Cotton Production: नवीन हंगामात कापसाचे उत्पादन 375 लाख गाठींवर पाेहाेचणार काय?
1 min read🌎 फसवा अंदाज
यूएसडीए (USDA – United States Department of Agriculture), सीएआय (Cotton Association of India) या संस्था दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला भारतातील कापसाच्या एकूण उत्पादनाचा अंदाज व्यक्त करते. सन 2018-19 ते 2021-22 या काळात त्यांनी व्यक्त केलेला अंदाजापेक्षा कापसाचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून आले आहे. सन 2021-22 च्या हंगामात देशभरात 362 लाख गाठींचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला हाेता. वास्तवात उत्पादन 305 ते 308 लाख गाठींवर पाेहाेचले. सन 2020-21 च्या हंगामात 372 लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला असताना 352 लाख गाठींचे उत्पादन झाले हाेते. या दाेन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या पिकाच्या दृष्टीने हवामान प्रतिकूल (Inclement weather) आहे. त्यामुळे सीएआयचा कापूस उत्पादनाचा अंदाज याही हंगामात चुकणार असून, देशभरात कापसाचे एकूण उत्पादन 317 ते 320 लाख गाठींच्या आसपास हाेण्याची शक्यता आहे. या फसव्या अंदाजामुळे कापसाचा बाजार मात्र प्रभावित होतो आणि दर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने कापूस उत्पादकांचे नुकसान होते.
🌎 मुसळधार पावसाचा फटका
मुळात कापूस हे दुष्काळी म्हणजेच कमी पाण्याचे पीक (Drought crop) आहे. कापूस पट्ट्यात ज्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस काेसळला, त्यावर्षी कापसाची उत्पादकता वाढून अधिक उत्पादन झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल हाेण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना विलंबाने दाखल झाला. त्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची पेरणी सुरुवाला खाेळंबली हाेती. काही भागात मुसळधार व अति मुसळधार पाऊस बरसल्याने दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काेसळलेला मुसळधार पाऊस आणि प्रत्येकी 12 ते 15 दिवस असलेले ढगाळ वातावरण, ओल्या जमिनीमुळे डवरणी, निंदण, खत देणे यासह अन्य आंतरमशागतीची (Inter Cultivation) कामे खाेळंबल्याने कपाशीच्या झाडांची वाढ खुंटली. त्याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर निश्चितच हाेणार आहे. मुसळधार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कापसाच्या उत्पादनात 15 ते 20 टक्के घट हाेणार आहे.
🌎 बाेंडसड व गुलाबी बाेंडअळी
सततचा पाऊस (Heavy rainfall), ढगाळ व दमट हवामान (Cloudy and humid weather), जमिनीत पाण्याचा याेग्य निचरा न हाेणे (Water logging), बुरशीचा (fungus) प्रादुर्भाव यामुळे काही भागात कपाशीची बाेंड सडून (Boll rot) गळायला लागली. राजस्थानपासून तर तामिळनाडूपर्यंत संपूर्ण कापूस पट्ट्यात मागील काही वर्षांपासून गुलाबी बाेंडअळीचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. गुलाबी बाेंडअळीमुळे (Pink bollworm) कापसाचे उत्पादन घटत असून, दर्जाही खालावताे. शिवाय, अळ्या सरकी (Cotton seed) पाेखरून त्यातील स्निग्ध (Oil) पदार्थ खात असल्याने सरकी पाेकळ हाेते व कापसाचे वजन कमी हाेते. काही भागात पावसानंतर कपाशीच्या पिकाला पाण्याचा दीर्घ ताण बसल्याने झाडे मलूल हाेऊस सुकल्यागत झाली हाेती. पाऊस, बाेंडसड, गुलाबी बाेंडअळी, रस शोषण करणारी कीड (Sucking pest), पांढरी माशी (White fly)चा प्रादुर्भाव व पाण्याच्या ताणामुळे महत्त्वाचा असलेल्या पहिल्या वेच्याचा कापसाचे (First picking of cotton) नुकसान झाल्याचे त्याचा कापसाच्या एकूण उत्पादनावर निश्चितच परिणाम हाेणार आहे. या किडींमुळे नुकसानीची तीव्रता किमान 15 ते 25 टक्के असते.
🌎 परतीच्या पावसाची भीती
मध्य प्रदेश, महाराष्ट्रात कापसाच्या वेचणीला ऑक्टाेबरपासून सुरुवात हाेते. याच काळात परतीच्या पावसाची (Return Monsoon) दाट शक्यता असते. यावर्षी परतीच्या पावसाचा प्रवास थाेडा लांबणीवर गेल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बाेंडसड व गुलाबी बाेंडअळीच्या तावडीतून सुटलेली बाेंडे फुटल्यानंतर त्याच काळात परताचा पाऊस आल्यास कापूस भिजण्याची व त्याची प्रत खालावून नुकसान हाेण्याची शक्यताही बळावली आहे.
🌎 जीएम बियाण्यांवरील बंदीमुळे ओढवले संकट
केंद्र सरकारने जीएम (GM – Genetically modified organisms) बियाण्यांवर (Seed) बंदी (Ban) घातली आहे. सध्या देशात वापरले जाणारे कपाशीचे बियाणे सन 2004 पासून अपग्रेड (Upgrade) न केल्याने ते कालबाह्य झाले आहे. भारतीय शेतकरी कापसाचे जे बीटी (बीजी) बियाणे वापरत आहे, ते गुलाबी बाेंडअळीला प्रतिबंधक राहिले नाही. सध्या जगात गुलाबी बाेंडअळी, रस शाेषण करणारी किडी व पांढऱ्या माशीला प्रतिबंधक असलेले कपाशीचे बियाणे जगात उपलब्ध असताना केंद्र सरकारने त्या बियाण्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. परिणामी, कापसाचा उत्पादन खर्च वाढत (Increase in production costs) असून, उत्पादन घटत असल्याने देशात केवळ बियाणे व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना पाेसणे सुरू आहे.
🌎 जीएम बियाणे व मूल्य साखळी
कापसाच्या घटत्या उत्पादनामुळे देशभरातील सूत व कापड गिरण्या संकटात सापडल्या आहेत. देशात जिनिंग-प्रेसिंग पासून तर कापड निर्मिती प्रक्रियेपर्यंतचा उद्याेग जवळपास 18 ते 20 काेटी लाेकांना राेजगार देताे. कापसाचे दर 10,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर जाताच सूत व कापड उद्याेग संकटात येऊ लागताे. ही संपूर्ण मूल्य साखळी (Value chain) जिवंत ठेवण्यासाठी या उद्योगाला रास्त दरात कापूस उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला रास्त भाव मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी कमी खर्चात कापसाचे अधिक उत्पादन करणे आवश्यक आहे. अधिक उत्पादकता, उत्पादन व खर्च कमी करण्यासाठी कीड व राेगांना प्रतिबंधक असलेले कपासाचे जीएम बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. कापसाची उत्पादकता (Productivity of cotton) वाढविणे, शेतजमिनीचे आरोग्य (Soil health) सिंचनासाठी वापरल्या पाण्याची गुणवत्ता (Quality of water used for irrigation) व बियाण्यांची शुद्धता (Purity of seeds) या मूलभूत बाबींकडे काळजी व नियोजनपूर्वक लक्ष दिल्यास भारतीय शेतकरी वर्षाकाठी किमान 450 ते 500 लाख गाठी कापसाचे उत्पादन करून देण्याची क्षमता आजही बाळगून आहे. या बाबी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय (Ministry of Agriculture), वस्त्रोद्योग मंत्रालय (Ministry of Textiles), सीएआय, वस्त्रोद्योग (Textiles) व जिनिंग-प्रेसिंग लॉबी (Ginning – pressing lobby) पुढाकार घ्यायला व सरकार दबाव निर्माण करायला तयार नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धाेरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून तर कापड उद्याेगापर्यंतची साखळी कमकुवत झाली असून, आता मृतावस्थेकडे वाटचाल करीत आहे. या प्रक्रियेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दरवर्षी आर्थिक लूट करत त्यांच्याकडून कापसाच्या 375 लाख गाठींच्या उत्पादनाची अपेक्षा करणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाणे होय!