krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

बैल गेला…. पोळा राहिला…..!!

1 min read

भारतीय संस्कृतीची सुरुवात इ.स. पूर्व पाच हजार, जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी एक… जगाला व्यापार, कृषी, खगोल शिकविणाऱ्या या संस्कृतीत बैल, पाणी आणि जमीन याला अनन्यसाधारण महत्त्व होते. श्रावणापूर्वी येणारा बेंदूर, श्रावणात येणारा पोळा, पोंगल हे याच संस्कृतीच्या पाऊलखुणा…… आतापर्यंत अनेक संक्रमण झालीत…. उत्क्रांतीची बीज पडली की ती रुजली आणि त्या परंपरा झाल्या. पण कृषी प्रधानतेतील बैलाचे स्थान कायम होते. ग्रामीण महाराष्ट्रात बैलांचा पोळा अथवा बेंदूर हा अतिशय उल्हासाने साजरा होणारा सण होता. तो माहोल माझ्या लहानपणीचा आठवला.

आम्ही तर पोळा म्हणजे एकदम बैलांना पोवनी (पोहणी) घालणं… रोज सकाळी हिरव्यागार गवताच्या कुरणात बैल चरण्यासाठी सोडणं… हिरवगार गवत खाऊन पोट खराब होवू नये म्हणून डिकमळ पाजविणं… अंडी पाजणं… आठवडाभर बैलावर साज कोणते चढवायचे याचा खटाटोप करण्यात गुंग असायचो… आणि पोळ्याच्या दिवशी कोणाचे बैल सशक्त याची जणू स्पर्धाच लागलेली असायची… पण जागतिकीकरणाच्या वारूत सात हजार वर्षाची कृषी संस्कृतीतले बैलाचे स्थान दुय्यम ठरले… आणि यांत्रिकीकरणाचा वारू चौफेर झाला. भौतिक प्रगतीतला हा 30 वर्षाचा टप्पा उत्क्रांतीची सुनामी ठरला. या सुनामीत बैल, नांगर, पाळी, दुंडे, एटन, सापत्या, कासरा, फास, रूमण, खुटी असे सगळे वाहून गेले.

आज पोळा आहे, बैलाच्या जोड्या चार आणि मागे दहा ते बारा ट्रॅक्टरच्या रांगा आणि सर्वात पुढे डॉल्बीवर उडत्या चालीवरची गाणी आणि उसळत्या तरुणाईचा बेफाम नाच हे चित्र पाह्यला मिळतंय… बास आज पोळा आहे म्हणून परंपरेच्या यज्ञात आठवणीच्या आहुत्या टाकल्या…!!

बाकी पुढच्या पिढ्यांना उत्खननात ह्या वस्तू सापडतील.. वस्तू संग्रहालय सजतील… बैलाचे पुतळे असतील आणि संस्कृतीचा गौरव होईल.. वर्तमान हा अत्यंत कृतघ्न असतो.. त्याला भूतकाळाचा गौरव करायला आवडतो.. आपणही त्याच वर्तमानाचे अपत्य आहोत…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!