Import of Palm oil : पामतेलाची आयात उच्चांकी पातळीवर
1 min read🛑 सोयातेलाच्या तुलनेत पामतेलाचे दर कमी
सप्टेंबर 2022 मध्ये पामतेलाच्या किमती सोयातेलाच्या तुलनेत सुमारे 300 डॉलरने स्वस्त होत्या. इंडोनेशियाकडून आपला साठा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल माफक दरात उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2022 मध्येही देशात मोठ्या प्रमाणात पामतेल आयात केले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये भारताची पामतेल आयात सुमारे 10 लाख टन राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक बाजारपेठेत स्वस्त दरात तेलाची उपलब्धता आणि सणासुदीच्या दिवसांतील मागणीमुळे आयात वाढण्याची शक्यता बळावली आहे.
🛑 सप्टेंबरमधील सोया, सूर्यफूल तेलाची आयात
ऑगस्ट 2022 च्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये सोयातेलाची आयात 10 टक्क्यांनी वाढून ती 2,70,000 टनांवर पोहोचली, तर सूर्यफूल तेलाची आयात 22 टक्क्यांनी वाढून ती 1,65,000 टन झाली. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पामतेल खरेदी करतो, तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून भारतात सोया तेल आणि सूर्यफूल तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते.
🛑 खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क सवलतीला मुदतवाढ
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने खाद्यतेलांच्या आयातीवरील विद्यमान सीमाशुल्क (Import duty) सवलतीला सहा महिन्यांची म्हणजेच 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवून खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने स्पष्ट केले. जागतिक स्तरावरील दरातील घसरणीमुळे तसेच आयात शुल्क सवलतीमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किंमती कमी होत चालल्या आहेत, असेही केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने स्पष्ट केले आहे. वास्तवात खाद्यतेलाच्या किरकोळ किमती फार काही कमी झाल्याचे दिसून येत नाही.
🛑 करांचे विवरण
कच्चे पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयातशुल्क सध्या शून्य आहे. तथापि, 5 टक्के कृषी उपकर आणि 10 टक्के समाजकल्याण उपकर मिळून तिन्ही खाद्यतेलांच्या कच्च्या प्रकारांवरील प्रभावी शुल्क 5.5 टक्क्यांवर पोहोचते. रिफाइंड पामोलिन आणि रिफाइंड पामतेलावर मूळ सीमाशुल्क 12.5 टक्के होता, तर सामाजिक कल्याण उपकर 10 टक्के, प्रभावी शुल्क 13.75 टक्के आहे. रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलासाठी, मूळ सीमाशुल्क 17.5 टक्के आहे आणि 10 टक्के सामाजिक कल्याण उपकर गृहीत धरल्यास प्रभावी शुल्क 19.25 टक्के होता.
🛑 भारत दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सन 2021-22 च्या साखर हंगामात (1 ऑक्टोबर – 30 सप्टेंबर) देशात 5,000 लाख टनांहून अधिक उसाचे उत्पादन झाले होते. या उसापासून सुमारे 394 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले. यातील 35 लाख टन साखर इथेनॉल (Ethanol) तयार करण्यासाठी वापरली गेली. याच काळात देशातून 109.8 लाख टन साखरेची निर्यात ₹Sugar export) करण्यात आली. जी आजपर्यंतची विक्रमी पातळी आहे. विक्रमी निर्यातीमुळे देशाला सुमारे 40,000 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. त्यामुळे ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक व निर्यातदार (Sugar producer and exporter) देश बनला आहे.