krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Export of Grapes GrapeNet : द्राक्षांच्या निर्यातीसाठी बागा नोंदणी ‘ग्रेपनेट’ कार्यान्वित

1 min read
Export of Grapes GrapeNet : दरवर्षीप्रमाणे सन 2022-23 या वर्षात युरोपियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यातीसाठी (Export of Grapes) निर्यातक्षम द्राक्ष बागांची (Exportable vineyards) नव्याने नोंदणी (Registration) करणे व जुन्या बागांची नोंदणी नूतनीकरण (Registration Renewal) करण्यासाठी 'ग्रेपनेट' (GrapeNet) ही कार्यप्रणाली 5 ऑक्टोबर 2022 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2021-22 मध्ये सर्वाधिक 2,63,075 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली हाेती. यातील 1,05,827 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात युरोपियन ही देशांमध्ये केली हाेती.

🟢 सन 2021 22 हंगामातील द्राक्ष निर्यातीचा तपशील
✳️ द्राक्ष निर्यात ( मे. टन) मूल्य (कोटी रुपये)
✳️ युरोपियन युनियन – 1,05,827 1,194
✳️ इतर देश – 1 57,248 1,104
✳️ एकूण – 2,63,075 2,302

🟢 निर्यातक्षम बागा नाेंदणी व फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण
युरोपियन देशांनी किडनाशक नियंत्रणाबाबतचे निकष (Criteria for pesticide control) अत्यंत कडक केले आहेत. त्या बाबीची पूर्तता करण्याकरिता तसेच युरोपियन देशांच्या अटी व शर्तीच्या पूर्ततेची हमी देण्यासाठी सन 2003-04 पासून महाराष्ट्रात ‘अपेडा’ (APEDA – The Agricultural and Processed Food Products Export Development Authority)च्या मार्गदर्शनाखाली युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता किडनाशक (Pesticides) उर्वरित अंश नियंत्रण कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत केली जात आहे. या कार्यप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ‘ग्रेपनेट’ ही ऑनलाईन कार्यप्रणाली अपेडाद्वारे विकसित केली असून, या कार्यप्रणालीमध्ये सर्व भागीदारी संस्थांना सहभागी करून त्याद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी ते ‘फायटोसॅनिटरी’ (Phytosanitary) प्रमाणीकरणाची (Validation) ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना कीडनाशक उर्वरित अंश तसेच युरोप कीड व रोग मुक्त फळांची (Pest and disease free fruits) हमी (guarantee) देण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष बागांची ‘ग्रेपनेट’ अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणीकृत द्राक्ष बागेतील द्राक्ष निर्यात करणे निर्यातदारांना ही बंधनकारक करण्यात आले.

🟢 निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणीची सद्यस्थिती
‘ग्रेपनेट’ अंतर्गत देशभरात सन 2021-22 मध्ये 44,180 बागांची नोंदणी करण्यात आली हाेती. यातील महाराष्ट्रातील 44,123 आणि कर्नाटकमधील 57 द्राक्ष बागांचा समावेश हाेता.
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय ग्रेपनेट निर्यातक्षम बागा
✳️ नाशिक – 34,295
✳️ सांगली – 4,862
✳️ पुणे – 1,238
✳️ सोलापूर – 641
✳️ अहमदनगर – 871
✳️ सातारा – 432
✳️ उस्मानाबाद – 550
✳️ लातूर – 128
✳️ बुलडाणा – 42
✳️ जालना – 18

सन 2022-23 मध्ये अपेडा, नवी दिल्ली यांनी (ट्रेड नोटीस क्रमांक/ Advisory/ 2022 -23, दि. 15 th March, 2022 अन्वये) युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीसाठी निर्यातक्षम द्राक्ष बागांचे ग्रेपनेटद्वारे नोंदणीसाठी 1 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या काळात ग्रेपनेट कार्यप्रणालीकरिता सूचना निर्गमित केल्या आहेत.

🟢 ग्रेपनेटद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी कार्यक्रम
✳️ निर्यातक्षम द्राक्ष बागांची नवीन नोंदणी, जुन्या बागांचे नूतनीकरण करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या काळात ग्रेपनेटद्वारे सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
✳️ निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी प्रपत्र -2 मध्ये अर्ज व अर्जासोबत सातबाराची प्रत तसेच रुपये 50 फी भरून अर्ज संबंधित कृषी सहायकांकडे सादर करणे.
✳️ निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप कार्यान्वीत करण्यात आले आहे. या ॲपद्वारे द्राक्ष बागायतदारांना ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोबाईल फाेनमधील गुगल प्ले स्टोअरमधून ॲप डाऊनलोड करून अर्ज करता येताे.
✳️ निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीसाठी करावयाच्या अर्जामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, सातबारा क्रमांक, द्राक्षाची जात, क्षेत्र, छाटणीची तारीख, काढण्याची तारीख, अंदाजे अपेक्षित उत्पन्न, बागेस ग्लोबल गॅप प्रमाणपत्र असल्यास त्याचा तपशील इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.
✳️ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागामार्फत संबंधित निर्यातक्षम द्राक्ष बागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रपत्र-4 मध्ये शिफारस करून निर्यातक्षम द्राक्ष बागांची द्राक्ष बागास ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र प्रोसेस करून संबंधित द्राक्ष बागायतदारांना देण्यात येते.
✳️ निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी केल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईनद्वारे बागेचे नोंदणी/नूतनीकरण केल्याबाबतचा संदेश पाठविला जातो.
✳️ निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी सहायकांकडे संपर्क साधून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे.
✳️ नोंदणी केलेल्या नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांची सविस्तर तपशील दररोज अपेडाच्या वेबसाईटवर एमआयएस (MIS)मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे. डिरेक्टरीमध्ये नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची शेतकरी निहाय व गावनिहाय तसेच नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक व मोबाईल नंबर इत्यादी तपशील दिलेला आहे. त्यामध्येही संबंधित शेतकऱ्यांची आपली माहिती सुविधा उपलब्ध आहे.

🟢 निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांनी खालील रेकॉर्ड ठेवणे व कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत घ्यावयाची दक्षता
✳️ राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागेवरील कीड रोगाचे नियंत्रण करण्याकरिता प्रपत्र-5 मध्ये निर्धारित केलेल्या लेबल क्‍लेम औषधाची फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचा रेकॉर्ड प्रपत्र- 2 मध्ये ठेवणे आवश्यक आहे.
✳️ सन 2021-22 या वर्षाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरीदाबाद यांनी द्राक्ष पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रणासाठी 68 औषधांची लेबल क्‍लेम मंजूर केलेले आहे. त्याची माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांनी दिनांक 8 सप्टेंबर 2021-22 अन्वये प्रपत्र -5 मध्ये अंतिम केली असून, त्याची माहिती अपेडाच्या वेबसाईटवर ग्रेपनेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये ‘एमआरएल’च्या मर्यादा व ‘प्री हार्वेस्ट इंटर्वल’ कालावधी दिला आहे.
✳️ निर्यातक्षम द्राक्ष बागेतील किडनाशक उर्वरित तपासणीसाठी आपल्याद्वारे 17 कीडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळांना परवानगी दिली आहे. या प्रयोगशाळांच्या प्रतिनिधीद्वारे आपल्या बागेचा 4 बी मध्ये तपासणी केल्यानंतरच द्राक्षाचा नमुना तपासून त्याचा अहवाल ऑनलाईन केला जातो व त्याची एक प्रत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.
✳️ कीडनाशक तपासणीचा अहवाल संबंधित शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अपेडाच्या साइटवर डाउनलोड अनालिसिस रिपोर्ट ( Download Analysis Report)वर क्लिक करून आपल्या बागेचा नोंदणी क्रमांक व 4b क्रमांक भरल्यानंतर संबंधित द्राक्ष बागायतदारांना आपल्या बागेचा द्राक्ष तपासणीचा अहवाल डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
✳️ निर्यातक्षम द्राक्षाच्या नमुन्याची तपासणी करण्याकरिता 268 औषधांची ‘एमआरएल’ सहित प्रपत्र- 9 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सन 2022-23 मध्ये ग्रेपनेटद्वारे 60,000 निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचा लक्षांक जिल्हानिहाय वितरीत करण्यात आले असून, त्यानुसार सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. चालू वर्षी द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागांची वेळेत नोंदणी करून ‘लेबल क्लेम’प्रमाणे औषधांचा वापर करून निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचे व कीडनाशक उर्वरित अंश मुक्त द्राक्ष पुरवठा करून त्याद्वारे आपल्या मालास अधिक मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
(अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच आयुक्तालय स्तरावरील कृषी निर्यात कक्षाशी संपर्क साधवा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!