगदी पीक (Cash crop) म्हणून ओळखले लायचे. या पानमळ्याची जमीन तयार करण्यासाठी रासायनिक खताचा वापर केला जात नव्हता. ढेप मिसळून जमीन तयार केली होती. म्हणूनच येथील कपुरी पानाला मागणी अधिक होती. सध्या पानांची शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी राहिली नाही, असे मत पांडुरंग भाेगे यांच्यासह इतर पान उत्पादकांनी व्यक्त केले. पानमळ्यांवर अवकळा आल्याने सध्या बारी समाजातील शेकडाे तरुणांना बेराेगारीला सामाेरे जावे लागत आहे.

🟤 20 वर्षांपर्यंत उत्पादन आणि आजच्या अडचणी
एकदा पानांचा मळा उभारला की 20 वर्षे पानांचे उत्पादन घेता येते. चांगले उत्पादन घेण्यासाठी फक्त नियमित माती बदलणे आवश्यक असते. वेलीच्या एका देठापासून 30 ते 40 पाने निघतात. त्यामुळे एका पानमळ्यात राेज शेकडो पाने मिळतात. त्यामुळे आर्थिक उत्पन्नही फायदा चांगला होत. मंडप तयार करण्यासाठी दोन लाख रुपये लागतात. आज बांबू मिळत नाही. मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांची माेठ्या प्रमाणात गळती होते. पानमळे खर्चिक झाले आहे. सरकारने पानांच्या उत्पादनासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे तसेच या शेतीला अनुदान म्हणून मदत केल्यास शेकडो तरुणांना रोजगार मिळेल. यातून बारी समाजाला गतवैभव प्राप्त होईल, अशी प्रतिक्रिया मथुरा सागर पान तथा कृषी संयुक्त सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष पिंटू भोयर यांनी व्यक्त केली.

🟤 पान संशोधन केंद्र उपेक्षित
रामटेक शहरात राज्य सरकारने पानशेती संशाेधन केंद्राची (Betel leaf reserch center) स्थापना केली. हे संशाेध केंद्र डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेला यांच्या अखत्यारित आहे. परंतु, पानमळ्यांप्रमाणे हे संशाेधन केंद्रही उपेक्षेचे शिकार ठरले. या संशाेधन केंद्राला सरकारकडून मागणी करूनही फारसी आर्थिक मदत आणि सहकार्य केले जात नाही. त्यामुळे हे संशाेधन केंद्र ओस पडले असून, त्याला कुणी महत्त्व द्यायला तयार नाही. सद्यस्थितीत येथे जुन्या पद्धतीने एक आणि पॉलिहाऊसमध्ये दोन असे तीन पानमळे तयार केले आहेत. या केंद्रात पानांवरील संशाेधन आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याचे कार्य सध्या सुरू आहे. मध्यंतरी काही काळ ते बंद हाेते. सरकारदरबारी पानमळे आणि या संशाेधन केंद्राचे महत्त्व कळत नसल्याने ते नेमके कशासाठी सुरू ठेवले आहे, असा प्रश्नही बारी समाजातील वयाेवृद्ध व अनुभवी नागरिकांनी उपस्थित केला. या पानशेती संशाेधन केंद्राची मदार केवळ दाेन कर्मचाऱ्यांवर आहे. या केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. आर. एम. खोब्रागडे यांची मूळ नियुक्ती भंडारा येथे असून, ते या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. काहींनी पानमळ्याच्या जागेवर अतिक्रमण देखील केले आहे. याकडे शासन, प्रशासन आणि लाेकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही.

🟤 राेजगाराचे हक्काचे साधन
रामटेक शहरातील पान संशाेधन केंद्राला सरकारने उभारी दिल्यास तसेच या केंद्राचा वापर तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी केल्यास अनेक तरुण पानांची शेती करायला समोर येतील. शिवाय, सरकारने मदत केल्यास अनेकांना राेजगाराचे हक्काचे साधन मिळेल, अशा प्रतिक्रिया बारी समाजबांधवांनी व्यक्त केल्या. येथील पानमळे जिवंत करायचे असतील तर शेतकऱ्यांना पाणी, उच्च प्रतीचे बेणे, सरकारकडून आर्थिक मदत देणे, मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. वास्तवात, सरकारकडून यापैकी काहीही केले जात नाही.

🟤 कुलगुरूंची आकस्मिक भेट व पुनरुज्जीवनाची आशा
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख यांनी बुधवारी (दि. 9) रामटेक शहरातील पान संशाेधन केंद्राला आकस्मिक भेट दिली आणि येथील परिस्थिती व कार्याचा आढावा घेत केंद्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, या भेटीच्यावेळी डाॅ. शरद गडाख यांच्यासाेबत कृषी विद्यापीठ अथवा कृषी विभागाचे अधिकारी नव्हते. पानशेती कशी वाढविता येईल, याबाबत विचार करून पानशेतीला प्राेत्साहन देण्यासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पुढाकार घेईल. शेतकऱ्यांना पानशेतीचे प्रशिक्षण देऊन चांगल्या जातीचे बेणे उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र प्रयत्न करील. कृषी विभागाच्यावतीने पानशेती संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख यांनी व्यक्त केली. त्यामुळे पान संशाेधन केंद्र व पानमळ्यांच्या पुनरुज्जीवनाची आशा थाेडी पल्लवित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!