Orange fruit dropping : संत्रा पिकातील फळगळ : कारणे व उपाययोजना
1 min read🌳 बुरशीजन्य फळगळ
संत्रा फळझाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया या बुरशीमुळे होते. पावसाळ्यात या बुरशींचे संक्रमण फळांच्या देठांना तसेच फळांची साल व देठ यांच्या जोडावर होऊन ती काळपट तपकिरी डाग पडतात व तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींचे बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात. परिणामी, आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते. यावेळेस बऱ्याच ठिकाणी फळगळ ही डिप्लोडिआ या बुरशीमुळे होताना दिसत आहे.
✳️ फायटोप्थोरा फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कूज लक्षणे
जमिनीलगतची हिरवी असलेली फळे यावर तपकिरी/करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. फळाच्या हिरव्या सालीस संक्रमण होऊन पूर्ण फळ तपकिरी, काळ्या रंगामध्ये परावर्तीत होतात व फळे सडून गळतात. या फळ सडीच्या अवस्थेस ‘ब्राऊन रॉट’ किंवा तपकिरी रॉट असे संबोधतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड या कारणांमुळे हा रोग अधिक प्रमाणात फोफावतो.
✳️ कोलेटोट्रीकम स्टेम ॲण्ड रॉट किंवा देठ सुकणे
कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. हा भाग नंतर वाढत जातो व संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळे पडतात, वजनाने हलके होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.
✳️ डिप्लोडिआ फळावरील कूज
डिप्लोडिआ बुरशीजमुळे फळाच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो. चट्ट्याचा भागावर दाब दिला असता तो मऊ जाणवतो. पिवळा असलेला भाग नंतर करड्या किंवा तपकिरी रंगाचा होतो. कोरड्या उष्ण वातावरणात व झाडावर सल असलेल्या बगीच्यात या बुरशीचा प्रकोप अधिक होतो.
🍊 बुरशीजन्य रोगापासून होणारी फळगळ व्यवस्थापनासाठी या उपाययोजना कराव्या
✳️ सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तसीच राहू देऊ नये. अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. वाफा स्वछ ठेवावा. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. कारण जिकडे पाणी साठून राहते त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीची लागण अधिक होते.
✳️ फायटोफ्थोरा फळावरील तपकिरी रॉट मुळे होणाऱ्या फळगळीसाठी संपूर्ण झाडावर फोसिटिल एएल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्ल्यूपी 2.5 ग्रॅम किंवा कॅप्टन 75 डब्ल्यूपी 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
✳️ कोलेटोट्रीकम स्टेम ॲण्ड रॉटमुळे होणाऱ्या फळगळीसाठी बोर्डेक्स 0.6 टक्के मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 डब्ल्यूपी 2.5 ग्राम किंवा कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यूपी 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
✳️ फळावरील कूज असल्यास याकरिता बेंझिमिडाझोल या वर्गातील बुरशीनाशकांची फवारणी करावी.
🌳 ग्रीनिंग रोगामुळे होणारी फळगळ
ग्रीनिंग रोग हा जीवाणूजन्य असून, या रोगाचा प्रसार ‘सिट्रस सायला’ किडीद्वारे होतो. प्रथम लक्षणे पानांवर दिसून येतात. पानाचा शिरांमधील भाग पिवळा होण्यास सुरुवात होते. हा पिवळेपणासुद्धा मध्यशिरेच्या दोन्ही बाजूस सारखा नसतो. शेवटी संपूर्णपणे पाने पिवळी होतात. रोगट पाने आकाराने लहान राहून ती फांद्यावर उभट सरळ होतात. फळे आकाराने लहान राहून त्यांची वाढ असमतोल होते. फळातील बिया काळ्या पडून सुरकुतलेल्या चपट्या राहतात. फळातील रसाची चव कडू होते. रोगग्रस्त
झाडावरील फळांचा उन्हाकडील भाग पिवळा व सावलीतील किंवा पानात झाकलेला भाग गडद हिरवा राहतो. अर्धे पिवळे व अर्ध हिरवे असलेली फळे गळून पडतात.
🍊 ग्रीनिंग रोगामुळे होणारी फळगळ व्यवस्थापनासाठी या उपाययोजना कराव्या
✳️ सिट्रस सायला कीडीचे अंतरप्रवाही कीटकनाशक वापरून बंदोबस्त करावा.
✳️ स्फुरदयुक्त खतांची मात्रा वाढवून जमिनीतून द्यावी व खतासोबत झिंक सल्फेट 200 ग्राम, फेरस सल्फेट 200 ग्राम व बोरॅक्स 200 ग्राम मातीत मिसळून द्यावे.
✳️ झाडावर 00:52:34 या पाण्यात विद्राव्य खताची (1 किलो) टेट्रासायक्लीन (6 ग्राम) 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🌳 कीटकजन्य फळगळ
लिंबूवर्गीय फळझाडांवर प्रादुर्भाव करणाऱ्या कीटकांपैकी प्रामुख्याने फळातील रस शोषणारा पतंग, फळमाशी, सिट्रस सिल्ला व कोळी या किडींमुळे फळगळ दिसून येते. रस शोषणारा पतंग व फळमाशी या दोन मुख्य किडींमुळे सर्वाधिक फळगळ आढळून येते. त्यामुळे या किडींची परिणामकारक उपाययोजना करणे गरजेचे ठरते.
✳️ फळातील रस शोषण करणारा पतंग
या किडीमुळे सर्वाधिक फळगळ ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. या किडीचा पतंग सायंकाळी सक्रिय होऊन पक्व होत असलेल्या फळाला सुई सारख्या सोंडेद्वारे छिद्र करून रस शोषून घेतो. छिद्र पडलेल्या जागेतून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळ सडण्यास सुरुवात होते. परिणामी, फळ गळून पडतात. अशा फळांना दाबले असता छिद्रातून आंबलेला रस बाहेर येतो. गळलेले फळ पूर्णतः सडते. त्याला दुर्गंध येतो व यावर अनेक छोट्या माश्या घोंगावू लागतात.
✳️ फळमाशीमुळे होणारी फळगळ
मादी माशी आणि तिच्या अळीमुळे फळांचे नुकसान होते. प्रौढ मादी फळाच्या सालीखाली एक वा अनेक अंडी घालते. तीन ते पाच दिवसांत अंडी उबून त्यातून मळकट पांढऱ्या रंगाच्या लहान पाय नसलेल्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळामध्ये शिरून त्यातील रस व गर खाऊन टाकतात. त्यामुळे फळाचा नाश होतो. त्यांची गुणवत्ता घटते. अंडी घालताना जिथे छिद्रे पडली असतात, तो भाग इतर रोगजंतुनी संक्रमित होऊन तिथे पिवळे डाग पडतात आणि अकाली फळगळ होते. फळ दाबले असता फळातून छिद्रे असलेल्या जागेतून पिचकारी सारखे फवारे उडतात.
🍊 किडींपासून होणाऱ्या फळगळ व्यवस्थापनासाठी या उपाययोजना कराव्या
✳️ फुले येतेवेळी सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास डायमेथोएट 2 मिली किंवा इमिडॅक्लोप्रीड 0.5 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
✳️ रसशोषण करणाऱ्या पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करून बागेत ठेवावी. याकरीता 20 ग्राम मॅलॅथिऑन 50 ईसी 20 मिली + 200 ग्राम गुळ + खाली पडलेल्या फळांचा रस (400 ते 500 मिलि) 2 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येकी दोन आमिषे रुंद तोंडाच्या दोन बाटल्यात टाकून प्रत्येक 25 ते 30 झाडांमध्ये एक या प्रमाणात ठेवावे. बागेत 1 दिवसाआड रात्री 7 ते 10 वाजताच्या दरम्यान ओलसर गवत पेटवून व त्यावर कडूलिंबाच्या ओल्या फांद्या/पाने ठेवून धूर करावा. तसेच संत्रा बागेच्या भोवती असलेल्या गुळवेल, वासनवेल, चांदवेल इत्यादी तणाचा नाश करावा. प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्क (500 ग्राम/10 लिटर पाणी) किंवा निम तेल 100 मिलि/10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रात्रीच्या वेळेस बागेत तीव्र झोताचे टॉर्च लावल्यास पतंग सुस्त होतात. असे पतंग पकडून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.
✳️ फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे प्रति हेक्टरी 25 या प्रमाणात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून किंवा ताेडणीच्या साधारण दाेन महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत. बागेतील खाली पडलेली फळे वेचून खड्ड्यात पुरून बाग स्वच्छ ठेवावी.
🌳 शारीरिक बदलांमुळे होणारी फळगळ
मुख्य शारीरिक बदलांमुळे होणाऱ्या फळगळीची कारणे
✳️ पाण्याचा ताण किंवा अधिक पाऊस.
✳️ उष्ण कोरडे वातावरण.
✳️ अन्नद्रव्यांची कमतरता.
✳️ अशक्त झाडे
🍊 पहिली फळगळ : संत्रा फुले उमलल्यानंतर परागकणांच्या कमतरतेमुळे किंवा पर्यावरणाच्या ताणामुळे किंवा पाेषणाच्या अभावामुळे फुले व छोटी फळे गळून पडतात. या टप्प्यावर पडलेली फुले व फळपत्रे ही देठासहित (पेडनक्ल) गळून पडतात.
🍊 दुसरी फळगळ : उमलल्यानंतर एक ते दोन महिने कालावधीतील गारगोटी एवढी किंवा त्यापेक्षा किंचित मोठी विकसनशील फळ झाडांवरून गळून पडतात. या टप्प्यावर पडलेली फळे देठाशिवाय पडतात. देठाभोवती हलकी फुगिर रिंग तयार होते व चकतीतून फळ निसटून गळते.
🍊 तिसरी फळगळ : ही फळगळ ऑगस्ट महिन्यापासून सुरू होते. यामध्ये अपरिपक्व ते काढणी पूर्वीच्या फळगळीचा समावेश होतो. ही फळगळ आर्थिक नुकसानकारक असते. या फळगळीमध्ये संत्रा फळे पिवळी पडतात. हात लावल्यानंतर लगेच तुटून पडतात. कार्बन-नत्राचे असंतुलन, पुरेशी पालवी नसणे, अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अभाव, अति आर्द्रता किंवा जमिनीत असणारा अतिशय जास्त ओलावा, उष्ण कोरडी हवा, अधिक वाफसा स्थितीत केलेली व अधिक मात्रेत केलेली तणनाशकाची फवारणी इत्यादी कारणांमुळे फळगळ वाढते.
🍊 वरीलपैकी कोणत्याही कारणांमुळे जेव्हा झाडे ताणतणावात असतात, तेव्हा झाडांमध्य इथिलीन वायू निर्माण होतो. या इथिलीन वायुमुळे झाडांच्या शाखा/फांद्या आणि फळ यांच्यामधील पेशीक्षय होऊन परिणामी फळांची गळ दिसून येते.
🍊 फळगळ टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन उपाययोजना
✳️ झाडाच्या जडणघडीमध्ये पानांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण पानांचे एकमेव कार्य म्हणजे झाडास विविध जैविक क्रिया पूर्ण करण्यास आवश्यक ती ऊर्जा तयार करणे व पुरविणे हे आहे. झाडास पुरेशी पालवी नसल्यास मर्यादित स्वरुपात अन्नसाठा तयार होतो. अन्नद्रव साठले नाही तर नवतीच फुटते किंवा फळ आली तर ती गळून पडतात. त्यामुळे पालवीनुसार फळे झाडास ठेवावीत. झाडावर पुरेसे पाने असल्यासच फवारणीचा अपेक्षित परिणाम होतो. पालवी भरपूर असावी, यासाठी शिफारसीनुसार खतांचा वापर करावा.
✳️ झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्यावरील सुप्तावस्थेतील रोगकारक निघून जाण्यासाठी छाटणी करावी. सल काढताना फांदीचा हिरवा भाग 5 सेंमीपर्यंत घेऊन सल काढावी व प्रत्येक वेळी सल काढणाऱ्या अवजाराचे निर्जंतुकीकरण करावे. सल काढलेल्या झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे त्याचा पुढील हंगामावर होणारा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो व छाटणीमुळे पालवी फुटण्यास मदत होते.
✳️ फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये. खोल मशागत केल्याने झाडांची मुळे तुटतात व जमिनीची जलधारण शक्ती वाढते, निचरा होत नाही व फळगळ होते.
✳️ बागेस प्रमाणापेक्षा जास्त व प्रमाणापेक्षा कमी पाण्याची परिस्थिती टाळावी. उन्हाळ्यात केलेली आळे पावसाळ्याआधी मोडावी. पावसाळ्यात सततच्या पावसाने दलदल होऊन जमिनीतील मुळे कूजतात व मुळांना प्राणवायू कमी मिळाल्यामुळे सुरुवातीच्या काळात फळांच्या वाढीवर परिणाम होतो व यामुळे सुद्धा फळगळ दिसून येते. पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा होण्याची काळजी घ्यावी. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात बागेत पाणी सचून राहल्यास व पाण्याचा निचरा न झाल्यास फळांची गळ होते. पाणी सचून राहत असल्यास दोन किंवा तीन ओळींत एक याप्रमाणे उताराच्या दिशेने चर काढून पाणी बागेच्या बाहेर काढावे.
✳️ झाडांवर गळून पडलेल्या फळांना खोल खड्ड्यात दाबून त्यांची विल्हेवाट लावावी. फळबागेत फळांचे ढीग कुठेही ठेवू नका. कारण ते कीड व रोगाचे प्रसार करण्याचे काम करतात.
✳️ सतत पावसाचे पाणी साचून राहल्यास तसेच उष्ण वातावरणात बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.
✳️ अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता 10 वर्षावरील झाडांसाठी शिफारसीत मात्रा 50 किलाे शेणखत, 7.5 किलो निंबोळी ढेप 800 ग्राम नत्र, 300 ग्राम स्फुरद, 600 ग्राम पालाश प्रती झाड यासह 500 ग्राम व्हॅम, 100 ग्राम स्फुरद विरघळवणारे जिवाणू + 100 ग्राम अॅझोस्पीरीलम, 100 ग्राम ट्रायकोडर्मा, 100 ग्राम सुडोमोनास 100 ग्राम प्रति झाड द्यावे. नत्र हा अमोनियम सल्फेटमधून द्यावे.
✳️ सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे द्यावयाची असल्यास झिंक सल्फेट 5 ग्राम, फेरस सल्फेट 1 ग्राम व बोरॉन 1 ग्राम प्रति लिटर पाणी घेऊन अंबिया फळांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात तसेच मृगाच्या फळांसाठी ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये फवारणी करावी.
✳️ एनएनए 1 ग्राम किंवा जिब्रेलिक अॅसिड 1.5 ग्राम किंवा 2-4 डी 1.5 ग्राम + युरिया 1 किलो + कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यूपी 100 ग्राम + 100 लिटर पाणी घेऊन या द्रावणाची फवारणी करावी. दुसरी फवारणी पुन्हा 15 दिवसांनी करावी.
✳️ झाडावर पानांची संख्या कमी व पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास
कॅल्शियम अमोनियम नायट्रेट (1 किलो) जिब्रेलिक अॅसिड 1.5 ग्राम + कार्बेन्डेजिम 100 ग्राम + 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
@ डॉ. योगेश इंगळे व डॉ. दिनेश पैठणकर
अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे),
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.