Textile industry in crisis : वस्राेद्याेग संकटात; कामगारांना नाेकऱ्या गमावण्याची भीती!
1 min read🌍 कामाचे दिवस व शिफ्ट कमी
भारतातील सूत व वस्राेद्याेग (Textile industry) किमान 2.20 काेटी लाेकांना राेजगार देताे. यात जिनिंग-प्रेसिंग तसेच कापूस उत्पादन व कापड विक्री, वाहतूक प्रक्रियेत काम करणाऱ्यांचा समावेश नाही. कापसाचे घटत असलेले उत्पादन, चढलेले दर, वाढता इनपुट खर्च आणि कमकुवत मागणीमुळे वस्राेद्याेग संकटात आला आहे. त्यातच देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय कापडांला भरीव मागणी नाही. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूमधील कापड उद्याेगांमध्ये कामाच्या दिवसांची संख्या व शिफ्ट कमी करण्यात आल्या आहेत. कामगारांना आठवडाभर काम मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नाेकरी गमावण्याची भीती निर्माण हाेणे स्वाभाविक आहे. याबाबत वस्राेद्याेग आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाला कळविले असले तरी केंद्र सरकारकडून त्यावर काहीही उपाययाेजना करण्यात आल्या नाही.
🌍 कापडाच्या मागणीत घट
सुमारे 6 लाख अर्ध-कुशल कापड कामगारांचे निवासस्थान असलेल्या तिरुपूरमधील कापड केंद्राला सर्वाधिक फटका बसला आहे. तिरुपूर येथील वस्राेद्याेगाचे अर्थकारण अमेरिका आणि युरोपियन बाजारपेठेतील कापडाच्या मागणीवर अवलंबून आहे. सध्या तिरुपूरमधील कापड उत्पादन युनिटवर अवलंबून असलेल्या संपूर्ण कामगारांना कामावर ठेवण्यासाठी पुरेसे ऑर्डर नाहीत. त्यामुळे युनिट आठवड्यातून 6 किंवा 7 दिवस चालण्याऐवजी 4 ते 5 दिवस चालविले जात आहेत. त्यातच प्रत्येकाला काम मिळावे म्हणून शिफ्ट देखील कमी करण्यात आल्या आहेत. हीच परिस्थिती देशभरातील बहुतांश छाेट्या-माेठ्या सूत व कापड उद्याेगांची आहे.
🌍 रशिया-युक्रेन युद्ध
काहींनी या मंदी (Recession) व संकटाचा संबंध रशिया-युक्रेन युद्धाशी (Russia-Ukraine War) जाेडला आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील कापडाची मागणी 50 टक्क्यांनी कमी झाल्याने ही परिस्थती उद्भवल्याचे ते सांगतात. तिरुपूर आणि गुजरातमधील माेठ्या उद्याेगांसाेबतच MSME युनिट्सलाही खूप कमी ऑर्डर मिळत आहे. एकट्या तिरुपूरमध्ये दिवाळीच्या काळात सुमारे 16,000 कोटी रुपयांची उलाढाल (Turnover) व्हायची. यावर्षी या उलाढालीने 10 ऑक्टाेबरपर्यंत 8,000 कोटी रुपयांचाही टप्पा गाठला नव्हता. विशेष म्हणजे, काेराेना काळानंतर या उद्याेगाला चालना मिळण्यासाठी सणासुदीच्या हंगामाची प्रतिक्षा हाेती. मात्र, दिवाळीच्या काळातही हा उद्याेग मंदीच्या जाळ्यात अडकला आहे. ही समस्या छाेट्या, मध्यम व माेठ्या वस्राेद्याेगाला भेडसावत असल्याने या उद्याेगावर अवलंबून असलेल्या सूत गिरण्याही (Spinning mill) आर्थिक संकटात (Financial crisis) आल्या आहेत.
🌍 पुरेशा ऑर्डर नसल्याने उद्याेजक चिंतित
सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात कापूस व सूत निर्यात करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (import duty) 31 ऑक्टाेबरपर्यंत रद्द केल्याने तसेच चीन (China) व व्हिएतनाममधून (Vietnam) माेठ्या प्रमाणात कमी दरात सूत आयातीला (Yarn import) परवानगी दिल्याने भारतीय सूत गिरण्यांकडील सुताच्या मागणीत घट झाली आहे. युरोप व अमेरिकेत भारतातून निर्यात हाेणाऱ्या कापडांमध्ये सुमारे 55 टक्के वाटा गुजरातमधील वस्राेद्याेगाचा आहे. ऑक्टाेबर ते मार्च हा काळ कापड उत्पादन आणि निर्यातीसाठी उत्तम असताे. कारण याच काळात कापडाची मागणी अधिक असते. परंतु, सुरुवातीच्या काळात वद्याेद्याेगांना पुरेशा ऑर्डर नसल्याने उद्याेजक चिंतित आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये कापड निर्यातीचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबरनंतर ते वाढण्याची शक्यता असल्याचेही काही अभ्यासक व बाजार तज्ज्ञांचे मत आहे. दिवाळीच्या काळात देशांतर्गत बाजारात कापडांची मागणी चांगली असल्याचेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
🌍 नाेकरदारांच्या क्रयशक्तीवर मदार
भारतीय कापडांची निर्यात केली जात असली तरी ही निर्यात जागतिक पातळीवरील लक्झरी विभागात माेडत नाही. युराेपियन देशांंसाेबतच दिवाळीचा काळ साेडल्यास देशांतर्गत बाजारातील कापडाची मागणी ही मंदावलेली असेल. सध्या जगभर मंदीचा काळ सुरू असून, या काळात कापड विक्रीही मंदावली असते. मात्र, काेराेना काळासारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र, सामान्य नागरिकांची क्रयशक्ती घटत असल्याने देशांतर्गत कापडाची मागणी ही देशातील नाेकरदार व मध्यमवर्गीयांच्या कापड खरेदीवर अवलंबून असणार आहे. देशातील वस्राेद्याेग या संकटातून वेळीच सावरला नाही तसेच त्यासाठी केंद्र सरकारने याेग्य उपाययाेजना केल्या नाही तर या उद्याेगांमध्ये काम करणाऱ्यांना त्यांचे राेजगार गमावण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.