Futures market : वायदे बाजार म्हणजे काय? वायदे बाजाराची रचना कशी असते?
1 min readउदा, एखादा शेतकरी भात पिकवत असेल तर हे पीक येण्यासाठी केलेल्या पेरणीपासून ते भात तयार होईपर्यंत चार महिने लागतात. तांदूळ विक्री करणारा व्यापारी हा त्याचा मोठा ग्राहक असतो. हा व्यापारी आणि शेतकरी एकमेकांशी चर्चा करून भाताचा भविष्यातील दर निश्चित करतात. यामुळे शेतकरी व व्यापारी याना भाताच्या भविष्यकालीन किंमतीची हमी मिळते. काराराची पुष्टता करण्यासाठी आगावू रक्कम बयाणा (advance) म्हणून मिळाल्यामुळे काही रक्कम शेतकऱ्यास वापरण्यास मिळते. जेव्हा शेतकरी व्यापाऱ्यास तयार झालेले भात देईल तेव्हा व्यापाऱ्याने ज्या भावाने भात खरेदी करण्याची हमी दिली होती, त्या दराने झालेल्या किंमतीतून बयाण्याची रक्कम वजा करून उरलेली रक्कम शेतकऱ्याला देईल. त्याने दिलेले भात तांदूळ बनवण्यासाठी भातगिरणीकडे पाठवून देईल आणि करार पूर्ण होईल.
भाजीपाला मंडई, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि काही विशेष वस्तू खरेदी /विक्रीचे बाजार, येथे होत असलेले हजर (Spot) व्यवहार ढीग पाहून रुमाल झाकून बोटांच्या सहाय्याने केले जातात. नाफेडच्या माध्यामातून सरकारने दिलेल्या हमीभावाने कांदा, कापूस, तूरडाळ यांची खरेदी किंवा सरकारी हमीभावाने वस्तूंची खरेदी/विक्री सार्वजनिक वितरण अथवा सहकारी गट यांच्यामार्फत केली जात असल्याच्या बातम्या आपण अधून मधून ऐकतो. या शिवाय काही पारंपरिक प्रथेनुसार भावी व्यवहारही होत असतात. सांगलीमध्ये हळदीचे वायद्याचे व्यवहार होत होते आणि स्थानिक बँका पेवांमधील हळदीचा साठा तारण ठेवून कर्ज देत असत. कोकण विभागात काही मोठे आंबा व्यापारी मोहोर आलेले झाड पाहून ते झाडच खरेदी करतात. त्यापासून मिळणारा त्या हंगामाचा सर्व आंबा या व्यापाऱ्यास द्यावा लागत असे. पश्चिम किनारपट्टीवरील ताड माड या सारख्याच झाडापासून मिळणारा व्यवसाय मलबार जमातीकडे एकेकाळी एकवटला होता.
या प्रकारे परस्पर संमतीने होणारे भावी व्यवहार अंतिमतः पैशांच्या माध्यमातून पूर्ण होत असतात. यात दोन्हीपैकी एक बाजूने व्यवहार पूर्ण करण्यास नकार दिल्यास पूर्ण होवू शकत नाही. परंपरागत पद्धतीने हे व्यवहार कोठेही नोंदीत केले जात नाहीत. त्यामुळे ते खात्रीपूर्वक पूर्ण होतील असे नाही हा धोका असतो. यातून भरपाई मिळवण्याची निश्चित अशी पद्धती नाही. त्यामुळे असे व्यवहार ओळखीच्या व्यक्तींमध्ये आणि परस्परातील विश्वासाने होत असतात. भारतात अनेक भागात यात असलेला धोका आणि त्यापासून भरपाई मिळवण्याची अनिश्चितता यांचा विचार करून प्रामुख्याने ते वस्तूंमध्ये केले जातात. हे व्यवहार ज्याप्रमाणे वस्तूंमध्ये केले जातात त्याप्रमाणे शेअर्स, डिबेंचर, इंडेक्स, कमोडिटी, परकीय चलन, व्याजदर यासारख्या अनिश्चितता असलेल्या कोणत्याही गोष्टींत करता येऊ शकतात आणि निश्चीत केलेल्या अशा पद्धतीने एक्सचेंजच्या माध्यामातून होतात. ते एक्सचेंजच्या क्लिरिंग कॉर्पोरेशन मार्फत होत असल्याने ते पूर्ण कसे होतील आणि जर एखाद्याने ते पूर्ण करण्यास नकार दिला तर नियमांनुसार कारवाई करून बंद केले जातात. हे व्यवहार कोणते? आणि ते कसे केले जातात? बाजारात कार्यरत विविध गट त्याचा कसा वापर करतात? ते उदाहरणांसहित लवकरच पाहू.