krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton rate fall दरात घसरण; कापूस विकण्याची घाई करू नका!

1 min read
Cotton rate fall : मागील (सन 2021-22) हंगामात कापसाचे 14,000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेले कापसाचे (Cotton) कमाल दर (Maximum Rate) सध्या (सन 2022-23) 6,800 ते 8,800 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. मागील आठवड्यात हेच दर याहीपेक्षा कमी हाेते. कापसाच्या दरातील ही घसरण (Fall) जागतिक बाजारात साेबतच भारतीय बाजारातही बघायला मिळत आहे. मागील हंगामात कापसाला चांगला दर मिळाल्याने चालू हंगामात किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत असले तरी दरातील घसरण आणि दिवाळीचा काळ विचारात घेता शेतकरी कापसाचा 'पॅनिक सेल' (Panic sell) करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी संयम बाळगत कापूस विकण्याची सध्यातरी घाई करू नये. अत्यंत निकड असल्यास गरजेपुरता कापूस विकून सध्याची आर्थिक गरज पूर्ण करावी.

🌎 सध्याचे कापसाचे दर
सध्या उत्तर भारतात कापसाचे दर 7,500 ते 8,800 रुपये प्रति क्विंटल असून, मध्य भारतात कापसाची खरेदी प्रति क्विंटल 6,800 ते 7,600 रुपये दाराने तर दक्षिण भारतात 7,450 ते 10,200 रुपये प्रति क्विंटल दराने सुरू आहे. 9,000 ते 10,200 रुपये विकला जाणारा कापूस हा अतिरिक्त लांब धाग्याचा (Extra long staple) असून, मध्यम, मध्यम लांब (Medium long) व लांब धाग्याच्या कापसाला (Long staple cotton) मात्र 6,800 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

पंजाब – 7,700 ते 8,400
हरियाणा – 7,700 ते 8,500
राजस्थान – 7,500 ते 8,800
गुजरात – 8,200 ते 8,800
मध्य प्रदेश – 6,700 ते 7,500
महाराष्ट्र – 6,800 ते 7,500
तेलंगणा – 7,400 ते 10,200
आंध्र प्रदेश – 8,500 ते 10,200
तामिळनाडू – 7,700 ते 8,400
(सध्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील कापसाचे माॅईश्चर (Moisture) 30 टक्क्यांच्या आसपास आहे.)

🌎 जागतिक बाजारातील रुईचे दर
सन 2021-22 च्या हंगामात जागतिक बाजारात रुईचे (Lint) दर 170 सेंट प्रति पाउंडवर या उच्चांकावर पाेहाेचले हाेते. त्यामुळे भारतीय कापसाला 12,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला हाेता. जागतिक बाजारातील रुईचे हेच सध्या 101 ते 103 सेंट प्रति पाउंड दरम्यान स्थिर आहेत. सप्टेंबर 2022 च्या सुरुवातीला हे दर 120 सेंट प्रति पाउंड तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 112 सेंट प्रति पाउंड एवढे हाेते. रुईच्या दरात घसरण हाेत असल्याने देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर 6,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. डाॅलरच्या (Doller) तुलनेत रुपयाचे सातत्याने अवमूल्यन हाेत असल्याने भारतीय कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया (Rupee) सशक्त असता तर हाही दर मिळाला नसता. रुईच्या गाठींचे (एक गाठ-172 किलाे) दर 65,000 रुपयांपरून 32,700 ते 33,500 रुपयांवर आले आहेत. 1 लाख रुपये खंडीवर (1 खंडी-356 किलाे रुई) पाेहाेचलेले रुईचे दर आता 62,000 ते 64,000 रुपये खंडीवर आले आहेत. सरकीचे (Cotton seed) दर 36 रुपये प्रति किलो वरून 33 रुपये प्रति किलोवर आले आहेत.

🌎 कापसाची आवक घटली
ऑक्टाेबर-2022 च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील बाजारपेठांमध्ये 61,572 टन कापसाची आवक झाली. मागील हंगामात म्हणजेच ऑक्टाेबर-2021 मध्ये ही आवक 1.12 लाख टन एवढी हाेती. मागील हंगामाच्या तुलनेत या हंगामात कापसाची आवक (Cotton arrival) 45 टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट हाेते.

🌎 सूत गिरण्या बंद, कापड गिरण्या अर्ध्यावर
कापसाचा तुटवडा (Cotton shortage) आणि वधारलेले दर यामुळे सध्या देशभरातील 60 ते 65 टक्के सूत गिरण्या (Spining mil)l पूर्णपणे बंद आहेत. माेठ्या कापड गिरण्यांमध्ये सध्या एक ते दाेन शिफ्टमध्ये काम सुरू असून, 60 टक्के छाेट्या कापड गिरण्या (Textile mill) बंद आहेत. त्यामुळे देशांतर्गत कापसाची मागणी (Cotton demand) घटली आहे. या गिरण्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कापसाची मागणी वाढेल. या काळात बाजारातील कापसाची आवक स्थिर राहिल्यास दर वधारतील आणि आवक वाढल्यास दर थाेड कमी हाेतील.

🌎 आयात शुल्क रद्द, निर्यातीला सबसिडी हवी
केंद्र सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (Import duty) 31 ऑक्टाेबरपर्यंत पूर्णपणे रद्द केला आहे. त्यामुळे कापसाची आयात स्वस्त झाल्याने काही मिल मालक थाेडा कापूस आयात करून देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्याचे काम करत आहेत. चीन व व्हिएतनाममधून माेठ्या प्रमाणात सुताची आयात केली जात आहे. 28 काऊंट भारतीय सुताची (Yarn) किंमत सध्या 19 रुपये प्रति किलाे असून, चीन व व्हिएतनाम 28 काऊंटचे सूत 10 ते 11 रुपये किलाेप्रमाणे देशात आयात केले जात आहे. चीन व व्हिएतनाम सरकारने त्यांच्या सुताच्या निर्यातीसाठी माेठी सबसिडी (Subsidy) दिली आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क पूर्ववत करून त्यात वाढ करावी. एवढेच नव्हे तर चीन व व्हिएतनाममधून आयात केल्या जाणाऱ्या सुतावर माेठ्या प्रमाणात आयात शुल्क लावावा. जर या सुताची आयात थांबली नाही तर भारतीय कापसाची देशांतर्गत मागणी कमी हाेऊन त्याचा परिणाम दर कमी हाेण्यावर हाेईल. शिवाय, केंद्र सरकारने कापसाच्या निर्यातीला साखरेप्रमाणे सबसिडी (Export subsidy) द्यायला हवी.

🌎 जानेवारीत चित्र स्पष्ट हाेणार
देशातील मिल व जिनिंग प्रेसिंग मालकांच्या संघटनांद्वारे बाजारातील कापसाच्या मागील व चालू हंगामातील याच काळातील आवक यावर कापसाच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जाताे. ते आकडे जानेवारी-2023 मध्ये येतील. ऑक्टाेबर-2022 ते जानेवारी-2023 या काळात बाजारात कापसाची आवक अधिक झाल्यास कापसाचे उत्पादन अधिक हाेणार असल्याचे तसेच आवक कमी झाल्यास उत्पादन कमी हाेणार असल्याचा अंदाज प्राप्त आकडेवारीवरून व्यक्त केला जाताे. या काळात आवक कमी झाल्यास कापसाचे दर वधारतील किंवा आवक वाढल्यास दर कमी हाेतील अथवा स्थिर राहतील, असे काॅटन ॲडव्हायझरी बाेर्डचे माजी सदस्य तथा जिनर विजय निवल यांच्यासह जिनिंग मालकांनी सांगितले. दुसरीकडे, कापसाच्या दरातील चढ-उतार हे जागतिक बाजारावरील दरावर अवलंबून असेल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी दबावात येऊन कापूस विकण्याची घाई करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!