krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

माेसंबीची पान व फळगळ हाेत आहे? या उपाययाेजना करा!

1 min read
नागपूर जिल्ह्यातील काटाेल, नरखेड, सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील नर्सरीमध्ये तसेच माेसंबी बागेत फळगळ आणि झाडांच्या पानांवर डाग आढळून येत आहेत. काही बागा व नर्सरीमध्ये पानगळ देखील आढळून येत आहे. काटाेल आणि इतर तालुक्यांमध्ये मुख्यत्वे मोसंबी पिकावर म्हणजे नर्सरीतील झाडांच्या पानांवर तांबूस रंगाचे व गोलाकार ठिपके आढळून येत आहेत.

🌳 ‘फायटाेप्थाेरा’ व ‘काेलेटाेट्रीकम’ बुरशीची लागण
मोसंबीच्या नर्सरीमधील झाडांची पाने आकाराने मोठे असल्या कारणाने त्यावर पाणी साचून त्यावर कथ्थ्या रंगाचे डाग म्हणजेच ‘फायटाेप्थाेरा’ या बुरशीची लागण झाल्याचे तसेच ‘काेलेटाेट्रीकम’ या बुरशीचे गाेल रिंग असल्याचे आढळून आले आहे. सतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे या दाेन्ही बुरशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे. झाडांच्या पानांवर 5 ते 6 तास पाणी राहिल्यास या दोन्ही बुरशीची लागण सर्वप्रथम नर्सरीमधून होते. परिणामी, पानगळ होऊन त्यातील बुरशीचे कण पाणी व हवेच्या सहाय्याने माेसंबीच्या बागेत व नंतर संत्र्याच्या बागेत पसरून पिकांचे नुकसान करू शकते. या बुरशीमुळे संत्रा व माेसंबीची माेठ्या प्रमाणावर फळगळ हाेण्याची दाट शक्यता असते. दोन वर्षापूर्वी संत्रा व माेसंबीच्या बागांमध्ये अशाच प्रकारची फळगळ दिसून आली हाेती. काही नर्सरीमध्ये नागअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे माेसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी वेळीच याेग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नर्सरीमधील झाडांची पाने कथ्थ्या रंगाची हाेणे, पानांवर कथ्थ्या रंगाचे डाग पडणे, पानांच्या काॅर्नरला कथ्थे डाग पडणे, गाेल रिंग हाेणे म्हणजेच काेलेटाेट्रीकम व फायटाेप्थाेरा बुरशीच्या प्रादुर्भावाचा परिणाम हाेय. या बुरशीमुळे माेठ्या प्रमाणात पानगळ हाेते.

🌳 उपाययाेजना
✴️ या बुरशीच्या व्यवस्थापनासाठी एलीएट 20 ते 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा बोरडॅक्स मिक्चर 0.6 टक्के किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्राम किंवा ॲझाक्सस्ट्राेबीन + डायफेनकोनाझोल 90 मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✴️ कोलेट्राेक्ट्रीकम बुरशीच्या व्यवस्थापनासाठी थायफाेनेट मिथाईल (रोको) 20 ग्राम किंवा कार्बेडाझिम 10 ग्राम (बाव्हीस्टीन) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✴️ नागअळीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लाेप्रीड 17.8 एस.एल. किंवा थायमेथाॅक्झाम 25 डब्ल्यू. जी. 3 ग्राम यापैकी काेणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी 8 ते 10 दिवसाच्या अंतराने करावी.
✴️ मोसंबीची फळगळ आढळून येत आहे. ज्या बागेत पूर्व परिपक्व फाळे गळताना दिसून येत आहेत, त्या बागेत शेतकऱ्यांनी मोसंबीच्या झाडास 50 ग्राम फेरस सल्फेट व 50 ग्राम झिंक सल्फेट 5 किलाे गांडूळ खतासोबत जमिनीतून द्यावे.
✴️ सततचा पाऊस व यात खंड पडल्यास किंवा उघाड पडल्यास जिब्रेलिक आम्ल 1.5 ग्राम, कॅल्शीयम नायट्रेट दीड किलाे 100 लिटर पाण्यात मिसळून त्याची मोसंबी बागेत उघाडीत फवारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!