krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

संत्र्याच्या मृग बहाराचे नियोजन

1 min read
साधारणत: फळझाडांना ऋतु बदलताना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या नवीन पालवीस ‘नवती’ असे संबोधण्यात येते. ही नवती वर्षातून तीन वेळा म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात येते. त्याचप्रमाणे संत्र्यालासुद्धा वर्षातून तीन वेळा नवती येते. या नवतीसोबत फुलेसुद्धा येतात. परंतु प्रामुख्याने फुले ही दोन वेळा येतात. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणारी आंबिया बहाराची तर जून-जुलैमध्ये येणारी मृग बहाराची फुले असतात. संत्र्याची झाडे जमिनीतून मिळणारे अन्नद्रव्य आणि पाणी सतत शोषून घेत असतात आणि त्यामुळे या क्रियेत अडथळा निर्माण करून झाडाची वाढ थांबवून झाडास विश्रांती द्यावी लागते. त्यामुळे संत्र्याच्या झाडाच्या वाढीकरिता लागणारी अन्नद्रव्ये वाढीकरिता खर्ची न होता या अन्नद्रव्याचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहाराची फुले नवीन नवती सोबत दिसू लागतात.

🌳 संत्र्याच्या मृग बहाराच्या समस्या आणि उपाय
✳️ मृग बहार न येण्याची कारणे
✳️ नागपूर संत्र्याची अयोग्य जमिनीमध्ये झालेली लागवड
विदर्भाच्या मोठ्या प्रमाणात संत्रा बागा या भारी जमिनीमध्ये लावलेल्या आहेत. या भारी जमिनीमध्ये 60 ते 90 टक्के सें.मी. खोलीत चिकण मातीचे प्रमाणे 60 ते 72 टक्के आहे. तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारी जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साचून राहत असल्याने झाडांची तंतुमय मुळे कमजोर होऊन सडतात आणि अन्नद्रव्याचा पुरवठाही नियमित होत नाही. तसेच भारी जमिनीच्या गुणधर्मानुसार ओलावा कमी झाल्यास मातीचे कण आकुंचन पावतात व जमीन कडक व घट्ट होते आणि ओलावा भरपूर असल्यास जमीन फुगते याचा परिणाम मुळावर होतो. तंतुमय मुळे तुटतात व झाडाचा ऱ्हास होतो तसेच मृग बहार येणाऱ्या संत्रा झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण देणे जरुरी असते. भारी जमिनीत झाडाला योग्य ताण बसत नाही. कारण भारी जमिनीची पाणीधारण करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे ताणाच्या कालावधीत भारी जमिनीमध्ये 60 ते 90 सें. मी. खाली उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा पुरवठा झाडाला होतो. त्यामुळे योग्य ताण बसत नाही आणि त्याचा परिणाम मृग बहार न येण्यावर होतो. जमिनीमध्ये मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे संत्रा झाडाला लागणारी अन्नद्रव्ये तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. याचासुद्धा मृग बहार न येण्यावर परिणाम होतो.

🌳 प्रतिकूल हवामान
मृग बहार येण्याकरिता जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे. या कालावधीत किमान 200 ते 250 मि.मी. पाऊस पडलेला असावा. जर या कालावधीत पाऊस 150 मि.मी.पेक्षा कमी पडल्यास बहार येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. मृग नक्षत्राचे पहिले एक दोन पाऊस जोराचे 40 ते 50 मि. मी.असावेत. या कालावधीत ढगाळ वातावरण राहून पाच ते सहा दिवसांची पावसाची झड असावी. हवेतील आर्द्रता 80 ते 90 टक्के असणे आवश्यक आहे. सरासरी तापमान 27 ते 29 अंश सें.ग्रे. असावे. अशा अनुकूल हवामानात संत्र्याला मृग बहार येतो. परंतु, ही अनुकूल परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध होत नाही.

🌳 संत्रा झाडाला देण्यात येणारा अयोग्य ताण
मृग बहाराची फुले पाण्याच्या ताणाचा कालावधी जमिनीचा मगदूर, झाडाचे वय आणि स्थानिक तापमान यावर अवलंबून आहे. झाडाला बसलेल्या योग्य ताणामुळे झाडाची वाढ थांबून झाडाच्या पानात, फांद्यात (कर्बनत्र) हे प्रमाणबद्ध होतात आणि अनुकूल परिस्थिती मिळताच मृगाच्या पहिल्या पावसानंतर मृगबहाराची फुले दिसतात. हा पाण्याचा ताण उन्हाळ्यात अकाली पाऊस आल्यामुळे बसत नाही. त्यामुळे मृग बहाराची फुले येत नाहीत. योग्य ताण बसलेल्या झाडाची पाने कोमेजतात, सुकतात, खालच्या बाजूने वाकतात आणि काही प्रमाणात पानांची गळ सुद्धा होते. हा माफक ताण भारी जमिनीत लागवड केलेल्या संत्रा झाडांना बसत नाही. त्यामुळे सुद्धा मृग बहार येत नाही. संत्रा झाडाला माफक ताण बसण्याची चिन्हे पानांमध्ये उपलब्ध असलेले पाण्याचे प्रमाण यावरून सुद्धा ठरविता येते. पानामध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असल्यास झाडाला योग्य ताण बसत नाही. तर 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तीव्र (जास्त) ताण बसलेला असतो.

🌳 संत्रा झाडाचे खालावलेले प्रकृतीमान
संत्रा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे काही बागायतदार संत्रा बागेची योग्य निगा राखत नाहीत. त्यामुळे काही संत्रा बागा दुर्लक्षित आहेत. त्यात मशागतीचा अभाव आढळतो. उदा. सल न काढणे, शिफारशीनुसार खत मात्रा न देणे, ओलिताचा अभाव, कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी. त्यामुळे संत्रा झाडाचे प्रकृतीमान खालाविले, सलाटले, कमजोर होऊन अशक्त झाले, अशा झाडावर मृग बहार येत नाही.

🌳 मृग बहार येण्याकरिता उपाययोजना
संत्रा बागेच्या जमिनीचा पोत सुधारणे
नवीन संत्रा लागवड करावयाची असल्यास संत्र्याकरिता योग्य असलेल्या जमिनीमध्ये लागवड करावी. मध्यम पोताची 1 ते 1.5 मीटर खोलीची उत्तम निचरा होणारी आणि चुनखडीचे प्रमाण 10 टक्यांपेक्षा कमी असलेल्या जमिनीमध्ये लागवड केलेली असावी. परंतु, भारी जमिनीमध्ये संत्रा लागवड झालेली आहे, त्या जमिनीचा पोत सुधारण्याकरिता भरपूर सेंद्रिय खताचा वापर दरवर्षी करावा. दरवर्षी प्रत्येक संत्रा झाडाला 40 ते 50 किलो शेणखत आणि 7.5 किलो निंबोळी ढेप टाकावी. तसेच संत्रा बागेत हिरवळीची खते गवताचा 5 सें.मी. चा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय होऊन अन्नद्रव्ये मुळांना सहज उपलब्ध होतात. 8 ते 10 किलो ट्रायकोडर्मा बुरशी, 50 ते 60 किलो शेणखतात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रात संत्रा बागेतील मातीत मिसळून द्यावी. बागेत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता उताराच्या दिशेने दोन झाडाच्या मध्ये चर खोदून पाणी बागेच्या बाहेर काढावे. चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यास संत्रा बागेत जिप्समचा वापर करावा.

🌳 संत्रा झाडांना योग्य ताण
संत्रा बागेला मृग बहार येण्याकरिता पाण्याच्या ताणाचा कालावधी जमिनीच्या मगदुरावर अवलंबून आहे. मध्यम पोताची 1 ते 1.5 मीटर खोलीच्या जमिनीमध्ये लागवड केलेल्या बागेला 50 दिवसांचा ताण मृग बहार घेण्याकरिता योग्य आहे. हलक्या जमिनीमध्ये 15 ते 20 दिवसांच्या ताणाने सुद्धा संत्रा बागा मृग बहाराने बहरल्याचे दाखले आहेत. तसेच भारी जमिनीमध्ये लागवड केलेल्या संत्रा बागेला 60 ते 70 दिवसांचा ताण देऊन सुद्धा मृग बहार न आल्याचे आढळले. मध्यम व उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये लागवड केलेल्या बागांना 30 दिवसांच्या पाण्याचा ताण देणे योग्य ठरेल.

🌳 मृग बहारकरिता खत व्यवस्थापन
मृग बहार येण्याकरिता प्रति झाडास 50 किलो शेणखत उन्हाळ्यात टाकून वखरणी करावी. जून महिन्यात मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर ताण तोडतेवेळी प्रति झाडास 600 ग्रॅम नत्र + 400 ग्रॅम स्फुरद + 400 ग्रॅम पालाश + 7.5 किलो निंबोळी ढेप देण्यात यावी. तसेच संत्रा बागेतील जमिनीत जस्ताची कमतरता असल्यास या खताच्या मात्रेसोबत झिंक सल्फेट 200 ग्रॅम प्रति झाड मातीत मिसळून द्यावे. उरलेली नत्राची अर्धी मात्रा (600 ग्रॅम) फळे वाटाण्याएवढी झाल्यावर किंवा फळधारणा झाल्यावर दीड ते दाेन महिन्यांनी ऑगस्टमध्ये द्यावी.

🌳 मृग बहाराकरिता ओलीत व्यवस्थापन
मृग बहाराची फुले येण्याकरिता संत्रा बागेत जून-जुलैमध्ये जमिनीत भरपूर ओलावा असणे जरुरीचे आहे. मृगाच्या अपुऱ्या पावसामुळे ओलावा कमी पडतो आणि ती कमतरता भरून काढण्याकरिता ओलिताची गरज असते. अशा वेळेस त्वरित आोलीत सुरू करावे. या कालावधीत ठिबक सिंचनाद्वारे केलेले ओलीत अधिक फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे बहार धरण्याच्या कालावधीत तुषार पद्धतीने ओलीत करणे सुद्धा फायदेशीर आहे. कारण तुषार सिंचन पद्धतीने ओलीत केल्यामुळे संत्रा बागेत हवेतील आद्रतेचे प्रमाण 70 ते 80 टक्के टिकून राहील. त्यामुळे मृग बहाराची फुले येतील आणि फलनक्रिया सुद्धा अधिक प्रमाणात आढळून येईल.

🌳 मृग बहार घेण्याकरिता संजीवकाचा उपयोग
संत्रा झाडाची वाढ थांबविण्याकरिता जसा पाण्याचा ताण द्यावा लागतो, त्याचप्रमाणे काही संजीवकांनीसुद्धा झाडाची वाढ थांबविता येते. संत्रा झाडाला ताणावर सोडताना 1,000 पी.पी.एम. सायकोसील या वाढरोधक संजीवकाची फवारणी करावी. त्यामुळे मृग बहाराची फुले आल्याचे प्रयोगावरून निदर्शनास आले आहे. तसेच ताणाच्या कालावधीत अकाली पाऊस पडल्यास लगेच दुसऱ्या दिवशी 1,000 पी.पी.एम. सायकोसीलची दुसरी फवारणी केल्यास मृग बहार आल्याचे आढळून आले.

🌳 मृग बहार घेण्याकरिता काही आवश्यक बाबी
✳️ संत्र्याची लागवड योग्य जमिनीत करावी.
✳️ पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरित करावा.
✳️ संत्रा झाडाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे माफक ताण द्यावा.
✳️ मृग बहार येण्याच्या कालावधीत पावसाचा खंड किंवा अपुरा पाऊस झाल्यास त्वरित ओलीत करावे.
✳️ ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास वनस्पती वाढरोधक 1,000 पी.पी.एम. सायकोसीलची फवारणी करावी.
✳️ बहार धरण्याच्या कालावधीत बागेत जमिनीच्या मशागतीची उदा. वखरणी, उष्करी इत्यादी कामे करू नये.
✳️ खालावलेल्या सलाटलेल्या संत्रा झाडाची छाटणी करावी.
✳️ शिफारशीनुसार खत आणि ओलीत व्यवस्थापन करावे.
✳️ सेंद्रिय खताचा नियमित वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!