krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer slave : शेतकऱ्यांना गुलाम समजू नका…!

1 min read
Farmer slave : सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, असे विचारण्याची वेळ आली आहे. 75 वर्षांपासून सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने शेतकर्‍यांना गृहीत धरून निर्णय लादले आहेत. शेतकरी एक व्यावसायिक आहे. त्याच्या मर्जीप्रमाणे त्याला तो व्यवसाय करता आला पाहिजे, हे जणू काही सरकार मानायलच तयार नाही. बेवुर्वतखोरपणे शेतीवर निर्बंध लादणारे कायदे (Laws imposing restriction agriculture) केले. त्यासाठी घटनादुरुस्त्या (Constitutional amendment) केल्या. शेतीमालाचे भाव पाडण्याचे उद्योग चालूच आहेत. हा सिलसिला थांबवण्याचे संकेत काही दिसत नाहीत.

🛑 नैसर्गिक/सेंद्रीय शेतीचे खूळ
आजवरची सरकारे गेल्या 75 वर्षांपासून सातत्याने शेतकर्‍यांना सांगण्यात आले की, शेतीमधील उत्पादन वाढवा. रासायनिक खते वापरा, औषधे फवारा, बँकेचे कर्ज घ्या, पाण्याची शेती करा, शेततळे तयार करा, ट्रॅक्टर विकत घ्या, मेहनत करा, पाईप लाईन टाका, लाईट घ्या, एक एक इंच शेती लागवडीखाली आणा आणि उत्पादन वाढवा. किती राबवलं शेतकऱ्यांना गेल्या 75 वर्षात गुलामासारखा? आणि आता सांगताय आजपर्यंत तुम्ही जी शेती करत होता, जी खते आणि औषधी वापरीत होता, ती जमिनीसाठी घातक आहेत. अचानकपणे सांगताय नैसर्गिक शेती (Natural farming) करा, सेंद्रीय शेती (Ornagic farming) करा. या सरकारच्या डोक्यातून हे खूळ निघाले. रासायनिक शेती (Chemical farming) चांगली की नैसर्गिक हा चर्चेचा विषय होऊ शकतो. 85 टक्के शेतकरी Farmer लहान तुकड्यांचे मालक असलेल्या शेतकर्‍यांना अचानक बादल करायला सांगणे किती घातक ठरू शकते, ते श्रीलंकेतील अराजकाच्या (Anarchy) परिस्थितीने दाखवून दिले आहे. वास्तवाचा किमान अभ्यास तरी करा. त्यांना गुलाम Slave समजू नका.

🛑 काय परिस्थिती आहे शेतीची?
✳️ पाथ्रीचा शेतकरी सांगत होता, साहेब मी चार एकराचा अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्या पोरीला शिकायचे होते. तिच्या शिक्षणाचा खर्च मला भागवता येणार नव्हता. पोरीला म्हणालो, बाळा तुझ्या शिक्षणाचा खर्च मला झेपणार नाही. तू शिकायचा नाद सोड. लगेच ती म्हणाली, बाबा मग यापुढे मी तुम्हाला कधीच दिसणार नाही. माझे आणि माझ्या मुलीचे हे असे बोलणे तीन वेळा झाले. पोरीचे हे बोलणे माझ्या जिव्हारी लागले. मी पार हादरून गेलो. मी ठरवले की काय होईल ते होईल. मला शक्य होईल तोपर्यंत तिच्या शिक्षणाचा खर्च करत राहीन. ज्या दिवशी शक्य होणार नाही, त्या दिवशी मी जीवाचं बरं वाईट करून घेईन. सध्या ती पुण्यात इंजिनियरिंग करते आहे. सांगताना त्याचा जडावलेला आवाज स्पष्ट जाणवत होता. ‘यापुढे मी तुम्हाला दिसणार नाही’ हे पोरीचे बोल ऐकताना माझेही काळीज चिरत गेले. त्याचं बोलणं बराच वेळ शांतपणे ऐकून घेतलं, अंतःकरण मोकळ करू दिलं. शेवटी म्हणालो हे बघा, जमीन, जायदाद, पैसा या गोष्टी आपण कोणासाठी मागे राखून ठेवतो? आपल्या मुलाबाळांसाठीच ना? थोडा विचार करा, तुमची जमीन आणि जे असेल ते भांडवल मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी वापरा. ते जिवंत राहिले तर तुमच्या जमिनीचा फायदा, तेच नसतील तर जमीन काय उपयोगाची? शेती राहील जाईल याची चिंता करू नका. मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभे करा. तीच तुमची संपत्ती आहे, हे लक्षात घ्या. आणि हो जिवंत राहिलात तरच त्यांच भविष्य घडवता येईल. उगाच आतताईपणा करू नका. शांतपणे मार्ग काढा. आणखी एक बाब लक्षात घ्या, त्यांनी तुमच्या पोटी जन्म घेण्यासाठी विनंती केलेली नव्हती. तुम्ही त्यांना जन्माला घातलंय, त्यांची जबाबदारी पार पाडा. मग मात्र भानावर आला. म्हणाला, साहेब माझ्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा अशी हिंमत आणि समज मला कधी दिली नाही, ती तुम्ही दिली. मी पुण्यात आल्यावर तुमची भेट नक्की घेईन.
✳️ कोल्हापूरचा तीन एकर जमिनीचा शेतमालक, शेती आणि मार्केटिंग करतो. त्याने सांगितले, साहेब माझा मुलगा 11 वीला आहे. लाख संकटे आली तर बेहतर, पण मी त्याला शेतीकडे फिरकू देणार नाही.
✳️ नाशिकचा शेतकरी, तीन एकराचा मालक. बराच वेळ अंतःकरण मोकळं करताना म्हणाला, मी भाजीपाला केला, द्राक्षे लावली, जिल्हा बँकेचं कर्ज घेऊन झालं, खासगी बँकाकडून कर्ज घेतलं, मायक्रो फायनान्स पालथे घातले आणि आता खासगी सावकारी काढली. कर्ज तरी किती काढू? खताचे, बियाण्याचे, औषधाचे भाव दुप्पट तिप्पट झाले. शेतीचा खर्च तिपटीने वाढलाय. उत्पादन कितीही वाढवलं तर बाजारात मार खावा लागतोय. कोरोनाच्या काळातबी आम्ही घरात बसलो नाय. कोरोनानंतर तर आपत्ती हात धुवून पाठी लागलीया. बायको म्हणती सोनं नाणं गेलं, पोरं म्हणत्यात शाळेच्या फिया द्या, शेताचे खर्च भगवावे का घराचे? काही सुदरंना गेलंय. जगणं मुश्किल झालंय. बराच वेळ बोलत राहिला. शब्दापलीकडे मी तरी काय देणार. माझ्या सांत्वनाने त्यांच्या परिस्थितीत फरक थोडाच पडणारयं?

🛑 कर्जाच्या भाराखाली पिचलेला शेतकरी
डोक्यावरच्या कर्जाचा डोंगर, थकलेल्या जन्मादात्याचे ओझे आणि मुलाबाळांच्या भविष्याच्या जबाबदार्‍यांनी त्रस्त, जगण्याची उमेद हरवलेल्या, हताश, 85 टक्के अल्पभूधारक खातेदार. म्हणजे 11 कोटी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा थोड्या बहुत फरकाने अशाच आहेत. त्या सांगतात की, त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. एखाद्या छोट्या धक्क्याने यापैकी किती शेतकरी मरणाला कवटाळतील सांगवत नाही. अशी भयावह परिस्थिती असताना सरकार आणि त्याचे अर्थनीतीकर शेतकर्‍यांना गुलाम समजून आणि गृहीत धरून तुकलघी निर्णय लादत आहेत. नैसर्गिक शेतीमधील उत्पादन एकाएकी वाढत नाही, हे सर्वजण मान्य करतात. ते सावकाशीने आणि सवडीने राबवण्याचे शेतीविज्ञान आहे. आज देशातील 85 टक्के शेतकर्‍यांची हे विज्ञान पेलण्याची क्षमता नाही. नैसर्गिक शेती करणार्‍या विद्वानाच्या शेजारचा शेतकरीही त्याकडे मोठ्या प्रमाणात वळला नाही, हे त्याचे प्रमाण आहे. म्हणूनच सांगावेसे वाटते, शेतकर्‍यांना गृहीत धरून निर्णय घेवू नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!