काळी कपिला, चंद्री म्हैस….
1 min readगायक्या रे दादा तुझ्या घोंगडीची चिंधी…
कपिलेच्या पायामधी बांधजो गा…
गायक्या रे दादा तुझी घुंगराची काठी…
हाती दुधासाठी वाटी माझ्या कान्हुल्याच्या…
तिन्ही सांजा होताना कुरकुरणाऱ्या नातवाला झोके देत रानातून गाई परत येण्याची वाट बघत खेड्यातली आज्जी कौतुकाने असं काही गात असे.
✳️ गायकी आणि गाई यांचं अतूट नातं
‘शेतीला लागणारे बैल कधी विकत घ्यायची वेळ आली नाही.’ असं अभिमानाने सांगणारे शेतकरी होते. गाई, बैल, गोऱ्हे, कालवडी, म्हशी, टोणगे, वगारी…. गोठे भरलेले असायचे. तालेवाराच्या गोठ्यात लहान मोठ्या खंडीभर तरी गाई असायच्या. फटाड शिंगांच्या म्हशींचही कौतुक असायचं. अगदी सामान्य शेतकऱ्याच्या गोठ्यातही एखाद दोन गाई नक्कीच असायच्या. घरादाराला या गोधनाचं कौतुक होतं. सकाळी वासरू सोडलं की, ते हुंदडत गाईला पिऊ लागायचं. तेव्हाच सरकी ढेपेचं टोपलं तिच्यापुढे मांडायचं आणि गाय दोहायची. वासरांची नाचउड मोठी बघण्यासारखी असायची. हरिणीसारखे मोठे मोठे डोळे असलेली ती वासरं घरोघरच्या लेकरांची सवंगडी होती. ढेप, सरकी खाऊन गाई निवांत रोहका करत बसायच्या. गायक्याचा आवाज ऐकला की, घाई गडबडीत उठायच्या, चरायला जायच्या. गायकी आणि त्याच्या राखणीतल्या गाई यांचं एक अतूट नातं होतं.
✳️ म्हैस म्हणते, मी दासी ठेवली
ज्या घरात म्हशींच दुभतं, त्या घरातल्या बाईला उसंत नसायची. म्हशीच दूध दाट, दही घट्ट खवल्याचं आणि हात भर लोण्याचा गोळा हे सगळ्यांनाच आवडतं. घरलक्ष्मीचा सगळा दिवस दूध, दही, ताक, लोणी आणि तूप यातच जायचा. ‘मालकीण म्हणते, मी म्हैस घेतली, म्हैस म्हणते, मी दासी ठेवली’ अशी खेड्यात म्हण आहे. म्हशीची जात नाजूक. ऊन सहन होत नाही. प्यायलाही पाणी खूप लागतं आणि अंगावर ओतायलाही. त्या मानाने गाय तशी काटकच. गाईला काय म्हशीला काय खायला भरपूर लागतं. सकस लागतं. कडबा, कुटार हिरवा चारा, भरपूर असेल टोपलंभर सरकी ढेप खायला मिळत असेल तर गाई म्हशींच आरोग्य चांगलं राहतं आणि त्या भरपूर आणि चांगलं दूध देतात.
✳️ कडबा बाद, गव्हांडा व कुटार दुर्मिळ
गेल्या 15-20 वर्षात स्वस्त गव्हाच्या माऱ्यामुळे ज्वारी खाण्याचं प्रमाण जवळजवळ 10 टक्क्यांवर आलं आहे. ज्वारीला मागणी नाही. त्यामुळे खरीपाच्या ज्वारीची पेरणीही नाही. त्यामुळे कडबा नाही. पूर्वी कडबा साठवायला विशिष्ट पद्धतीने रचून ठेवत. गुरांना तो वर्षभर पुरायचा. आता गुरांच्या खाण्यातून कडबा बादच झाला. हिरवा चारा पिकवायला शेतकऱ्यांजवळ तेव्हढी जमीन नाही. गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग सवंगल्यावर मळणी फक्त यंत्राने केली की, भरपूर गव्हांडा आणि कुटार हाती लागायचं. आता ही कामं करायला खेड्यात मजूर मिळत नाहीत. अवकाळी पावसाची भीती असतेच. त्यामुळे आता सवंगण्याचं कामही यंत्रानीच होतं. गव्हांडा आणि कुटार हाती लागत नाही. गायरानाचं क्षेत्रसुद्धा कमी झालं. सरकारी क्षेत्रात जंगल किंवा रोपवाटिकेत (नरसाडीत) चुकून गुरं गेली तर गुरांच्या मालकाला जबर दंड होतो. (पण सरकारी ढोरं म्हणजे रोही, डुकरं, हरीण, माकड शेतकऱ्यांच्या शेतात आली. त्यांनी धुमाकूळ घातला तर शेतकऱ्यालाच सतरा हेलपाटे घेऊन ते सरकार दरबारी सिद्ध करावं लागतं. नुकसान भरपाई मिळेल, याची शाश्वती नाही.)
✳️ दूध दरवाढीबाबत ओरड, कष्टाचं माेल शून्य
जरा दुधाचे भाव वाढले की, शहरी ग्राहक ओरड करतात आणि दुधाची शक्ती वाढवणाऱ्या कंपनीची उत्पादने कितीही महाग असली तरी विकत घेतात. गाई, म्हशींना किती आणि काय खाऊ घालावे लागते याची शहरी ग्राहकांना कल्पनाही नसते. गाई, म्हशी दूध देत असतात, तेव्हा तर त्यांना भरपूर आणि चांगलं खाऊ घालावेच लागते. पण गाभण आणि भाकड गाई, म्हशींना दीडपट खाऊ घालावे लागते. त्यांचा गोठा स्वच्छ ठेवणे, त्यांना वेळचे वेळी स्वच्छ पाणी पाजणे, गोचिड गोमाशांपासून त्रास होऊ नये म्हणून गाई, म्हशींना स्वच्छ ठेवणे ही कामे कष्टाची आणि खर्चाची आहेत.
✳️ दुधाच्या व्यवसायाचे अर्थकारण
दुधाचा व्यवसाय करताना ‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ हे पक्के लक्षात ठेवावे लागते. अर्थात आधी गाई, म्हशींना पाय पसरू द्यावे लागतात. दुधाच्या विक्रीतून एक रुपया मिळाला तर 75 पैसे गाई, म्हशींच्या खाण्यावर, 10 पैसे त्यांच्याच औषधांसाठी आणि 15 पैसे स्वत:साठी, असे आर्थिक नियोजन केले तर दुधाचा धंदा सुरू राहतो. दुधाचा उद्योग करणारे शेतकरी सहसा शहरातल्या खासगी संकलकांना दूध पुरवणे पसंत करतात. शहरालगत राहणारे दूध उद्योजक
स्वत: शहरामधे जाऊन दूध, दही, लोणी, विकतात. सरकारी संस्था भरवशाच्या नसतात.
✳️ गुरांवर दुधाची सक्ती
आता खेड्यात पशुधन असे उरलेलेच नाही. गाई, म्हशी, बैल, पोसणं शेतकऱ्यांना परवडत नाही. अवर्षण, कोरडा दुष्काळ, चाराटंचाई अशी कितीही संकटे आली तरी शेतकरी गाय विकत नाही. गुरांना पोसणे, जगवणे अगदीच अशक्य झाले तर एखाद्या देवस्थाना जवळच्या जंगलात गुरांना ‘देवासाठी’ सोडून देण्याची पद्धत असते. दुष्काळ संपला तरी देवाला दिलेल्या गाई पुन्हा कळपात घेण्याचा विचार शेतकऱ्याच्या मनात येत नाही. अनेक ठिकाणी दुधाळ जनावरांचे खासगी किंवा सरकारी अनुदानावर चालणारे गोठे असतात. त्यातल्या गाई म्हशी दुधासाठीच पोसल्या जातात. दूध विकणे हा त्या ‘मालकांचा’ व्यवसाय असतो. त्यामुळे मोजकाच आहार, तोही स्वस्त थोडा निकृष्टच देऊन जास्तीत जास्त दूध कसे मिळेल, हा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यासाठी वेगवेगळ्या रसायनांची इंजेक्शन गाई, म्हशींना दिली जातात. शेतकऱ्या घरच्या गाईने, म्हशीने पान्हा चोरला किंवा त्यांचे दूध आटले तर त्या गाई, म्हशींवर दूध देण्यासाठी अशी सक्ती होत नाही.
✳️ खेड्यातलं पशुधन संपण्याच्या मार्गावर
बैलांच्या खरेदी विक्रीचही एक गणित असतं. जुना बैल विकून त्यात थोडी भर घालून नवीन बैल विकत घेण्याची पूर्वापार पद्धत होती. जो तो आपल्या शेतीच्या कामानुसार बैल विकत घेत असे. गुरांच्या विक्रीचे जाचक नियम आणल्यामुळे हे चक्र थांबले. जुने बैल विकत घेण्याची हिंमत कोणी करत नाही. खट्या बैलांकडून शेतीची कामे होत नाहीत. शेतकरी त्यांच्यावर कधी सक्ती करत नाही. नवीन बैल घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. ट्रॅक्टर भाड्याने सांगून नांगरणी वखरणी करून घेतात. खेड्यातलं पशुधन संपत आलं आहे.
✳️ गाईशी नमस्कारापुरता संबंध
पोळा, वसुबारस, दिवाळीतील गोवर्धन पूजा अशा दिवशी शहरातील लेखक कवी लोकांना गाई, बैलांची आठवण येते. वर्तमानपत्रात रकाने भरून लिहिलं जातं. कविता केल्या जातात. गाईंना पोसणं, गाईंच्या गोठ्यात राहणं, गाईवर प्रेम करणं परदेशात कौतुकाचं होऊ लागलं आहे. त्यामुळे जीवन तणावमुक्त होतं… वगैरे विषयावर आपल्याकडे चर्चा सुरू झाली आहे. गाईच्या दुधात सोनं असतं. गाईच्या पंचगव्याने कॅन्सर बरा होतो, असेही शोध वर्तमानपत्रात कौतुकाने लिहिले जातात. या लेखक कवी आणि संशोधकांना गाईंबद्दल प्रेम वाटतही असेल पण त्यांचा संबंध रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करण्यापुरता असतो. स्वत:ला धार्मिक म्हणवणाऱ्या महिलांच्या देवघरात गाय, वासराची मूर्ती असते. पण त्या जिवंत गाईला शिळं अन्न खायला घालून त्या गाईने आपल्या घरासमोर शेण टाकू नये म्हणून तिला तात्काळ हाकलून देतात. श्रीकृष्णाने अनेक जंगली श्वापदांपासून आपल्या गाईंच रक्षण केलं. गो-वर्धनाचं म्हणजेच गाईंच्या पालन पोषणाचं मोठं आव्हान पेललं. ज्या पर्वतावरच्या कुरणात गाई चरत त्याला गोवर्धन पर्वत म्हणून प्रसिद्ध केलं. हे लक्षात न घेता श्रीकृष्णाने करंगळीवर पर्वत उचल्याचीच कथा या महिला डोळे मिटून ऐकत व सांगत राहतात. शिजवलेलं अन्न हा गाईचा आहार नाही, हे समजावून सांगूनही त्यांना पटत नाही. कारण ते सोयीचं नसतं. ‘गोग्रास’ खाऊ घालून पुण्य कमावणे सोपे आणि सोयीचे आहे. शेतकऱ्यांनी गाई पाळाव्या, पोसाव्या आणि त्यांनी पूजाव्या.
✳️ शेती उद्ध्वस्त व पशुधनाची विटंबना
छोट्या शहरात मोकाट गाई फिरताना दिसतात. रस्त्यात रहदारीला अडथळा होतो. कुणीतरी धर्म करा, गाईला चारा द्या, म्हणत पैसे गोळा करतो. चाराही त्याचाच गायही त्याचीच. पशुधनाची ही अवहेलना, विटंबना शेती उद्ध्वस्त केल्यामुळेच झाली आहे. सरकारी किंवा सेवाभावी संस्थांच्या मालकीच्या गोशाळा विपन्नावस्थेतच असतात. तिथे तर शेकडो गाई एकत्र
असल्यामुळे रोग फार झपाट्याने पसरतात. गोठ्यांची स्वच्छता यथातथाच असते. व्यवसाय आणि नोकरी याच भावनेतून गुरांची व्यवस्था केली जाते. शेती पारतंत्र्याच्या जोखडातून मोकळी झाली तर गोधन, गोवंश वाढतच जाईल हे नक्की. गोधनाचं संगोपन शेतकरी किती जीव लावून करतात हे सांगायची गरज नाही. शेती आणि शेतकरी सक्षम झाले तरच गोवंशाचा ऱ्हास थांबवता येईल.