Futures market : वायदा बाजाराची तोंडओळख
1 min readउदाहरणार्थ : एका शेतकऱ्याने तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि आज बाजारात तुरडाळीचे दर प्रति किलो 100 रुपये एवढा आहे. त्याला भरपूर उत्पादन होणार अशी खात्री आहे. सध्याच्या दराने माल भविष्यात विकला तर त्याला चांगला फायदा होणार आहे असे दिसत आहे. मात्र माल तयार होण्यासाठी अजून तीन महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे त्याला भीती वाटत असते की, अजून तीन महिन्यांनी जेव्हा तूरडाळ तयार होईल, तेव्हा जर बाजारात मोठ्या प्रमाणात माल आला तर आपल्याला कमी भावात माल विकावा लागू शकेल. त्यामुळे आपल्याला नुकसानही होऊ शकेल, अशी त्या शेतकऱ्याला भीती वाटत असते. त्या शेतकऱ्याचा अंदाज आहे की, त्याच्या शेतातून सुमारे 200 क्विंटल म्हणजेच 20,000 किलो तूरडाळ तयार होऊ शकेल. मग तो काय करू शकतो की, वायदेबाजरात तो आत्ताच जो दर असेल उदा. 105 रुपये प्रति किलो या भावाने 20,000 किलो तूरडाळ वायदे बाजारात (कमोडिटी एक्सचेंजवर) आजपासून तीन महिन्यांनी संपणाऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शॉर्ट करेल. जर तीन महिन्यांनी जेव्हा त्याची तूरडाळ तयार होईल आणि ती जर अपेक्षेप्रमाणे 200 क्विंटल एवढी उत्पादित झाली आणि तेव्हा जर तुरडाळीचा भाव प्रति किलो 75 रुपये झाला तर वायदे बाजारातून त्याला प्रति किलो 30 रुपये या दराने फायदा मिळेल. म्हणून तेथे तो 20,000 किलो तूरडाळ खरेदी करून फायदा मिळवून घेईल आणि त्याच्याकडील तूरडाळ बाजारभावाप्रमाणे 75 रुपये प्रति किलो या दराने विकूनही त्याला जेवढा होणार होता तेवढाच नफा मिळेल. जर बाजारात तुरडाळीचा भाव वाढला तर त्याला रोखीच्या बाजारात फायदा होईल. त्यातून तो वायदे बाजारात झालेले नुकसान भरून काढेल आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला प्रति किलो 100 रुपये या दराने तुरडाळीचा भाव मिळून तो समाधानी राहील.
इतिहासात आर्थिक जगतात आणि आर्थिक वर्तमानपत्रामध्ये वायदा बाजारामुळे अनेक व्यक्तींना प्रचंड नुकसान झाले किंवा अनेक आर्थिक संस्था वायदा बाजारात व्यवहार करून नामशेष झाल्या, अशा प्रकारच्या बातम्यांनी भरून गेलेली असत. मात्र गेल्या अनेक वर्षात मोठ्या संस्थात्मक आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांनी वायदा बाजाराचा यशस्वी वापर करून हा समज खोटा ठरविला आहे. आता तर जगात दररोज वायदे बाजारात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होत असते. मात्र, आजही पुरेसा अभ्यास नसल्यामुळे आणि झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने अनेक छोटे गुंतवणूकदार वायदे बाजारातून मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसत असतात. याचे प्रमाण जवळपास 95 टक्के एवढे प्रचंड आहे. यासाठीच शक्यतोवर छोट्या गुंतवणूकदाराने वायदे बाजारात व्यवहार जेवढे टाळता येतील, तेवढे टाळणे हेच इष्ट होईल.
जर तुम्हाला वायदेबाजारात व्यवहार करावयाचे असतील, तर तुम्ही त्याचे पुरेसे ज्ञान अगोदर मिळवले पाहिजे आणि काही काळ म्हणजे किमान सहा महिने ते एक वर्ष फक्त वायदे बाजाराचा अभ्यास केला पाहिजे. आपले ट्रेंड पेपरवर लिहून ठेवा आणि त्यातून किती प्रमाणात नफा नुकसान होते, ते तपासा. यासाठी NSE तुम्हाला व्हर्च्युअल ट्रेडिंगची सुविधा देते, ज्यात कोणतीही गुंतवणूक करून तुम्ही तुमचे वायदे बाजाराचे ज्ञान अजमावू शकता. असे करून जेव्हा तुम्हाला खात्री होईल की, आपण वायदेबाजारात यशस्वीपणे ट्रेडिंग करू शकतो, तेव्हाच ते तसे सुरू करा, म्हणजे नुकसान होण्याचे प्रमाण कमी करता येईल.
खरे पाहता, वायदे बाजाराचा उपयोग आपले नुकसान कमी करण्यासाठी इन्शुरन्स सारखा करता येतो. उदा. तुम्ही शेअर बाजारात काही शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक केलेली असून, बाजार वर गेल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य चांगले वाढलेले आहे आणि बाजारात काही प्रतिकूल वातावरणामुळे मंदीची चाहूल तुम्हाला लागलेली असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओतील ज्या शेअर्समध्ये फ्युच्युअर्स मधील एक लॉटच्या प्रमाणात शेअर्स असतील, तर तो शेअर फ्युच्युअर्समध्ये विकून शांत बसा (अर्थात यासाठी आवश्यक ते मार्जिन तुम्हाला भरावे लागेल) आणि जर तो शेअर खरोखर खाली आला तर तुम्हाला फ्युच्युअर्स मधे केलेल्या व्यवहारांतून मोठा फायदा होईल. रोखीत घेतलेले असलेल्या शेअर्समध्ये नुकसान होईल. पण झालेल्या फायदायतुन जर तुम्ही तेच शेअर्स परत विकत घेतलेत, तर तुम्हाला कोणतेच नुकसान न होता तुमच्याकडे जास्त शेअर्स तयार होतील.
भविष्यात जेव्हा बाजारात परत तेजी येईल, तेव्हा तुम्हाला होणारा फायदा हा अनेक पटीने वाढल्याचे तुम्हाला दिसेल. मात्र, जर तुमच्या अंदाजानुसार बाजार खाली आला नाही, तर तुम्हाला फ्युचर्समधील पोसिशन लवकर सोडून द्यावी लागेल. जेणेकरून नुकसान कमी करता येईल. त्याच वेळी तुमच्या रोखतील शेअर्सचे मूल्य वाढलेले असल्याने त्यात तुम्हाला फायदा झालेला असल्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही किंवा कमी असेल. जर मोठ्या प्रमाणात आणि अनेक क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जर तुमची मोठी गुंतवणूक असेल, तर तुम्ही या केसमध्ये निफ्टी शॉर्ट करून तुमचा पोर्टफोलिओ इन्शुअर करू शकता. असा वापर तुम्ही वायदे बाजाराचा करू शकता.
वायदे बाजारात अनेक प्रकारची गणितीय सूत्रे, प्रमेय आणि चार्ट यांचा वापर ट्रेडिंगसाठी केला जातो, हे जरा क्लिष्टच असते. मात्र, अनेक मोठ्या संस्था, सरकार, कॉर्पोरेट, बँका, परदेशी अर्थसंस्था, मोठे गुंतवणूकदार, हे वायदे बाजाराचा प्रभावीपणे वापर करत असतात.
आज बाजारात अनेक व्यक्ती तुम्हाला असे सांगणाऱ्या भेटतील की, ते वायदे बाजाराचे तज्ज्ञ असून, जर तुम्ही त्यांच्याकडे अमुक एक रक्कम गुंतवनली तर ते तुम्हाला दर महिना अगदी 2 टक्के ते 5 टक्के कदाचित जास्तसुद्धा दराने पैसे तुमच्या गुंतवणुकीवर देण्याचे सांगतील. कृपया करून अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे अजिबात पैसे गुंतवू नका. त्यांच्या वतीने असे सांगणारे कदाचित तुमचे मित्र किंवा जवळचे नातेवाईकसुद्धा असू शकतात. पण तुम्ही त्यांना स्पष्टपणे नाही, असे पहिल्याच भेटीत सांगितले पाहिजे. एक विचार करा जो तुमच्याकडून एक ठरविक रक्कम घेऊन जर त्यावर महिना 5 टक्के दराने पैसे देणार तर त्याला दर महिना किमान 10 टक्के ते 15 टक्के मिळवावे लागतील की नाही? आणि जर तो एवढा हुशार असेल, तर तो त्याची छोटी रक्कम गुंतवूनही काही काळातच एक श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो, मग स्वतःसाठी ट्रेडिंग करण्याचे सोडून तो तुमच्यासाठी हे का करेल?
कारण या जगात कोणताही व्यवसाय करणारा माणूस हा प्रथम स्वतःसाठी पैसे मिळवण्यासाठी तो व्यवसाय करत असतो. त्यामुळे अशा व्यवहारात गुंतवणूकदाराची 100 टक्के फसवणूक होत असते, हे लक्षात ठेवा. आजपर्यंत अनेक व्यक्ती अशाप्रकारे फसलेल्या तुमच्या आजूबाजूला असतील. एक लक्षात ठेवा की, शेअर बाजारातून/कमोडिटी बाजारातून कोणीही कायमस्वरूपी ठराविक दराने पैसे देऊ शकत नाही. कारण यात जोखीम असते आणि प्रत्येकालाच यात नुकसान होण्याची शक्यता असते. कारण कोणाचेच अंदाज तो कितीही हुशार असला तरी सदा सर्वदा बरोबर येऊ शकत नाहीत. जर असे 5 टक्के महिना म्हणजे वार्षिक 60 टक्के दराने पैसे मिळाले असते, तर 7 टक्के वार्षिक दराने व्याज देणाऱ्या बँक बंद नसत्या का पडल्या? हा विचार करा.
(साभार :- ठाकूर फायनान्सिएल सर्व्हिसेस)