ईडा-पिडा, रोगराई, संकटं घेऊन जा गे मारबत!
1 min read
🌐 ऐतिहासिक पार्श्वभूमी
ही मूळ परंपरा आदिवासींची असल्याचे जाणकार व्यक्ती सांगतात. मारबत उत्सव नागपूर शहरासाेबतच विदर्भाचा इतिहास व संस्कृतीचा अविभाज्य अंग बनला आहे. पूर्वी भाेसले घराण्यातील बांकाबाई हिने ब्रिटिशांशी हातमिळवणी केल्याने तिच्या कृतीच्या निषेधार्थ बांकाबाईच्या कागद व बांबू वापरून पुतळा तयार करण्यात आला. त्या पुतळ्याची तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढून दहन करण्यात आले हाेते. बाकांबाईच्या पतीनेही तिच्या या कृत्याचा विरोध केला नव्हता, म्हणून त्याचाही पुतळा तयार करून ताेही मिरवणुकीत सामिल केला हाेता. बांकाबाईच्या पुतळ्याला मारबत तर तिच्या पतीच्या पुतळ्याला बडग्या संबाेधण्यात आले हाेते. नागपूर शहरातील इतवारी येथील बारदाना मार्केटमधून निघणाऱ्या काळ्या मारबतीची सुरुवात सन 1880 मध्ये म्हणजेच 142 वर्षांपूर्वी तर शहरातील मस्कासाथ येथील तऱ्हाणे तेली समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या पिवळ्या मारबतीची सुरुवात सन 1884 मध्ये म्हणजेच 138 वर्षांपूर्वी करण्यात आली. मारबतीच्या इतिहासात काेराेना संक्रमणाची दाेन वर्षे वगळता कधीच खंड पडला नाही. सन 1897 मध्ये नागपूर शहरात प्लेगची साथ हाेती तर सन 1927 मध्ये नागपुरात माेठ्या प्रमाणात हिंदू-मुस्लिम दंगे भडकले हाेते. मात्र, या दाेन्ही वर्षी मारबत मिरवणुकीत खंड पडला नव्हता.
🌐 काळी आणि पिवळ्या मारबतीचे महत्त्व
समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. या उत्सवाला महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्राचीन काळी मारबत आणि लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात सत्याग्रहींच्या नागपुरात गुप्त बैठका व्हायच्या. त्यासाठी तेली समाज बांधवांनी सन 1885 मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. त्यावेळी स्व. आप्पाजी व बटानजी खोपडे यांनी बांबूच्या कमच्या व कागद लावून 3 ते 4 फूट उंचीची बाहुलीसारखी मारबत तयार करून लोकांच्या मदतीने शहरात तिची मिरवणूक काढली. त्या मारबतीचे नाईक तलावात विसर्जन केले हाेते. सन 1913-14 मध्ये लक्ष्मणराव व रामाजी खोपडे यांनी गणपतराव शेंडे यांच्याकडून 20 फूट उंचीची बैठकी पिवळी मारबत तयार करून घेतली. त्यानंतर समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मारबतीचा उत्सव सुरू केला. काळी मारबत ही घातक रुढी, परंपरा तर पिवळी मारबत चांगल्या परंपरांचे प्रतीक मानले जाते.

🌐 मारबत मिरवणुकीचा मार्ग
पिवळी मारबत मिरवणुकीला शहरातील जागनाथ बुधवारी येथून तर काळी मारबत मिरवणूक श्री देवस्थान पंचकमेटी इतवारी येथून सुरू हाेते. या दाेन्ही मारबतींची इतवारीतील पंडित नेहरू चाैकात गळाभेट हाेते. त्यानंतर या दोन्ही मारबती बडकस चौक, महाल, गांधीगेट, गांजाखेत मार्गे नाईक तलावाजवळ येतात व तिथे त्यांचे विसर्जन केले जाते. या मिरवणुकीत नागपूर शहरातील लाखाे नागरिक सहभागी हाेतात. यात लहानग्यांपासून महिला व ज्येष्ठांचा समावेश असताे. इतवारीपासून तर बडकस चौकापर्यंत चारही बाजुंनी लोकांची अलाेट गर्दी दाटलेली असते. यश मार्गालगतच्या इमारतीही नागरिकांनी फुललेल्या असतात. बदलत्या काळात तरुण मंडळी ढाेल ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर थिरकते. आजवर लाखाे नागरिकांच्या या मारबत मिरवणुकीला गालबाेट लागले नाही.

🌐 चर्चेचा विषय ठरलेले बडगे
अनिष्ठतेकडुन सकारात्मकतेकडे नेणाऱ्या या मारबत उत्सवाच्या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्सवात स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह समस्यांवर भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या मनातील राग आणि संताप व्यक्त होतो. त्यामुळे राजकीय विषयांवरील भाष्यांमुळे बडगे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. बदलत्या काळात या मिरवणुकीला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. यावर्षी तीन मारबतींसह 12 बडगे मिरवणुकीत सहभागी करण्यात आले हाेते. यात वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पेट्रोल दरवाढ आणि राजकीय परिस्थितीवर बाेट ठेवणाऱ्या बडग्यांचा समावेश हाेता. हे बडगे शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने तयार केले जातात. अॅक्शन कमिटी एनजीओच्या वतीने अग्निवीर योजनेला समर्थन देणारा, संग्राम बडग्या उत्सव समितीने पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईकडे लक्ष वेधणारा, युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळाने बेरोजगारी आणि पोलीस भरतीवर, छत्तीसगडी समाज बडग्या उत्सव मंडळाने महागाईकडे लक्ष वेधणारा, विदर्भ क्रांतीदल बडग्या उत्सव मंडळाने वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधणारा, बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळाने गंगाजमुना वस्तीतील वेश्या व्यवसायाच्या विरोधात, लालगंज खैरी पुरा येथील युवाशक्ती बडग्या उत्सव मंडळाकडून महागाई आणि जीएसटीचा विरोध करणारा, तेली समाज बाल मित्र बडग्या उत्सव मंडळाने लोकशाहीची हत्या या विषयावर बडग्या काढून नागरिकांचे लक्ष वेधले. जालौर (राजस्थान) येथील मुख्याध्यापकाने दलित समाजातील विद्यार्थ्याला केलेल्या अमानुष मारहाण व त्यात त्याचा झालेला मृत्यू या घटनेच्या निषेधार्थ दोन बडगे काढण्यात आले हाेते. शिवशक्ती बालमित्र बडग्या उत्सव मंडळ आणि अविघ्न बडग्या उत्सव मंडळाने कन्हय्यालाल या विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिक्षकाला फाशी देण्याची मागणी या बडग्यांच्या माध्यमातून केली. पन्नास खोके…सब कुछ ओके…, भोंगे बंद झाले..फोकनाडे मारणारे जेलमध्ये बंद झाले…., लवासा ओके…बारामती ओके..असे फलक लावले होते.

🌐 भुरी व लाल मारबत
सेव्ह इंडिया फॅमिली फाऊंडेशनतर्फे पुरुषांवरील अत्याचाराकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी भुरी मारबत या मिरवणुकीत सहभागी केली हाेती. यात देशात दर नऊ मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करीत असून, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुरुष आयोग गठीत करण्याची मागणी लावून धरली. टिमकी मंडळाच्यावतीने लाल मारबत काढण्यात आली हाेती.
🌐 तयार करण्याची पद्धती
मारबत व बडगे बांबू व काठ्यांना तरट फाटके कपडे, चिंध्या गुंडाळून त्याचे माेठे पुतळे तयार केले जातात. त्यांना विविध आकर्षक रंगांनी रंगवले जाते. मारबतबरोबर जो बडग्या असतो, त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.
🌐 सामाजिक संदेश व रोजगार प्राप्ती
या मिरवणुकीच्या माध्यमातून ईडापिडा, रोगराई, जादुटोना घेऊन जागे मारबत म्हणत समाजातील वाईट गोष्टींना संपविण्याचा प्रयत्न असतो. राजकारण व समाजातील चुकीच्या लोकांचा, चुकीच्या मानसिकतेचा, विचारांचा विरोध देखील केला जाताे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवर फलकांच्या माध्यमातून भाष्य केले जाते. सूचक ओळींद्वारे प्रबाेधन करण्याचा प्रयत्न केला जाताे. या मारबतींच्या पुतळ्यांचे दहन केल्यानंतर समाजातील सगळ्या चुकीच्या गोष्टी व घातक विषाणूंचा नाश होतो. त्यानंतर परत नव्याने सकारात्मकतेची सुरुवात होते, असा समज आहे. या एका दिवसाच्या मिरवणुकीला जत्रेचे स्वरुप प्राप्त होत असल्याने अनेकांना रोजगार देखील प्राप्त होतो.