krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Spice export : मसाला निर्यात 6.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

1 min read
Spice export मसाला निर्यातीत भारताने मागील दोन वर्षांत 4 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. आगामी मसाल्यांची (Spice) मागणी आणि निर्यात वर्षाकाठी 6.5 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मसाला निर्यातीत (Export) मोठ्या संधी उपलब्ध हाेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शेतीमाल निर्यातीत मसाले निर्यातीचा वाटा 10 टक्के आणि फलोत्पादन क्षेत्राच्या निर्यातीत सुमारे 40 टक्के आहे. भारत एकूण मसाले उत्पादनाच्या केवळ 15 टक्के मसाले निर्यात करतो आणि उर्वरित उत्पादन देशांतर्गत बाजारात विकले जातात.

🔆 निर्यातीच्या संधी
जाणकारांच्या मते, जागतिक मसाला बाजारात भारताला आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांच्या सहभागाने पुरवठा साखळी निर्माण करून ती मजबूत करणे आवश्यक आहे. ते भौगोलिक उत्पादनांची नोंदणी वाढविण्याच्या गरजेवरही भर देतात. ब्रँडेड मसाल्यांचा (Branded spice) बाजार 10 ते 15 टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढत आहे, तर असंघटित क्षेत्रात हा दर 7 ते 10 टक्के एवढा आहे. त्यामुळे मसाला निर्यातीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत, असेही अभ्यासकांनी सांगितले.

🔆 हळदीचे दर दबावात
तामिळनाडूमधील इरोड बाजारपेठेत सप्टेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात फिंगर जातीच्या हळदीच्या (Finger Turmeric) या दरात 89 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 9.64 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. 23 सप्टेंबरला हळदीला 6,791 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. 30 सप्टेंबरला हाच दर 6,702 रुपये प्रति क्विंटल नोंदविण्यात आला. हळदीची देशांतर्गत मागणी आणि निर्यातीत Export अनपेक्षित मंदीमुळे गेल्या काही आठवड्यांपासून घट हाेत असल्याने हळदीच्या किमती प्रति क्विंटल 500 रुपयांनी घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. साधारणपणे नवरात्रीच्या आधी हळदीची मागणी वाढत असते. यावर्षी ही मागणी आणि निर्यातीत घट झाल्याचे बाजारपेठेतील जाणकार सांगतात.

🔆 उत्पादन वाढण्याचा अंदाज
मसाला बोर्डाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै 2022-23 या कालावधीत हळदीची निर्यात 18 टक्क्यांनी वाढून ती 62,246 टनांवर पोहोचली आहे. सन 2021-22 मध्ये याच कालावधीत हळदीची निर्यात 52,875 टन एवढी होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जुलै 2022 मध्ये जाहीर केलेल्या फलोत्पादन पिकांच्या दुसऱ्या आगाऊ पीक उत्पादन Production अंदाजानुसार, 2022-23 मध्ये हळदीचे उत्पादन 13.31 लाख टन हाेणा असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. सन 2021-22 मध्ये हळदीचे एकूण उत्पादन 11.24 लाख टन एवढे हाेते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात हळदीचे उत्पादन 18.41 टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Agriculture Ministry) व्यक्त केला आहे. हळदीची देशांतर्गत बाजारात घटलेली मागणी व निर्यात यामुळे हळदीचे दर सध्या दबावात येत आहेत. येत्या काही दिवसांत हळदीचा भाव 6,300 ते 6,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकतो, असेही अभ्यासकांनी सांगितले असून, शेतकऱ्यांनी बाजारपेठेवर लक्ष ठेवून हळद विकण्याची घाई करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!